घरमुंबईनिर्माता अली मोरानी फायरिंग प्रकरणात ओबेद रेडिओवाला याला अटक

निर्माता अली मोरानी फायरिंग प्रकरणात ओबेद रेडिओवाला याला अटक

Subscribe

चित्रपट निर्माता मोहम्मद अली मोरानी यांच्या बंगल्यावरील गोळीबार केल्याप्रकरणी अब्दुल रशीद रेडिओवाला ऊर्फ ओबेद रेडिओवाला याला सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली आहे. तर त्याला मंगळवारी १६ एप्रिलला पोलीस बंदोबस्तात मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे.

चित्रपट निर्माता मोहम्मद अली मोरानी यांच्या बंगल्यावरील गोळीबार केल्याप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीचा अत्यंत विश्वासू साथीदार अब्दुल रशीद रेडिओवाला ऊर्फ ओबेद रेडिओवाला याला सोमवारी गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी अटक केली. त्याच्याविरुद्ध मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली असून मंगळवारी त्याला पोलीस बंदोबस्तात मोक्का कोर्टात हजर केले जाईल, असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई यांनी सांगितले. यापूर्वी ओबेदला चित्रपट निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर फायरिंग केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केली होती, याच गुन्ह्यांत तो न्यायालयीन कोठडीत असताना त्याचा कारागृहातून ताबा घेण्यात आला आहे.

सिनेसुष्टीतील बड्या व्यक्तींना केले टार्गेट

जुहू येथील रोड क्रमांक नऊ, जमनाबाई स्कूलजवळ मोहम्मद अली मोरानी यांचा शगुन नावाचा एक बंगला आहेत. चित्रपट निर्माता अली मोरानी हे २३ ऑगस्टला दहा वाजता त्यांच्या एका महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेले होते. त्याच रात्री उशिरा तीन अज्ञात मारेकर्‍यांनी त्यांच्या बंगल्याच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात कोणीही जखमी झाला नाही. मात्र, अचानक झालेल्या गोळीबाराने तिथे प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. गोळीबाराची माहिती सकाळी मिळाली. ही माहिती मिळताच जुहू पोलिसांसह गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. या गोळीबाराची वरिष्ठांनी गंभीर दखल घेत आरोपींच्या अटकेसाठी विशेष मोहीम सुरु करण्याचे आदेश दिले होते. याच दरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकार्‍यांनी नोव्हेंबर २०१४ रोजी रवी पुजारी टोळीशी संबंधित तेरा आरोपींना अटक केली होती. या आरोपींच्या चौकशीत त्यांनी महेश भट्ट आणि अली मोरानी यांच्या बंगल्यावर गोळीबार केल्याची कबुली दिली होती. त्यात सुफियान दिलशान शेख, सैज नईम शेख आणि इमरान अब्बास सिद्धीकी या तिघांचा समावेश होता. या तिघांनी मोरानी यांच्या बंगल्याची रेकी केली होती. त्यासाठी त्यांना रवी पुजारीने तीन लाख रुपये दिले होते. सिनेअभिनेता शाहरुख खान याच्या ‘हॅप्पी न्यू ईअर’ चित्रपटाचे प्रमोशन अली मोरानी यांच्या कंपनीकडे होते. त्यासाठी त्यांनी विदेशात काही शो आयोजित केले होते, त्यातील एक शो अली मोरानी यांनी रवी पुजारीसाठी आयोजित करावा यासाठी रवी पुजारी यानीच धमकी दिली होती. या धमकीमागे ओबेद रेडिओवाला याची महत्त्वाची भूमिका होती. प्राथमिक तपासात रवी पुजारी आणि ओबेद रेडिओवाला या दोघांनाही निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट, त्यांचे बंधू निर्माता मुकेश भट्ट आणि मुलगा राहुल महेश भट्ट यांच्यापैकी कोणावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्याचे आदेश रवी पुजारीने आपल्या सहकार्‍यांना दिले होते. या गोळीबारानंतर शूटरांना जुहू येथे निर्माता मोहम्मद अली मोरानी यांच्या बंगल्यावर पुन्हा गोळीबार करण्यास सांगण्यात आले. पहिला प्रयत्न फसला गेल्याने रवी पुजारीला मोरानी यांच्या बंगल्यावर गोळीबार करुन सिनेसृष्टीत दहशत निर्माण करायची होती. तर दुसरीकडे रवी पुजारीच्या टार्गेटवर सिनेसृष्टीतील अन्य काही बडे व्यक्तीसुद्धा होते. सिनेअभिनेता शाहरुख खान आणि सिनेदिग्दर्शका फराह खान यांचा समावेश होता.

- Advertisement -

मुंबई पोलिसांकडे दिला ताबा

ओबेद हा रवी पुजारीचा खास सहकारी असून तो १९९९ साली मुंबईतून अमेरिकेला पळून गेला होता. अमेरिकेच्या न्यू जर्सीमध्ये तो ओबेद मर्चंट या नावाने राहत होता. त्यासाठी त्याने बोगस पासपोर्ट बनविला होता. २०१५ साली त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस बजाविण्यात आली होती. याच दरम्यान, अमेरिकेने तिथे अनधिकृतपणे राहणार्‍या इतर देशांच्या नागरिकांविरुद्ध विशेष मोहीम सुरु केली होती. यावेळी ओबेदला अमेरिकेच्या इमिग्रेशन आणि कस्टम इन्फोर्समेंटच्या अधिकार्‍यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत ताब्यात घेतले होते. तपासात तो भारतीय नागरिक तसेच अमेरिकेत काही वर्षांपासून अनधिकृतपणे राहत असल्याचे उघडकीस आले होते. त्यामुळे त्याच्याविरुद्ध न्यू जर्सी कोर्टात खटला सुरु होता. या खटल्याची सुनावणी अलीकडेच पूर्ण होऊन कोर्टाने त्याला भारतात पाठविण्याचे आदेश दिले होते. ही माहिती इंटरपोल पोलिसांना मिळताच त्यांनी त्याचा ताबा घेतला होता. १ एप्रिलला त्याला अमेरिकेतून दिल्लीतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणण्यात आले होते. विमानतळावरच त्याचा ताबा मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. ताबा मिळताच त्याला महेश भट्ट फायरिंग प्रकरणात प्रॉपर्टी सेलच्या अधिकार्‍यांनी अटक केली. आता त्याचा ताबा युनिट नऊच्या अधिकार्‍यांकडे सोपविण्यात आला. या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश देसाई हे करीत असून त्याला मंगळवारी १६ एप्रिलला मोक्का कोर्टात हजर केले जाणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -