भिवंडीतून 2 किलो गांजा जप्त

Ganja

शांतीनगर पोलिसांनी गांजाची तस्करी करून विक्रीसाठी आलेल्या दुकलीला 2 किलो 100 ग्रॅम गांजासह शनिवारी सायंकाळी गजाआड केले आहे. शाहनवाज उर्फ सोनू अब्दुल गफार खान ( 28 रा. न्यू आझादनगर ) व अनिस उर्फ गुड्डू मजहर खान (35 रा. न्यू आझादनगर ) असे गजाआड केलेल्या दुकलीचे नाव आहे. शहरातील नागांव रोडवरील गॅलेक्सी टॉकीजसमोर मोटार सायकलवरून दोन तस्कर गांजा विक्रीसाठी येत असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाने पोलिसांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर जाधव यांच्या मार्गदर्शनखाली पोलीस उपनिरीक्षक विजय सानप यांनी पोलीस पथकासह सापळा लावला असता दोघे गांजा तस्कर मोटार सायकलवरून बॅगेत गांजा विक्रीसाठी घेऊन आल्याचे दिसून आले.

या दोघांना पाहून पोलिसांनी हटकले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र अगोदरच सावध असलेल्या पोलिसांनी या दोघांना झडप घालून मोठ्या शिताफीने पकडून ताब्यात घेवून अटक केली. या गांजा तस्करांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये 20 हजार 100 रुपये किंमतीचा 2 किलो 100 ग्रॅम गांजा आढळून आला. दरम्यान या दुकलीजवळील 45 हजार किंमतीची होंडा मोटार सायकल ,15 हजारांचे दोन मोबाईल व 20 हजार 100 रुपये किंमतीचा 2 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करून या दोघांना रविवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 13 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक विजय सानप करीत आहे.