घरताज्या घडामोडीकोरोनामुळे रोग प्रतिकारक क्षमतेत होतेय घट, दुसऱ्यांदा लागण होण्याचा धोका वाढला -...

कोरोनामुळे रोग प्रतिकारक क्षमतेत होतेय घट, दुसऱ्यांदा लागण होण्याचा धोका वाढला – संशोधन

Subscribe

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा परिणाम म्हणजे अनेक ठिकाणी आरोग्य यंत्रणाच आऊटेजमुळे आजारी पडलेली आहे. दैनंदिन कोरोना रूग्ण वाढीचा आकडा हा कोरोनाचे संकट आणखी तीव्र करणारा असा आहे. अमेरिकेनंतर भारतातच दररोज सव्वा लाखांचा रूग्णांचा आकडा पोहचत आहे. कोरोनाची देशातील सध्याची परिस्थिती पाहता, कोरोनाच्या निमित्ताने समोर आलेला अभ्यास हा देशवासीयांसमोरील संकट आणखी गडद करणारा असा आहे. नव्या अभ्यासानुसार २० टक्के ते ३० टक्के लोकांनी आपली नैसर्गिक अशी कोरोनाविरोधातील इन्युनिटीची क्षमता हरवलेली आहे. अवघ्या सहा महिन्यातच ही नैसर्गिक अशा प्रकारची (इम्युनिटी) रोगप्रतिकारक क्षमता हरवल्याने कोरोनाची लागणी पुन्हा होण्याचा धोका वाढल्याचे या अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचा संसर्ग तळ ठोकून असतानाच रोग प्रतिकारक शक्तीच्या बाबतीत असलेली चिंता मोठ्या शहरांचे टेन्शन वाढवणारी अशी आहे.

इंस्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स एण्ड इंटिग्रेटीव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) च्या अभ्यासानुसार आपली नैसर्गिक रोग प्रतिकार क्षमता ही कोरोना विरोधात काम करते. पण काही जणांच्या बाबतीत म्हणजे सरासरी २० टक्के ते ३० टक्के जणांच्या बाबतीत ही नैसर्गिक क्षमता काम करण्याची प्रक्रिया थांबते. डॉ अनुराग अग्रवाल यांनी केलेल्या ट्विटनुसार कोरोनाची लागण झाल्यानंतरही शरीरातील कोरोनाचा व्हायरस नष्ट करण्यासाठी रोग प्रतिकारक शक्ती ही २० टक्के ते ३० टक्के लोकांच्या बाबतीत कमी झाल्याचे अभ्यासात आढळले आहे. त्यामुळेच या गोष्टीचा अभ्यास करण्यासाठी मुंबईसारख्या सेरोपॉझिटीव्ह शहरांमध्ये सहा महिन्यांच्या कालावधीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. कारण या शहरांमध्ये वारंवार संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असतो. म्हणूनच अशा स्वरूपाचा अभ्यास मुंबईत होणे गरजेचे असल्याचे तज्ञांचे मत आहे.

- Advertisement -

देशात कोरोनाची लाट आणि संसर्ग किती काळ टिकणार आहे, याची स्पष्टता येण्यासाठीही हा अभ्यास उपयुक्त ठरू शकतो असे तज्ञांचे मत आहे. त्यामुळेच देशात लसीकरणाला किती महत्व यापुढच्या काळात असेल हेदेखील अभ्यासातून स्पष्ट होऊ शकते. सध्या अनेक बाबतीत संशोधन सुरू आहे, पण कोरोनाचे मृत्यू रोखण्यासाठी कोणत्या नेमक्या लसी गरजेच्या आहेत, याची स्पष्टता येणे गरजेचे आहे. त्यासाठीच किमान सहा महिन्यांच्या कालावधीचे संशोधन होणे गरजेचे आहे.

अशा प्रकारच्या अभ्यासामुळे काही गोष्टी स्पष्ट होतील, त्या म्हणजे अॅण्टीबॉडिज असताना आणि सेरोपॉझिटीव्हिटी मोठ्या प्रमाणात दिल्ली आणि महाराष्ट्रासारख्या राज्यात असताना कोरोना रूग्णांची संख्या कशी वाढते आहे, याचा खुलासा होण्यासाठी हा अभ्यास मदत करू शकतो. सध्या दिल्ली आणि मुंबईसारख्या शहरांमध्ये कोरोनाची लाट ही पुन्हा एकदा नवे टोक गाठण्याची शक्यता आहे. गेल्या ३२ हून अधिक दिवसांपासून देशात कोरोनाची स्थिती ही दिवसेंदिवस गंभीरच होत आहे. अशावेळी नेमक्या अभ्यासामुळेच देशात कोरोनाच्या संसर्गाचा मुक्काम वैज्ञानिक पद्धतीने शोधून काढणे शक्य होईल.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -