घरमुंबईदहिसरमधील रेल्वे वसाहतीत स्लॅब कोसळला

दहिसरमधील रेल्वे वसाहतीत स्लॅब कोसळला

Subscribe

दहिसर येथील रेल्वे वसाहतीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली आहे. यामुळे पुन्हा एकदा पोलीसांच्या पाठोपाठ रेल्वे कर्मचाऱ्यांच्या घराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे शहर सुरक्षित राहावं यासाठी मुंबई पोलीस डोळ्यात तेल टाकून पहारा देत असतो, पण दुसरीकडे मात्र पोलिसांचे कुटुंब सुरक्षित नसल्याचे आपण पाहिले आहे. वरळीतील पोलीस वसाहतीमध्ये घराचे छत कोसळून एक महिला जखमी झाल्याची घटना जूनमध्ये घडली होती. मात्र या घटना रेल्वेच्या वसाहतीमध्ये देखील घडत असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवारी दहिसरमधील रेल्वेच्या वसाहतीमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना घडली. त्यात कोणीही जखमी झाले नसले तरी देखील रहिवाशांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. रेल्वेने या घटनेकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी कर्मचारी संघटनांकडून केली जात असल्याचे समोर आले आहे.

नेमके काय घडले?

पश्चिम रेल्वेने कर्मचाऱ्यांसाठी वेगवेगळ्या भागांत वसाहती बांधल्या आहेत. दहिसर येथील इमारत क्रमांक २८ मध्ये छताच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील खोली क्रमांक १५ मधील लांजेकर कुटुंबीय राहते. यांच्या घरात रात्री ११ वाजण्याच्या सुमारास अचानक छताच्या स्लॅबचा काही भाग कोसळला. मात्र यामध्ये कोणीही जखमी झाले नसले तरी आम्ही भीतीच्या छायेत असल्याचे मत लांजेकर कुटुंबियाने व्यक्त केले आहे.

- Advertisement -

रेल्वे कर्मचाऱ्यांची घरं धोक्यात

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वेतनातील काही टक्के भाग दर महिन्याला देखभाल आणि दुरुस्तीसाठी घेतला जातो. मात्र असे असताना देखील वसाहतीच्या इमारतींची दुरवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे. बऱ्याचवेळा रेल्वेच्या विभागांकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप वारंवार केला जातो. या इमारतींची अक्षरश: दुर्दशा झाली आहे. पाणी गळतीमुळे स्लॅबचा भाग भुसभुशीत आणि धोकादायक झाला आहे. त्यामुळे या वसाहतीमध्ये राहणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांची घरं धोक्यात अल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.

अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी

रेल्वे कर्मचाऱ्यांच्या वसाहतींची डागडुजी करणे अत्यंत गरजेचे आहे. या आधी देखील स्लॅबचा भाग भुसभुशीत झाल्याने तो केव्हाही पडेल अशी तक्रार दाखल करण्यात आली होती. मात्र याकडे दुर्लक्ष झाल्याने स्लॅबचा भाग कोसळल्याचा आरोप कर्मचारी संघटनांकडून केला जात आहे. ही इमारत टाइप टू श्रेणीतील असून ज्या ठिकाणी बांधकामाबाबत तक्रारी आहेत, तिथे लगेचच पाहणी करुन दुरुस्ती करण्याच्या सूचना संघटनांकडून दिल्या जात आहेत. तसेच या बांधकामाबाबत आलेल्या तक्रारी गांभीर्याने न घेतल्यास त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -