घरमुंबईधूपप्रतिबंधक बंधारा ढासळला

धूपप्रतिबंधक बंधारा ढासळला

Subscribe

सातपाटी गावात पाणी शिरले

सातपाटी समुद्र किनार्‍यावर असलेल्या बंधार्‍याला भगदाड पडल्याने उधाणाच्या तडाख्याने समुद्राचे पाणी थेट गावात शिरल्याने अनेक घरांचे नुकसान झाले. समुद्रकिनार्‍याची धूप थांबवण्यासाठी सातपाटी समुद्रकिनार्‍यावर चौदाशे मीटर लांबीचा धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यात आला आहे. पण, या बंधार्‍याला ठिकठिकाणी भगदाडे पडली आहेत. त्यामुळे पावसाळ्यात उधाणाच्या तडाख्याने समुद्राचे पाणी गावात शिरू लागले आहे. खासदार राजेंद्र गावीत यांनी उर्वरित बंधारा बांधण्याच्या कामाला मंजुरी मिळवल्यानंतर बंधार्‍याचे काम सुुरू करण्यात आले होते. मात्र, काम अपूर्ण राहिल्याने यंदाही लाटाच्या तडाख्याने बंधारा वाहून अनेक घरांमध्ये पाणी शिरले.

पालघर तालुक्यातील प्रसिद्ध असलेल्या सातपाटी बंदराच्या समुद्रकिनारी 2002 साली तत्कालीन पेट्रोलियम मंत्री राम नाईक यांनी सामाजिक उपक्रमातून तेराशे मीटरचा संरक्षक बंधारा बांधला होता. त्यामुळे पाण्यापासून समुद्रकिनारी असलेल्या घरांचा बचाव होत असे. सततच्या लाटांच्या माराने या बंधार्‍याला ठिकठिकाणी भगदाड पडले होते. मात्र मागणी करून देखील या बंधार्‍याची दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे दरवर्षी उधाणाचे पाणी गावांमध्ये शिरू लागले आहे.

- Advertisement -

मागच्या वर्षी गावात समुद्राचे पाणी घुसून सुमारे 300 घरांचे झालेले नुकसान पाहून खासदार राजेंद्र गावितांच्या प्रयत्नाने सातपाटीच्या पश्चिमेस नव्याने 500 मीटर्स बंधार्‍याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. जुन्या बंधार्‍याला ज्याठिकाणी भगदाडे पडली ती भगदाडे बुजवण्याचे काम सुरू आहे. मात्र अन्य वाढीव अशा 1 हजार मीटर्स बंधार्‍यांची मागणी शासन पातळीवर विचाराधीन आहे. दक्षिणेकडील भागात बंधारा नसल्याने तिकडून गावात पाणी शिरण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबे चिंताग्रस्त आहेत.

दरम्यान, सातपाटी समुद्रकिनारी चौदाशे मीटर धूपप्रतिबंधक बंधार्‍यांची गरज आहे. हे पुढच्या बजेटनुसार टप्प्यात होणार असल्याचे पतन अधिकार्‍यांनी सांगितले. त्यामुळे सातपाटी किनार्‍यावर बंधार्‍याचे काम पूर्ण होत नाही तोपर्यंत दरपावसाळ्यात गावात पाणी शिरण्याचा धोका कायम राहणार आहे.

- Advertisement -

(सातपाटी गावात याही वेळी उधाणाच्या तडाख्याने समुद्राचे पाणी अनेक घरांमध्ये शिरल्याने गावकर्‍यांचे नुकसान झाले.)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -