घरमुंबईतुटीचा अर्थसंकल्प परत पाठवून सेनेने साधला बेस्टवर निशाणा

तुटीचा अर्थसंकल्प परत पाठवून सेनेने साधला बेस्टवर निशाणा

Subscribe

बेस्टचा तब्बल ७२० कोटी रुपयांचा तुटीचा अर्थसंकल्प शुक्रवारी महापालिकेने बेस्ट उपक्रमाकडे परत पाठवला. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपसूचनेद्वारे अर्थसंकल्प बेस्टकडे परत पाठवण्याची मागणी केली. या उपसूचनेसह प्रस्ताव महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मंजूर करत बेस्ट अर्थसंकल्प मंजुरीविना परत पाठवला. बेस्ट उपक्रम आधीच आर्थिक डबघाईला आले असून, अर्थसंकल्प मंजूर न केल्याने खर्च करण्याचे सारे मार्गच बंद होणार आहेत.

बेस्ट उपक्रमाने २०१९-20 चा ६ हजार १२४ कोटींचा अर्थसंकल्प समितीत मांडल्यानंतर सुमारे ७२० कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प स्थायी समितीत मंजूर करण्यात आला. त्यानुसार हा प्रस्ताव महापालिका सभागृहात मांडण्यात आला होता. परंतु, शुक्रवारी झालेल्या महापालिका सभेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी अर्थसंकल्प हा एक लाख रुपये शिलकीचा असणे बंधनकारक आहे. परंतु,बेस्टचा अर्थसंकल्प हा ७०० कोटी रुपये तुटीचा असल्याने तो परत उपक्रमाकडे पाठवण्यात यावा, अशी मागणी उपसूचनेद्वारे केली. बेस्ट तोट्यात असल्याने त्यांनी मोनो व मेट्रोच्या स्पर्धेत टिकण्याचा प्रयत्न करावा, उपक्रमाच्या वतीने जास्तीत जास्त मिनी बसेस चालवण्यात याव्यात अशाही सूचना केल्या.

- Advertisement -

यावर उपसूचनेसह प्रस्ताव महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी मंजुरी टाकून बहुमताच्या जोरावर अर्थसंकल्प परत पाठवला. अर्थसंकल्पावर बोलण्यसाठी विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्यासह विरोधी पक्षांच्या सदस्यांनी हात उंचावले होते. परंतु, महापौरांनीही कोणालाही बोलण्याची संधी न देता अर्थसंकल्प परत पाठवण्याची मागणी मंजूर केली. बेस्ट उपक्रम तोट्यात असून, आपल्या विविध मागण्यांसाठी कामगारांनी नऊ दिवसांचा संप केला होता. कामगारांच्या या मागण्या न्यायालयात मान्य झाल्या आहेत. त्यामुळे बेस्टला राज्य आणि महापालिकेकडून आर्थिक मदत करण्यात येईल, अशी शक्यता वर्तवली जात असताना प्रत्यक्षात महापालिकेने बेस्टला कोणतीही मदत करण्यास अप्रत्यक्ष नकार दिला आहे. बेस्टने महापालिकेला आर्थिक मदत केल्यास अर्थसंकल्प शिलकीत येऊ शकतो. परंतु, ही मदत न करता तुटीचा अर्थसंकल्प उपक्रमाकडे माघारी पाठवून शिवसेनेने संपाच्या काळात झालेल्या अपमानाचा सूड उगवला आहे.

अर्थसंकल्प मंजूर करता येत नाही हे जरी वास्तव असले तरी बेस्टची आर्थिक स्थिती पाहता महापालिकेकडून मदत करणे आवश्यक होते. त्यामुळे ही मदत जाहीर झाली असती तर बेस्टचा अर्थसंकल्प शिलकीचा झाला असता. परंतु, ही मदत न करता तुटीचा अर्थसंकल्प परत पाठवून एकप्रकारे शिवसेनेने बेस्ट उपक्रमाची आणि कर्मचार्‍यांची फसवणूक केली आहे. अर्थसंकल्प मंजूर न झाल्यामुळे याचा परिणाम उपक्रमाच्या खर्चावर होऊ शकतो.
– रवी राजा, विरोधी पक्षनेते, महापालिका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -