घरमुंबईमोनोचा दुसरा टप्पा छान,पण तिकिट,पास स्वस्त करा

मोनोचा दुसरा टप्पा छान,पण तिकिट,पास स्वस्त करा

Subscribe

प्रवासांची मागणी

चेंबूर ते महालक्ष्मी रेल्वेतून गर्दीच्या प्रवासापेक्षा मोनोरेलचा पर्याय चांगला आहे. पण हा प्रवास आणखी स्वस्त व्हायला हवा. रेल्वेच्या तिकिटांसाठी आकारण्यात येणारे पैसे मोनोसाठीही आकारण्यात यावेत. दुसरा टप्पा प्रवासाच्या दृष्टीने अतिशय सुलभ आहे. महिन्याचा पासदेखील स्वस्त करण्यात यावा, असे मत मोनोरेलच्या प्रवाशांकडून व्यक्त करण्यात आले.

घाटकोपरच्या निवासी असणार्‍या डॉ. जिल चिटालिया यांना दररोज नोकरीसाठी महालक्ष्मी स्टेशन लोकलने गाठावे लागते. प्रवासासाठी मोनोरेलचा सुरू झालेला दुसरा टप्पा हा कमी गर्दीच्या प्रवासाचा असा आहे. पण रेल्वेसारखे परवडणारे तिकीट मोनोरेलला आकारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक या प्रवासासाठी ४० रूपये इतके तिकीट आहे. मात्र लोकलचे तिकिट अवघे १० रूपये आहे. प्रवासासाठी जवळपास तितकाच ४० मिनिटांचा वेळ या संपूर्ण टप्प्यासाठी लागतो. म्हणूनच तिकिटाचा दर कमी व्हायला हवा, अशी मागणी त्यांनी केली. ट्रेनची सध्याची फ्रिक्वेन्सी सरासरी २० ते २२ मिनिटे इतकी आहे. ही वेळ कमी व्हायला हवी, असेही त्यांनी सांगितले. महालक्ष्मी येथे राहणारे सुरेश जैन हे दरवर्षी चेंबूर येथे शिवरात्रीच्या निमित्ताने दर्शनासाठी येतात. मी वर्षात एक ते दोन वेळा चेंबूरमध्ये दर्शनासाठी येतो. पण यंदा मोनोरेलचा पर्याय माझ्यासाठी उपयुक्त ठरला, असेही त्यांनी सांगितले. मोनोरेलच्या प्रवासासाठीचे तिकीट महागडे असले तरीही दररोज प्रवास करणार्‍यांसाठी सवलतीचा मासिक पास मिळणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी यावेळी मांडले.

- Advertisement -

आपल्या नातवाला जॉय राईडसाठी आणणार्‍या चारूलता कुलकर्णी यांनी मोनोरेलचा बहुप्रतिक्षित टप्पा सुरू केल्याबद्दल मोनो रेल्वेचे आभार मानले आहेत. आम्ही खूप वर्षांपासून मोनोरेलच्या प्रतिक्षेत होतो. घाटकोपरच्या रहिवासी असलेल्या चारूलता कुलकर्णी आपला नातू देवांश सोबत पहिल्या टप्प्याच्या प्रवासासाठी येत होत्या. पण आता दुसरा टप्पा सुरू झाल्याने दैनंदिन कार्यालयाचा प्रवास करणार्‍यांसाठी ही सेवा अतिशय उपयुक्त ठरेल, असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला. मोनोरेलचा दुसरा टप्पा आधीच सुरू व्हायला हवा होता, पण उशिरा का होईना या सुरू झालेल्या टप्प्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -