घरक्रीडाराजमाता जिजाऊ, देना बँक उपांत्य फेरीत

राजमाता जिजाऊ, देना बँक उपांत्य फेरीत

Subscribe

राजमाता जिजाऊ, शिवशक्ती या संघांनी महिलांमध्ये तर देना बँक, महिंद्रा यांनी पुरुषांमध्ये ‘मुंबई महापौर चषक’ कबड्डी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. महिलांमध्ये गतविजेते महात्मा गांधी स्पोर्ट्स विरुद्ध राजमाता जिजाऊ स्पोर्ट्स, शिवशक्ती विरुद्ध सुवर्णयुग स्पोर्ट्स अशा, तर पुरुषांत महिंद्रा विरुद्ध देना बँक, मध्य रेल्वे विरुद्ध मुंबई बंदर अशा उपांत्य फेरीतील लढती होतील.

महिलांच्या उपांत्यपूर्व फेरीत राजमाता जिजाऊ स्पोर्र्ट्स क्लबने स्वराज्याचा ४४-०७ असा धुव्वा उडवला. सायली केरीपाळे, स्नेहल शिंदे, पूनम तांबे, पायल घेवरे यांच्या चांगल्या खेळामुळे राजमाताने हा विजय मिळवला. दुसर्‍या सामन्यात गतविजेत्या महात्मा गांधी स्पोर्ट्सने डॉ. शिरोडकरचे कडवे आव्हान ३६-३२ असे संपवले. मध्यांतरापर्यंत १८-१३ अशी आघाडी घेणार्‍या महात्मा गांधीने उत्तरार्धात सावध खेळ करत हा विजय साकारला. मीनल जाधव, तृप्ती सोनावणे, सृष्टी चाळके यांनी महात्मा गांधीकडून दमदार खेळ केला. शिवशक्ती महिला संघाने शिवतेज क्रीडा मंडळाचा ३५-०८ असा पराभव केला. मध्यांतरापर्यंत धडाकेबाज खेळ करत शिवशक्तीने २३-०५ अशी आघाडी मिळवली होती. सोनाली शिंगटे, अपेक्षा टाकले, पौर्णिमा जेधे, रक्षा नारकर शिवशक्तीकडून उत्कृष्ट खेळल्या. शेवटच्या सामन्यात सुवर्णयुगने जय हनुमान मंडळाचा प्रतिकार २७-२१ असा परतवून लावला. सुवर्णयुग संघाने विश्रांतीला १९-०८ अशी आघाडी घेतली होती. स्वाती खंदारे, सोनाली इंगळे सुवर्णयुग संघाच्या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

- Advertisement -

पुरुषांच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात देना बँकेने एअर इंडियाला ४३-३५ असे पराभूत केले. चढाईपटू नितीन देशमुखने आपल्या एका चढाईत ४ गडी टिपल्यामुळे बँकेला मध्यांतराला १९-१८ अशी निसटती आघाडी मिळाली. नितीन देशमुख, श्रेयस ठाकरे, राजू कथारे, परेश म्हात्रे हे बँकेकडून, तर पंकज मोहिते, असलम इनामदार, आदित्य शिंदे हे एअर इंडियाकडून उत्तम खेळले. या पराभवामुळे एअर इंडियाचे सलग पाचव्या विजेतेपदाचे स्वप्न भंगले. महिंद्राने मुंबई पोलीसचा २७-०८ असा पराभव करीत उपांत्य फेरी गाठली. अनंत पाटील, विलास जाधव, अमोल वडार, सुहास घागरे यांच्या झंजावाती खेळाला या विजयाचे श्रेय जाते. मुंबई बंदरने बी. ई. जी. संघाला ३५-२९ असे नमवले. पहिल्या डावात मुंबई बंदरकडे १५-११ अशी आघाडी होती. अनिरुद्ध देशमुख,शुभम, किरण मगर, मनोज बेंद्रे मुंबई बंदरकडून उत्कृष्ट खेळले. शेवटच्या सामन्यात मध्य रेल्वेने न्यू इंडिया इन्शुरन्सचा ३१-२१ असा पराभव केला. चेतन थोरात, रोहित पार्टे,परेश चव्हाण,सूरज बनसोडे या विजयात चमकले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -