घरमुंबईपरीक्षा द्या... सेकदात निकाल!

परीक्षा द्या… सेकदात निकाल!

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या ऑनलाइन असेसमेंटमुळे उडालेल्या निकाल गोंधळामुळे झालेली परीक्षा विभागाची नाचक्की ही उभ्या देशाने पाहिली. त्यानंतर धुळीला मिळालेली परीक्षा विभागाची प्रतिमा सुधारण्यासाठी परीक्षा विभागाने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी विद्यापीठाने पीएचडी प्रवेश परीक्षा (पेट) परीक्षा यंदापासून ऑनलाईनरित्या घेण्याचा निर्णय घेतला. त्याहून महत्त्वाचे म्हणजे या परीक्षांचा निकाल विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षा दिल्यानंतर तातडीनेच त्यांच्या हाती देण्याचा निर्णय ही विद्यापीठाने घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतर लगेचच काही सेकंदात परीक्षेचा निकाल कळणार आहे. विद्यीपीठाच्या या निर्णयामुळे पेटची परीक्षा देणार्‍या हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

मुंबई विद्यापीठातर्फे यंदापासून पहिल्यांदाच पेट म्हणजेच पीएचडी प्रवेश परीक्षा ऑनलाईनरित्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार रविवारी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील ५६ परीक्षा केंद्रांवर घेण्यात येणार आहे. या परीक्षेसाठी सध्या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाने जोरदार तयारी सुरू केली असून ही परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी त्यांनी देव पाण्यात ठेवला आहे.

- Advertisement -

मुळात गेल्या काही दिवसांपासून विशेषकरून गेल्यावर्षी ऑनलाईन असेसमेंटच्या गोंधळामुळे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन विभागाच्या प्रतिमेला धक्का पोहचला. अनेकांनी परीक्षा विभागावर टीकेची झोड देखील उडविली. याची गंभीर दखल घेत परीक्षा व मूल्यमापन विभागाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी परीक्षा पध्दतीत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले असून याच अंतर्गत त्यांनी पेट परीक्षा ऑनलाईनरित्या घेण्याचा निर्णय घेतला आहे. ही परीक्षा घेताना या परीक्षेसाठी ऑनलाईनरित्याच पेपर सेट करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली असून या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परीक्षा पूर्ण केल्यानंतर काही सेकंदातच त्यांना निकाल कळणार असल्याची माहिती त्यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

ही परीक्षा ४ विद्या शाखेमधून ७८ विषयांमध्ये घेतली जात असून या परीक्षेला एकूण ६,१६८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या परीक्षेसाठी मुंबई विद्यापीठ परिक्षेत्रातील एकूण ४६२८ एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे, तर उर्वरित इतर शहरातूनही विद्यार्थ्यांनी मुंबई विद्यापीठाच्या पेट परीक्षेला पसंती दिली आहे. यामध्ये पुणे येथून ३२९, नाशिक २११, अहमदनगर १०० एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून इतर शहरातूनही विद्यार्थ्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे, अशी माहिती घाटुळे यांनी दिली.

- Advertisement -

महाराष्ट्राव्यतिरिक्त परराज्यातून दिल्ली येथून १८ आणि गोवा येथून एकूण १७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. तर सर्वाधिक गुजरात राज्यातून ३० विद्यार्थ्यांनी यशस्वी नोंदणी केली आहे. तसेच या परीक्षेसाठी अर्ज करणार्‍या १२ विद्यार्थ्यांनी त्यांची पदव्युत्तर डिग्री परदेशी विद्यापीठातून केली आहे.

२०१७ ला एकूण ३७०० विद्यार्थ्यांनी, तर २०१६ ला ३३५० विद्यार्थ्यांनी यशस्वी नोंदणी केली होती. मागील दोन वर्षांचा विचार करता यावर्षीची नोंदणी ही सर्वाधिक असल्याचे घाटुळे यांनी यावेळी नमूद केले. तर परीक्षा सुरू होण्याच्या एक तास अगोदर विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर पोहचण्याचे आवाहनही त्यांनी यानिमित्ताने केले आहे. या परीक्षेला दोन पेपर आहेत. पहिला पेपर ‘संशोधन पध्दती’ असा असून तो सर्व विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य आहे. तसेच दुसरा पेपर विद्यार्थ्यांच्या संबंधित विषयाचा असेल. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा असणार असल्याचे घाटुळे यांनी यावेळी स्पष्ट केले.

विज्ञान शाखेतील सर्वाधिक अर्ज
या परीक्षेसाठी यंदा सर्वाधिक नोंदणी झालेली असून विद्या शाखा निहाय नोंदणीमध्ये वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्या शाखेतून एकूण ९९६ एवढे अर्ज आले आहेत. मानव्य विद्या शाखेतून १५६८ एवढे अर्ज आले आहेत. तर सर्वाधिक विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्या शाखेतून ३२९६ एवढे अर्ज विद्यापीठाकडे प्राप्त झाले आहेत.

कसा मिळणार निकाल
विद्यार्थ्यांनी ऑनलाईन परीक्षा पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना सबमिट असे ऑप्शन दाखविण्यात येणार आहे. सबमिटवर क्लिक केल्यानंतर काही सेकंदातच विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाइलवर पासवर्ड पाठविण्यात येणार आहे. हा पासवर्ड दिल्यानंतर काही सेकंदातच विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -