घरमुंबईधोकादायक,अतिधोकादायक इमारतींचा सर्वे लटकला

धोकादायक,अतिधोकादायक इमारतींचा सर्वे लटकला

Subscribe

महापालिकेचे अधिकारी निवडणूक ड्युटीवर

पावसाळ्यापूर्वी मुंबईतील अनेक जुन्या इमारतींचा सर्वे करत धोकादायक आणि अतिधोकादायक इमारतींची यादी जाहीर केली जाते. परंतु यंदा विभाग कार्यालयातील देखभाल विभागाचे अधिकारीच निवडणूक ड्युटीसाठी गेल्यामुळे अद्यापही सर्वेच्या कामाला सुरुवात झालेली नाही. त्यामुळे प्रत्यक्षात २९ एप्रिलला मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच मुंबईतील जुन्या इमारतींचे सर्वे हाती घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्यक्षात सर्वे करून यादी कधी जाहीर होणार आणि त्यानंतर नागरिकांना नोटीस पाठवून पुढील कारवाई कधी करणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबईच्या हद्दीतील सर्व महापालिकेच्या व खासगी मालकीच्या इमारतींचा सर्वे करून धोकादायक इमारती घोषित करण्यासंदर्भात महापालिकेच्यावतीने एक मार्गदर्शक धोरण बनवण्यात आले आहे. त्यानुसार मुंबईतील जुन्या इमारतींचे सर्वे हाती घेतले जातात. त्याप्रमाणे अतिधोकादायक, धोकादायक तसेच दुरुस्ती करणे आदी प्रकारच्या प्रवर्गानुसार सी-१,सी-२ ए, सी-२ बी आणि सी-३ याप्रमाणे इमारतींची यादी जाहीर केली जाते. मागील वर्षी मुंबईत ६६४ इमारती अतिधोकादायक होत्या. त्यातील १०० हून अधिक इमारती तोडून टाकण्यात आल्या होत्या. काही इमारती खाली करण्यात आल्या होत्या, तर काही इमारतींना न्यायालयाच्या आदेशानुसार स्थगिती देण्यात आली. तर काहींचा वीज व पाणी पुरवठा कापण्यात आला होता.मुंबईत अशाप्रकारे अतिधोकादायक इमारतींची यादी तयार करण्यासाठी मार्च-एप्रिलमध्ये सर्वे करण्यात येतो. परंतु यंदा या सर्वेला सुरुवातच झाली नसल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या वरिष्ठ अधिकार्‍याने दिलेल्या माहितीनुसार, विभाग कार्यालयातील देखभाल विभागाच्या अधिकार्‍यांमार्फत विभागातील जुन्या इमारतींचा सर्वे केला जातो. परंतु यंदा सर्वच विभाग कार्यालयातील अधिकारी निवडणूक कामांसाठी गेल्याने या सर्वेच्या कामाला सुरुवात झाली नसल्याचे म्हटले आहे. त्यामुळे निवडणूक मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच सर्वेचे काम हाती घेतले जाईल,असे त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय ज्या इमारती आधी धोकादायक व अतिधोकादायक म्हणून जाहीर झाल्या आहेत, त्यांचीही पुढील कारवाईची प्रक्रिया विभाग कार्यालयाच्या माध्यमातून पूर्ण केली जाते. मे महिन्यापूर्वी याबाबतची कारवाई विभाग कार्यालयांकडून होणे अपेक्षित असते. परंतु सर्वेचे कामच न झाल्याने मागील वर्षीच्या धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा आढावा घेऊन नवीन यादीनुसार कारवाई करण्यास विलंब होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -