घरमुंबईसरकारच्या जलयुक्त शिवार योजनेकडून निधीसाठी ठेंगा

सरकारच्या जलयुक्त शिवार योजनेकडून निधीसाठी ठेंगा

Subscribe

सरकारच्या जलयुक्तशिवार योजनेतून निधी मिळणे दुरापास्त झाल्याने वडवली तलावाच्या सुशोभीकरणाचे काम लोकवर्गणीतून करावे लागत आहे. माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संघटनेने हाती घेतले आहे. ग्रामस्थांनी स्वतःहून कामाला सुरवात केल्यानंतरही अंबरनाथ नगरपरिषद मात्र अजूनही या तलावात सांडपाणी सोडत असल्याचा आरोप शिवसेनेचे नगरसेवक तुकाराम म्हात्रे यांनी केला आहे.

बदलापूर पश्चिमेकडील अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या सीमारेषेवर कल्याण-बदलापूर महामार्गाजवळ वडवली तलाव आहे. या तलावाजवळ मंदिरही आहे. नुकतेच बदलापूरचे माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे त्यांचे बंधू तुकाराम म्हात्रे, ओमकार जनसेवा मित्र मंडळ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या लोक सहभागातून तलाव सुशोभीकरणाचे काम सुरू आहे.
शासनाच्या गाळ मुक्त बंधारा योजनेंंतर्गत या तलावाला मदत मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहे. या कामासाठी अंदाजे ६० लाख रुपये खर्च येणार आहे. सरकारकडून अद्याप मदत मिळालेली नाही. केवळ अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी १० लाख रुपयांचा निधी देण्याचे तोंडी आश्वासन दिले आहे.

- Advertisement -

हा तलाव आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर हा अंबरनाथ आणि बदलापूर नगरपरिषदेच्या हद्दीत येत असून या नगरपरिषदांनीही अद्याप कुठलीही मदत दिलेली नसल्याची खंत तुकाराम म्हात्रे यांनी व्यक्त केली आहे. वडवली तलावात मोठ्या प्रमाणात सांडपाणी येत आहे. हे सांडपाणी अंबरनाथ नगरपरिषदेच्या एसटीपीप्लांट (सांडपाणी शुद्धीकरण केंद्र) मधून येत असते. हा प्लांट बंद असून सांडपाण्यावर कोणतीही प्रक्रिया न करता पाणी गटारीत सोडले जात आहे. या संदर्भात अंबरनाथ नगरपरिषदकडे वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत आहे, असा आरोप तुकाराम म्हात्रे यांनी केला. एसटीपी प्लांटच्या जागेवर खेळाच्या मैदानाचे आरक्षण होते. मात्र हे आरक्षण ऐनवेळी बदलले गेल्याने या ठिकाणी खेळाचे मैदान साकारण्यात आले नाही, असे म्हात्रे म्हणाले.

राज्य शासनाची विशेषतः भाजपाची जलयुक्त शिवार योजना कागदावरच आहे. मागील अनेक महिन्यांपासून मी या योजनेतून वडवली तलाव सुशोभिकरण करण्यासाठी मदत मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे. मात्र अद्याप कोणतीच मदत मिळाली नाही. शिवाय अंबरनाथ नगरपरिषदही मदत करण्यास तयार नाही. म्हणून आम्ही लोकसहभागातून आणि लोकवर्गणीतून तलावाच्या सुशोभिकरणाचे काम हाती घेतले आहे.
-तुकाराम म्हात्रे, नगरसेवक कुळगाव, बदलापूर नगरपरिषद

- Advertisement -

बदलापूर नगरपालिकेचे सेना नगरसेवक तुकाराम म्हात्रे म्हणतात एसटीपीमधून वडवली तलावात सांडपाणी सोडले जाते. हा त्यांचा आरोप निराधार आहे. एसटीपी प्लांट सुरू असून सांडपाण्यावर रासायनिक प्रक्रिया करूनच पाणी वालधुनी नदीत सोडले जाते. असे अंबरनाथ नगरपरिषदेचे जल अभियंता हवाळ यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -