घरमुंबईचोरलेली पाकिटे मिळवून देणारा अवलिया

चोरलेली पाकिटे मिळवून देणारा अवलिया

Subscribe

लोकलमध्ये प्रवाशांचे पाकीट मारण्याच्या घटना वारंवार घडतात. पैसे काढून चोर रेल्वेरुळालगत पाकीट फेकून देतात. ही पाकिटे अनेकदा कचरा वेचणार्‍या व गँगमॅननला सापडतात. यात पैसे नसल्याने तेही त्याकडे दुर्लक्ष करतात. परंतु बहुतेक पाकिटांमध्ये नागरिकांची पॅनकार्ड, आधारकार्ड, वाहन परवाना, मतदान ओळखपत्र, एटीएम, डेबिट व क्रेडीट कार्डसारखी महत्त्वाची कागदपत्रे असतात. ही कागदपत्रेही चोरीला गेल्याने अनेकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेऊन मुंबईतील यतीन नाईक (वय 53) हा अवलिया कचरा वेचणार्‍या व्यक्ती व गँगमनमार्फत ही पाकिटे जमा करत आहे. जमा करण्यात येणार्‍या पाकिटांमधील कागदपत्रांच्या आधारे यतीन नाईक त्या व्यक्तीला ते परत देण्याचे काम 11 वर्षांपासून करत आहे.

यतीन नाईक हे खेतवाडीमध्ये बहिण व मेव्हण्यांसोबत राहतात. लाला लजपतराय महाविद्यालयातून नाईक यांनी बी. कॉमपर्यंतचे शिक्षण घेतले आहे. 11 वर्षांपूर्वी नाईक यांना अंधेरी रेल्वेस्थानकातील पाणपोईजवळ एक पाकीट सापडलेे. या पाकीटात पैसे नव्हते. परंतु त्या व्यक्तीचा वाहनचालकाचा परवाना आणि पॅनकार्ड होते. वाहनचालक परवान्यावरील पत्त्याच्या आधारावर नाईक यांनी ते पाकीट त्या व्यक्तीपर्यंत पोहचवले. हरवलेले पाकीट पुन्हा मिळाल्याने त्या व्यक्तीने खुश होऊन नाईक यांना बक्षीस देत त्यांचे आभार मानले. हरवलेले पाकीट परत मिळाल्याने त्या व्यक्तीच्या चेहर्‍यावरील आनंदाने नाईक यांनाही एक आत्मिक समाधान मिळाले. यातूनच त्यांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण मिळाले. तेव्हापासून रेल्वेरुळालगत सापडलेले पाकीट परत मिळवून देण्याची मोहीमच हाती घेतली. आतापर्यंत नाईक यांनी ज्यांची पाकीटे परत केली त्यांच्या नावांची नोंद ठेवली आहे. या नोंदीने नाईक यांच्या दोन मोठ्या डायर्‍या भरल्या आहेत.

- Advertisement -

रेल्वे प्रवासात चोरीला गेलेली पाकीटे नागरिकांना मिळावे यासाठी नाईक यांनी कचरा वेचणारे, ट्रॅकमॅन, गँगमनचे एक जाळे बनवले आहेत. त्यांच्या मदतीने नाईक यांनी मोठ्या प्रमाणात कचर्‍यात फेकलेली पाकीटे मिळाली आहेत. पाकिटांमधील महत्वाच्या ओळखपत्रानुसार नाईक त्या व्यक्तीचे घर गाठतात किंवा पाकिटात असलेल्या कागदपत्रांच्या आधारे ते त्याला संपर्क करतात आणि पाकिट त्याच्या स्वाधीन करतात. हे कार्य करत असताना अनेकदा पाकीट नाईक यांनीच चोरलेले असू शकते असा संशय समोरच्या व्यक्तीला येऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन नाईक यांनी रेल्वे पोलिसांच्या मदतीने पाकिटाच्या मालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली.

ज्या व्यक्तीचा शोध लागत नसे, त्याचे पाकीट ते रेल्वे पोलिसांकडे सोपवतात. हरवलेले पाकीट त्या व्यक्तीपर्यंत पोहचवणे ही एक प्रकारची समाजसेवा आहे. त्यामुळेच हे काम मी आत्मीयतेने करतो. एखाद्याची हरवलेली वस्तू त्याच्या परत मिळाल्यानंतर त्याच्या चेहर्‍यावरील आनंदातून मला समाधान मिळते आणि हे काम मी अविरत सुरू ठेवणार आहे, असे नाईक यांनी सांगितले.

- Advertisement -

दोन दिवसांपूर्वी मी अंधेरी स्टेशनवरुन चर्चगेटच्या दिशेने चाललो असताना माझे पाकीट चोरीला गेले. पाकीट कधी चोरले गेले याची मला कल्पनासुद्धा नव्हती. पण यतीन नाईक यांचा अचानक कॉल आला आणि सदर पाकीट उद्या परत करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते.पाकीटात माझे आधार कार्ड आणि कॉलेजचे लेटर होते ज्यावर माझा नंबर होता. हे पाकीट परत मिळल्याने आनंद झाला आहे. -शंतनू पारकर,विद्यार्थी,अंधेरी.

हरवलेली पाकीट मूळ मालकाला परत मिळवून देण्यासाठीची यतीन नाईक यांचे प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. ज्या पाकिटांचे मालकांचा शोध त्यांना लागत नाहीत, अशी पाकिटे ते पोलीस ठाण्यात जमा करतात. आतापर्यंत त्यांनी अनेक पाकिटे पोलीस ठाण्यात जमा केली आहेत.
– प्रमोद बाबर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंधेरी रेल्वे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -