घरCORONA UPDATEशालेय इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरची संख्या होणार कमी

शालेय इमारतींमधील क्वारंटाईन सेंटरची संख्या होणार कमी

Subscribe

धारावीतील काळा किल्ला व ट्रान्सिट कॅम्प या दोन महापालिका शालेय इमारती क्वारंटाईन मुक्त करण्यात आल्या आहेत.

कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्याने मुंबईतील महापालिका व खासगी शाळा ताब्यात घेवून त्यांचा वापर संशयित रुग्णांना ठेवण्यासाठी त्यांचा वापर अलगीकरण केंद्र अर्थात क्वारंटाईन सेंटरसाठी करण्यात आला. परंतु शाळा सुरु होण्याबाबत अजुनही स्पष्टता नसली तरी ज्या भागांमधील कारेाना विषाणू संसर्गाचा भार कमी झाला आहे, तेथील शाळा पुन्हा ताब्यात घेतल्या जात आहेत. धारावीतील काळा किल्ला व ट्रान्सिट कॅम्प या दोन महापालिका शालेय इमारती क्वारंटाईन मुक्त करण्यात आल्या आहेत. या दोन इमारतींमध्ये १२ शाळा चालवल्या जात होत्या.

मुंबई महापालिकेच्या एकूण ११३७ शाळांमधील ३२२ शाळांचा वापर हा क्वारंटाईन सेंटरसाठी केला जात आहे. एकूण ४८ शालेय इमारतींमध्ये या शाळा आहेत. वरळीतील सी-फेस येथील शालेय इमारतीचा सर्वात प्रथम क्वारंटाईनसाठी वापर केला होता. त्यानंतर महापालिका शिक्षण विभाग व विभागीय महापालिका कार्यालय आदींच्या माध्यमातून क्वारंटाईनसाठी निवड केलेल्या शालेय इमारतींची अंतिम यादी बनवण्यात आली आहे. सुरुवातीच्या काळात संशयित रुग्णांना क्वारंटाईन करण्याकरता जागेची कमतरता असल्याने शाळांचा तथा शालेय इमारतींचा वापर करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु आता क्वारंटाईन सेंटरची संख्या वाढवली जात असून उत्तर मुंबईतील काही  विभाग वगळता उर्वरीत भागांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या थोडी फार कमी झालेली आहे. त्यामुळे शालेय इमारती आता क्वारंटाईनतून मोकळ्या करण्यात येत आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांच्यावतीने ४८ शाळांमधील ३२२ शाळांच्या जागा क्वारंटाईनसाठी यापूर्वी घेण्यात आल्या होत्या. त्यातील धारावीतील काळा किल्ला व ट्रान्झिट कॅम्प या दोन शालेय इमारती जी-उत्तर विभागाने क्वारंटाईनमधून मोकळ्या करुन दिल्या आहेत. यातील ट्रान्झिट कॅम्प शालेय इमारतीत ९ शाळा तर काळा किल्ला शालेय इमारतीत ३ शाळा भरल्या जायच्या. त्यामुळे १२ शाळांच्या जागांचे निजंतुकीकरणक करून विभाग कार्यालयाने शिक्षण विभागाच्या ताब्यात दिल्या आहेत. त्यामुळे ४८ शालेय इमारतींमध्ये ३१० शाळांमध्ये अजुनही क्वारंटाईन सेंटर सुरु असून विभाग ज्याप्रमाणे हे सेंटर मोकळी करून देईल, त्याप्रमाणे त्या शाळा ताब्यात घेतल्या जातील,असे महापालिका शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी स्पष्ट केले.

…तरीही शिक्षक क्वारंटाईन सेंटर बाहेर

- Advertisement -

ज्या शाळांचा वापर क्वारंटाईन सेंटर म्हणून होतो आहे, त्या शाळांमध्ये मुख्याध्यापक किंवा महापालिकेचे अधिकारी कार्यरत आहेत. त्यामुळे प्रत्येक शाळांच्या शिक्षकांना शाळांमध्ये उपस्थित राहण्याचे निर्देश दिले असले तरी ज्या शाळांचा वापर क्वारंटाईनसाठी होत आहे, त्या शाळांच्या शिक्षकांनी नजिकच्या शाळेत  किंवा विभाग कार्यालयात उपस्थित राहण्याच्या सूचना तेथील शालेय प्रशासकीय अधिकारी तसेच बिट ऑफिसरने दिल्या होत्या. तरीही काही शिक्षक क्वारंटाईन सेंटर बाहेर जावून उभे राहिले,असेही पालकर यांनी स्पष्ट केले. परंतु ज्या शिक्षकांना कोरोनाच्या कामासाठी नियुक्त करण्यात आले आहे, त्यांना ऑनलाईन शिक्षणासंदर्भातील नियम लागू होत नाही. कोरोना कामातून मुक्त झाल्यानंतर त्यांना पुढील निर्देश दिले जातील,असेही त्यांनी स्पष्ट केले. काही विभागांमध्ये नोंदीकरता तसेच वॉर रुममध्ये शिक्षकांची कोरोनाच्या कामासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

मुलांना पाठ्यपुस्तकासोबत तांदुळ भेट

महापालिका शाळांमधील मुलांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले जात असून शाळेच्या मुख्याध्यापकांमार्फत् या पुस्तकांचे वाटप मुलांच्या पालकांना केले जात आहे. त्यामुळे आतापर्यंत ५० टक्के पालकांना पाठ्यपुस्तकांचे वाटप केले असल्याचे पालकर यांनी स्पष्ट केले. मात्र, या पाठ्यपुस्तकाबरोबरच शाळांमध्ये खाऊ म्हणून कोरडा शिधा वितरीत करण्यात येत आहे. यासाठी शाळांमध्ये उपलब्ध असलेला तांदुळ हा तेथील विद्यार्थी पटसंख्येनुसार विभागून समान पध्दतीने वाटप करण्यात येत आहे. त्यामुळे पाठ्यपुस्तकासोबत मुलांना तांदुळही दिला जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -