घरमुंबई२६/११ मुंबई हल्ला: तपास अधिकारी महालेंनी अखेर कसाबला हरवले!

२६/११ मुंबई हल्ला: तपास अधिकारी महालेंनी अखेर कसाबला हरवले!

Subscribe

मुंबईला हादरवून टाकणार्‍या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला येत्या सोमवारी १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याचा तपास केलेले माजी पोलीस निरीक्षक रमेश महाले यांच्याशी ‘आपलं महानगर’ने केली विशेष बातचीत

“दिल्लीत संसदेवर ज्याने हल्ला केला त्या अफझल गुरुला तुम्ही आठ वर्षांत फासावर लटकविले नाही, त्यामुळे तुम्ही मला कधीच फासावर लटकवू शकत नाही”, असे मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील अतिरेकी अजमल कसाब नेहमी सांगायचा. पण कसाबला फासावर लटकविण्यात आम्हाला आठ वर्षांपर्यंतची वाट पहावी लागली नाही. चार वर्षे पूर्ण होण्यास सात दिवस शिल्लक असतानाच आम्ही त्याला फासावर लटकवले. जेव्हा कसाबला फासावर लटकवले त्यावेळी त्याची ही मुक्ताफळे खोटी ठरली होती. पण कसाब, हा अत्यंत धूर्त होता. तो कमी शिकला होता. पण आपला बचाव कसा करायचा हे त्याला ज्ञात होते. त्याला तसे प्रशिक्षणदेखील दिले होते. पण तो धादांत खोटे बोलत होता. आपला बचाव कसा करायचा, कसे फसवायचे हे त्याला माहित होते, २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याचा तपास करणार्‍या रमेश महालेंनी कसाब बद्दल काढलेला हा निष्कर्ष आहे. कसाब माणूस म्हणून नाही तर एक दहशतवादी म्हणूनच आपल्याला आठवतो. अशा या दहशतवाद्याला आम्ही फासावर लटकविले, याचा मला अभिमान आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे २६/११चा कट पाकिस्तानात रचला गेला, हे सिद्ध करण्यात आम्हाला यश आले, ही आमच्यासाठी महत्वाची बाब असल्याचे मुंबई क्राईम ब्रँचचे तत्कालिन पोलीस निरीक्षक रमेश महाले यांनी अधोरेखित केले.

मुंबईला हादरवून टाकणार्‍या २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याला येत्या सोमवारी १० वर्षे पूर्ण होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर २६/११ च्या अतिरेकी हल्ल्याचा तपास केलेले माजी पोलीस निरीक्षक रमेश महाले यांच्याशी विशेष बातचीत ‘आपलं महानगर’ने केली. कसाब नेमका कसा होता, अशी महालेंकडे विचारणा केली असता त्यांनी वरील निष्कर्ष काढले. ‘आपलं महानगर’शी केलेल्या विशेष चर्चेत त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या तपासातील अनेक गोष्टींचा उलगडा केला. या तपासाचा संपूर्ण प्रवास आणि कसाबबद्दलची इतर माहिती पुस्तक रुपात देखील मांडण्यात आली आहे.कसाब आणि मी या त्यांनी लिहलेल्या पुस्तकाचे येत्या २५ तारखेला प्रकाशन होणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

- Advertisement -

या दहशतवादी हल्ल्याच्या तपासाच्या अनेक गोष्टींचा उलगडा करताना ते म्हणाले की, कसाबची तब्बल ८१ दिवस मी चौकशी केली होती. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच एक दहशतवादी जिवंत सापडला होता. त्यामुळे ही तपासणी एक आव्हान होते. संपूर्ण जगांचे लक्ष याकडे लागून राहिले होते. या प्रकरणाचा सगळा कट पाकिस्तानात रचला होता, हे सिद्ध करण्याचे प्रमुख आव्हान आमच्यासमोर होते. कारण पाकिस्तान ते कधीच मान्य करणार नव्हता. पण ते आव्हान आम्ही पेलले, याचा मला अभिमान आहे. ते पुढे म्हणाले की, या संपूर्ण काळात अफवांचे पेव फुटले होते. त्याचा खूप त्रास झाला. त्याचा फायदा कसाबच्या बचावासाठी देखील केला जात होता.

पण आम्ही त्या अफवांना थारा दिला नाही. त्या खोट्या आहेत, हे आम्ही पुराव्यानिशी सिद्ध केले. त्यामुळेच कसाबला फासावर लटकवता आले. या संपूर्ण तपास यंत्रणेत आमच्यावर कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव नव्हता. सरकार आमच्या पाठीशी होते. आवश्यक ती सर्व मदत त्यांनी यावेळी आम्हाला केली, असे महाले यांनी यावेळी सांगितले.

- Advertisement -

कसाबचा गळा दाबणार होतो

कसाब आणि त्याचे साथीदार ज्या बोटीतून आले होते, त्या बोटीवरच्या तांडेलाची ज्या क्रूरपणे हत्या करण्यात आली होती, ते पाहून मन अक्षरश: विचलित झाले होते. तो मृतदेह पाहिल्यानंतर कसाबचा गळा दाबवून त्याला संपवून टाकावे, असे वाटले होते. पण आम्ही तसे काहीच करु शकत नव्हतो. त्याला शिक्षा आम्ही देऊ शकत नव्हतो. तो अधिकार न्यायालयाला होता. कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्ही त्याला शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यात यशस्वी झालो.

तो शांत बसला होता

कसाबला ज्या दिवशी फासावर लटकविण्यात आले तो दिवस मला आजही आठवतो. विशेष सेलमधून पुण्यातील येरवडा जेलमध्ये त्याला घेऊन जायचे होते. कोणाला थांगपत्ता ही लागून द्यायचा नव्हता. मुंबईतील विशेष सेलमध्ये कार्यरत असलेल्या सुरक्षा रक्षकांना देखील हे कळले नव्हते. तो दिवस मी कधीच विसरु शकत नाही. मी ज्यावेळी कसाबला भेटलो त्यावेळी त्याचा चेहरा बघण्यासारख्या होता. ‘कसाब मुझे पहचाना क्या?’ असे मी त्याला विचारले. साहब तुम जीत गये, मैं हार गया हे त्याचे शेवटचे वाक्य होते. त्यानंतर तो काहीच बोलला नाही. संपूर्ण प्रवासात तो शांत बसून होता. फासावर लटकवेपर्यंत तो काहीच बोलला नाही, अशी आठवणही महाले यांनी सांगितली.

निवृत्त झालो तरी काम सुरुच

कसाबला फाशी दिल्यानंतर अवघ्या तीन महिन्यातच महाले यांनी सेवानिवृत्ती घेतली. याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले की, ३० वर्षे पोलीस दलात सेवा बजावल्यानंतर मी माझ्या कामावर समाधानी होतो. इतर संधी देखील होत्या. पण ३० वर्षे मला माझ्या कुटुंबाला हवा तसा वेळ देता आला नव्हता. म्हणून निवृत्ती घेतली. त्याला काही विशेष कारण नाही. आता निवृत्त झाल्यानंतरही काम मात्र सुरुच आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आजही बोलावणे येते, त्याठिकाणी जाऊन त्यांना मार्गदर्शन करत असतो. त्यामुळे काम थांबलेले नाही, असे त्यांनी यावेळी नमूद केले.

म्हणून लिहिले पुस्तक

२६/११ हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एका ब्रिटिश लेखकाने द सिझ हे पुस्तक लिहले होते. त्याच्या भाषांतरित पुस्तकाचे प्रकाशन माझ्या हस्ते करण्यात आले होते. या पुस्तकात मुंबई पोलिसांविषयी अगदी नकारात्मक मजकूर लिहिण्यात आला होता. ज्यामध्ये या तपासात मुंबई पोलिसांनी काहीही काम केले नाही असे म्हटले होते. ही गोष्ट मला खटकली. या हल्ल्याचा तपास करणारे मी आणि माझे सहकारी असे जवळपास ९८ जण मिळून रात्रंदिवस आम्ही तपास करत होतो.पण त्या पुस्तकात असणार्‍या मजकुराने मला अस्वस्थ केले म्हणून मी आमच्या या तपासाबद्दल हे पुस्तक लिहायचे ठरवले. २०१५ साली पुस्तक लिहायला सुरुवात केली आणि वर्षभराच्या कालावधीत ते पूर्ण केले. आता त्याचे प्रकाशन २५ नोव्हेंबरला होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -