घरताज्या घडामोडीशिवसेनेला एक, NCP ला वेगळा न्याय का ? सेनेच्या खच्चीकरणाने आमदारांची उघड...

शिवसेनेला एक, NCP ला वेगळा न्याय का ? सेनेच्या खच्चीकरणाने आमदारांची उघड नाराजी

Subscribe

महाविकास आघाडीचे वनमंत्री संजय राठोड यांच्याकडून कोणत्याही चौकशीशिवाय राजीनामा हा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून घेतला गेला. पण राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांवर आणि मंत्र्यांवर अतिशय गंभीर आरोपानंतरही त्यांची साधी चौकशीही लागली नसल्याबाबत आता शिवसैनिकांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर वनमंत्री असलेले संजय राठोड यांचा राजीनामा घेतला गेला. अधिवेशनाच्या आधीच विरोधकांकडून आक्रमक पवित्रा घेतला गेल्या वनमंत्री संजय राठोड यांनी नैतिक जबाबदारी घेत राजीनामा दिला. पण राष्ट्रवादीच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय झाल्याने आता शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी आहे. आमदारांची ही नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. आमदारांकडून या विषयावर थेट नाराजी व्यक्त होतानाच या संपुर्ण प्रकरणात शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा सूर आमदारांमध्ये आहे. एकुणच महाविकास आघाडीमध्ये शिवसेना संजय राठोड प्रकरणात बॅकफुटला गेली होती. पण राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय वापरला जात असल्याचे शिवसैनिकांचे म्हणणे आहे.

राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना वारंवार मिळणाऱ्या अभय प्रकरणात शिवसेनेच्या आमदारांनी आता बोलायला सुरूवात केली आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांवर अतिशय गंभीर आरोप असूनही त्या सगळ्या प्रकरणात चौकशी होत नाही. मात्र शिवसेनेच्या मंत्र्यावर मात्र नुसते आरोप झाल्यावरही त्यांची चौकशी न करता त्यांचा राजीनामा घेण्यात आला. त्यामुळेच शिवसैनिक या मुद्द्यावर आता चिडले आहेत. राष्ट्रवादीचे सामाजिक न्याय मंत्री यांच्यावर महिलेने गंभीर आरोप केला होता. तर अनिल देशमुख यांच्यावरही मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी गंभीर आरोप केले होते. पण असे असतानाही त्यांची साधी चौकशीही करण्यात आली नाही. उलट त्यांना या संपुर्ण प्रकरणात राष्ट्रवादीकडून पाठीशी घालण्यात आले. उलट दुसरीकडे मात्र संजय राठोड प्रकरणात कोणतीही चौकशी झालेली नसताना त्यांचा राजीनामा घेण्यात आला अशी नाराजी शिवसैनिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

- Advertisement -

महाविकास आघाडीत शिवसेनेचे खच्चीकरण 

परमबीर सिंह यांच्या लेटर बॉम्बनंतर या संपुर्ण प्रकरणात अनिल देशमुख यांच्या बाबतीत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या प्रकरणात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेतील असे सांगितले होते. त्यानंतर मात्र शरद पवार यांनीच या संपुर्ण प्रकरणातील भूमिका स्पष्ट केली. त्यामध्ये अनिल देशमुख हे कोरोनामुळे मुंबईत होम क्वारंटाईन असल्याचे कारण त्यांनी स्पष्ट केले. एकुणच शिवसेनेच्या कोर्टात सुरूवातीला चेंडू ढकलल्याने शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे. त्यासोबतच अनिल देशमुख प्रकरणात तसेच धनंजय मुंडे प्रकरणात राष्ट्रवादी इतके आरोप होत असतानाही मंत्र्यांना पाठीशी घालत असल्याची कुरबुर आहे. त्याचवेळी संजय राठोड यांच्या बाबतीत मात्र वेगळा न्याय लावल्याचा शिवसैनिकांचा आणि आमदारांची दबक्या आवाजातील चर्चा आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीत शिवसेनेचे खच्चीकरण होत असल्याचा आरोप आता शिवसेनेतील आमदारांकडून करण्यात येत आहे.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -