घरमुंबईकरोनाने गुढीपाडव्याची शोभा घालवली

करोनाने गुढीपाडव्याची शोभा घालवली

Subscribe

गिरगावमधील शोभायात्रा आता अक्षय्य तृतीयेला

राज्यात पसरलेल्या करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात येणार्‍या वरळी, माझगाव, ठाणे, कल्याण व डोंबिवलीमधील शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र गिरगावमधील शोभायात्रा स्थगित करत ती हिंदू नववर्षाऐवजी 26 एप्रिलला अक्षय्य तृतीयेच्या दिवशी काढण्याचा निर्णय आयोजकांकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे गिरगावमधील शोभायात्रेचा उत्साह मुंबईकरांना अक्षय्य तृतीयेला अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

नववर्षानिमित्त राज्यामध्ये अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात शोभायात्रा काढण्यात येतात. त्यामध्येही गिरगाव, ठाणे, डोंबिवलीमधील शोभायात्रा हे आकर्षणाचा केंद्रबिंदू असतात. या शोभायात्रांना नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. परंतु, यंदा देशभरात असलेल्या करोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सर्वच आयोजकांनी शोभायात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 25 मार्चला असलेल्या नववर्षाच्या स्वागतावरही यंदा करोनाचे सावट पाहायला मिळणार आहे. परंतु, गिरगावमधील शोभायात्रा रद्द करण्याऐवजी आयोजकांनी ती नववर्षानिमित्त न काढता साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयाच्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला आहे. गिरगावामध्ये गुढीपाडवा किंवा हिंदू नववर्षानिमित्त काढण्यात येणार्‍या शोभायात्रेचे आयोजन स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानतर्फे करण्यात येते. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते दोन महिन्यांपासून याची जोमाने तयारी करत असतात. जागतिक स्तरावर करोना विषाणूचे थैमान पाहता समाजामधील द्विधा मनस्थिती आणि भीती याचा विचार करता तसेच प्रशासनालाही सहकार्य करण्याच्या भूमिकेतून यंदा ही शोभायात्रा पुढे ढकलण्याचा निर्णय प्रतिष्ठानाच्या वतीने घेण्यात आला आहे.

- Advertisement -

समाज प्रबोधनातून पाडवा साजरा

गुढीपाडवा साजरा करतानाच प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांकडून करोना विषयीची जनजागृती करण्यात येणार आहे. स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते पाडव्याच्या दिवशी गिरगावातील घरोघरी जाऊन करोना विषाणू संदर्भात ‘न घाबरता करू जागरूकता’ या अंतर्गत समाज प्रबोधनाचे काम करणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -