घरमुंबईएलईडी मासेमारीमुळे अरबी समुद्रातील माशांचा समूळ नाश!

एलईडी मासेमारीमुळे अरबी समुद्रातील माशांचा समूळ नाश!

Subscribe

पारंपरिक मासेमारीच्या पद्धती बाजूला ठेवून एलईडी वीज प्रवाहाच्या अत्याधुनिक मासेमारीच्या प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील माशांची पैदास अडचणीत येत आहे.

विविध प्रकारच्या मासळीने समृध्द असलेला अरबी समुद्र ओस पडत चालला आहे. पारंपरिक मासेमारीच्या पद्धती बाजूला ठेवून एलईडी वीज प्रवाहाच्या अत्याधुनिक मासेमारीच्या प्रकाराचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. त्यामुळे अरबी समुद्रातील माशांची पैदास अडचणीत येत आहे. आगामी काळात देशात समुद्री माशांचा पुरवठा संपण्याची शक्यता आहे. जपानमध्ये अशाच अत्याधुनिक मासेमारीचा अवलंब तिथल्या मत्स्य व्यावसायिकांवर बेतला आहे. यामुळे तिथली मासेमारी संपुष्टात आली आहे. कोकणचा किनाराही आता मासेरहित होण्याची भीती निर्माण झाली आहे. मासेमारीच्या आधुनिक साधनांचा अवलंब करत श्रीमंत मच्छिमारांनी आपल्याच बांधवांच्या पोटावर पाय आणला आहे. आता याविरोधात याच क्षेत्रात ट्रॉलर्सवर काम करणार्‍या खलाशांनी आंदोलन पुकारले आहे. एलईडी मासेमारी सुरू ठेवल्यास मासेमारीसाठी समुद्रात जाणार नाही, असा पवित्रा घेत खलाशांनी बड्या मासेमारांविरोधात एल्गार पुकारला आहे.

पाश्चात्य देशात मासेमारीसाठी अशाच प्रकारच्या अत्याधुनिक पद्धतीचा अवलंब केला जात असल्याने त्याचा परिणाम तिथल्या मासेमारीवर झाला आहे. जपानमध्ये टोकियो बंदर याच कारणासाठी सुनेसुने झाले आहे. या पार्श्वभूमीवर भारतातील मासेमारीत अवतरलेल्या अत्याधुनिक मासेमारीविरोधात जोरदार आंदोलनाची तयारी सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरील बड्या मच्छिमारांनी ही आधुनिक यंत्रणा आपल्या बोटींवर बसवून घेतली आहे. एलईडी विजेच्या माध्यमातून भर समुद्रात ७५ सागरी मैलावर म्हणजेच सुमारे शंभर किलोमीटर क्षेत्रात सुरू असलेल्या या मासेमारीने मासेमारी क्षेत्रच उदास झाले आहे.

- Advertisement -

यापूर्वी श्रीमंत मच्छिमारांनी ‘पर्सिसनेट’ जाळ्यांच्या सहाय्याने मासेमारी सुरू करून आधीच समुद्रातील मत्स्यबीज नष्ट करण्यास सुरुवात केली आहे. एकाचवेळी काही टन मासळी ‘पर्सिसनेट’द्वारे मारली जात असल्याने या मासेमारीला किनार्‍यावरील पारंपरिक मासेमारांनी विरोध केला होता. मात्र त्याला श्रीमंत मच्छिमारांनी दाद दिली नाही. सरकारने अपेक्षित सहकार्य पारंपरिक मासेमारांना केले नाही. त्यामुळे अरबी समुद्रात माशांची पैदास धोक्यात आली आहे. या जाळ्यांंमध्ये कुपा, बांगडा, घोळ, राणीमासे, टुना थव्याने सापडतात.

एलईडी यंत्रणेच्या माध्यमातून मासेमारी केल्यामुळे समुद्रातील बीजही नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे पारंपरिक मासेमारी उद्योग करणारे सीताराम नाखवा यांंनी ‘आपलं महानगर’शी बोलताना स्पष्ट केले. नाखवा म्हणाले, ‘एकट्या मुंबई किनार्‍यावर एलईडी यंत्रणा बसवलेल्या २०० नौका कार्यरत आहेत. यात एकट्या करंजा कोळीवाडा येथील नौकांची संख्या ८० इतकी आहे. या गावातील करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी या राज्यातल्या सर्वात मोठ्या सोसायटीने एलईडी यंत्रणेला विरोध दर्शवला आहे. मात्र, पैसेवाले मच्छिमार सोसायटीला किंमत देत नाहीत’. ‘एलईडी यंत्रणेद्वारे समुद्रात प्रखर विजेचे दिवे सोडले जातात. या दिव्यांच्या उष्णतेने आणि प्रखर उजेडाने सर्वच प्रकारची मासळी दिव्यांभोवती जमा होते. मग ‘पर्सिसनेट’च्या सहाय्याने मासळीच्या अक्षरश: राशीच्या राशी हाती लागतात. मोठ्या माशांपासून ते अगदी बिजापर्यंतची मासळी या जाळ्यांमध्ये अडकते, असे कृष्ण ल. कोळी सांगत होते.

- Advertisement -

या मासेमारीने डोलकर, दालली, भोकशी प्रकारचे मासे मिळणेही थांबले आहे. ही मासेमारी आमच्या व्यवसायाला अजिबात परवडणारी नसल्याने आणि यामुळे मासेमारीवर विसंबून असलेल्या इतर कामगारांच्या उपासमारीची भीती व्यक्त करताना अखिल भारतीय मच्छिमार खलाशी संघटनेचे प्रमुख विश्वनाथ म्हात्रे यांनी या मासेमारीला ठाम विरोध दर्शवला आहे. या विरोधामुळेच एलईडी मासेमारी करणार्‍या बोटींवर कामाला जायचे नाही, असा पवित्रा घेत या संघटनेने संपाचे हत्यार उपसले आहे. अरबी समुद्रातील मासेमारीतून भारताला सुमारे २५०० कोटींचे परकीय चलन मिळत असे. नवनव्या यंत्रणांच्या सहाय्याने मासेमारी सुरू झाल्यापासून समुद्रात माशांची वानवा जाणवू लागला आहे. यामुळे मिळणार्‍या परकीय चलनालाही सरकारला मुकावे लागत आहे.

जग आधुनिकतेची कास धरत असताना मासेमारीत आधुनिकता का नको? खरे तर जगातील मोठ्या बोटी आपल्या समुद्रात येऊन एलईडी मासेमारी करत असताना आपल्याच मच्छिमारांना अटकाव का? ‘पर्सिसनेट’लाही काहींनी विरोध केला होता. या जाळ्यांमुळे मासे संपतील, असे सांगितले जात होते. पण तसे झाले नाही, हे लक्षात घ्या.
-रमेश नाखवा (माजी चेअरमन)
करंजा मच्छिमार सहकारी सोसायटी.

पैसेवाल्यांची चोचलेगिरी

एलईडी, पर्सनेट ही पैसेवाल्यांची चोचलेगिरी आहे. श्रीमंतीत अधिक कमाई करण्याची हौस या व्यवसायाला आणि मासेमारीलाच बुडवणारी आहे. या व्यवसायावर लाखो कुटुंब अवलंबून आहेत. हा उद्योग त्यांच्या जीवनमरणाचा प्रश्न बनला आहे. अशावेळी मासे नष्ट करणार्‍या यंत्रणांना परवानगीच देता नये.
विश्वनाथ म्हात्रे (अध्यक्ष)
अ.भा.मच्छिमार खलाशी संघटना.

कायद्याचा धाक नाही

अरबी समुद्रात सुरू झालेल्या एलईडी यंत्रणेतील मासेमारीने हा उद्योग लयाला जाईल, हे लक्षात घेऊन कायद्याचा धाक संबंधितांवर बसवला पाहिजे. कायद्याने अशी मासेमारी करता येत नाही. पण या कायद्याची अंमलबजावणी होत नाही, हे आमचे दुखणे आहे.
-विश्वास नाखवा (चेअरमन),
रेवस मच्छिमार सहकारी सोसायटी.

Pravin Puro
Pravin Purohttps://www.mymahanagar.com/author/ppravin/
विविध वृत्तपत्रांमध्ये ३२ वर्ष पत्रकारिता. वृत्तपत्र आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. राजकीय, सामाजिक, राज्य आणि राष्ट्रीय विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -