घरदेश-विदेशआनंद दिघेंनी पाठवली होती राम मंदिरासाठी पहिली वीट; बाबरी पाडण्याच्या ५ वर्ष...

आनंद दिघेंनी पाठवली होती राम मंदिरासाठी पहिली वीट; बाबरी पाडण्याच्या ५ वर्ष आधी!

Subscribe

अयोध्येतील राम मंदिराचे येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमीपूजन केले जाणार आहे. या भूमीपूजन सोहळ्याला देशभरातील कोणकोणत्या नेत्याला आमंत्रण दिले यावर चांगलेच राजकारण रंगले होते. दरम्यान, पंतप्रधान कार्यालयातून या भूमीपूजनासाठी अद्याप देशातील प्रमुख नेत्यांना तसेच राज्यातील मुख्यमंत्र्यांना आमंत्रण पाठवण्यात आले नसल्याचे समजते. मात्र काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आपणास आमंत्रण आले तरीही जाणार नसल्याची भूमिका व्यक्त केली होती. राम मंदिर निर्माणाच्या भूमीपूजनाकरता नरेंद्र मोदी यांनी बनवलेली चांदीची वीट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतू राम मंदिर निर्माणासाठी महाराष्ट्रातून सर्वात पहिली चांदीची वीट अयोध्येला पाठवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. ही वीट बाबरी मश्जिद पाडण्याच्या पूर्वी १९८७ साली ठाण्यातील त्याकाळचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आणि कट्टर हिंदुत्ववादी नेते धर्मवीर आनंद दिघे यांनी पाठवली होती.

शिवसेनादेखील त्याकाळी राम मंदिराच्या निर्माणासाठी अग्रेसर होती. शिवसेना प्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा राम मंदिर निर्माणासाठी उघड पाठिंबा होता. त्यामुळे कुणाच्याही ध्यानीमनी नसताना तसेच बाबरी मस्जिद पाडण्याच्या ५ वर्षआधी आनंद दिघे यांनी त्याच जागी मंदिर निर्माण करण्यासाठी पहिली चांदीची वीट बनवून घेतली. ही वीट नवरात्रोत्सवात पूजनासाठी आणण्यात आली. टेंभी नाका येथे असलेल्या कनुभाई या दागिन्यांच्या व्यापाऱ्याकडून ही वीट आनंद दिघे यांनी बनवून घेतली होती. यासंबंधी कनुभाई यांनी माहिती दिली की, ही वीट पूर्णतः चांदीची बनवलेली होती. तिचे वजन सव्वा किलो इतके होते. त्यावर जय श्रीराम असे लिहिण्यात आले होते. आनंद दिघे यांनी त्यांच्या देखरेखीखाली ती वीट बनवून घेतली होती.

- Advertisement -

पुढे कनुभाई म्हणाले की, लोकांचा उत्साह पाहून याच विटेची आणखी एक प्रतिकृती बनवण्यात आली. या प्रतिकृतीमध्ये चंदनाचे लाकूड वापरून त्यावर चांदीचा मुलामा देण्यात आला होता. खरी चांदीची वीट ही पूजा करून तार सेवकांच्या मार्फत अयोध्येला पाठवण्यात आली. तर त्या विटेची प्रतिकृती ठाण्यातील टेंभी नाका येथे सात दिवस ठेवण्यात आली होती. यावेळी अनेक ठाणेकरांनी स्वतःच्या घरातील चांदी दान म्हणून दिली होती. तसेच काही ठाणेकरांनी पैशाच्या स्वरूपात देखील मदत केली होती.

याला दुजोरा देताना शिवसेना नेते संजय रवळेकर यांनी सांगितले की, आनंद दिघे यांनी ७ दिवस टेंभी नाका येथे ती वीट दर्शनाला ठेवली होती. त्यामुळे रामभक्त रांगा लावून त्या विटेचे दर्शन घेण्यासाठी येत होते. त्यासोबत आनंद दिघे यांनी ५१ फुटी नामाचे प्रतिकृती टेंभी नाका येथे उभारली होती. आता तब्बल ३३ वर्षानंतर राम मंदिर निर्माणाला सुरूवात होत आहे. ज्याच्यासाठी शिवसेनेच्या नेत्याने पहिली चांदीची वीट पाठवली होती. मात्र शिवसेनेला या गोष्टीचा विसर पडला असावा असेच सध्या चित्र पाहायला मिळत आहे.

- Advertisement -

हेही वाचा –

केंद्राने मंजुरी दिलेल्या नव्या शैक्षणिक धोरणावर शिवसेनेची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -