घरमुंबईरेल्वेने माझ्या मुलाचा बळी घेतला, म्हणून मी ट्रेनवर दगडफेक करतो

रेल्वेने माझ्या मुलाचा बळी घेतला, म्हणून मी ट्रेनवर दगडफेक करतो

Subscribe

अटक पित्याची पोलिसांकडे कबुली ,दगडफेकीचे चार गुन्हे दाखल

रेल्वे अपघातात मुलाचा झालेल्या मृत्युमुळे रेल्वेला दोषी ठरवून रेल्वेवर दगडफेक करणार्‍या एका पित्याला कुर्ला पोलिसांनी कांजूरमार्ग आणि विक्रोळी स्थानकादरम्यान अटक केली आहे. गेल्या महिन्यात त्याने केलेल्या दगडफेकीत ४ जण जखमी झाले असून त्यात एका रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाचा समावेश आहे. कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात त्याच्यावर ४ वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हाही आहे.

कृष्णा तिनप्पा शेलेटी (५५) असे अटक करण्यात आलेल्या पित्याचे नाव आहे. तो कुटुंबासोबत विक्रोळी पूर्व टागोर नगर येथे राहतो. एप्रिल महिन्यात विक्रोळी आणि कांजूरमार्गदरम्यान धावत्या ट्रेनवर दगडफेकीचे चार गुन्हे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या दगडफेकीमुळे चार प्रवाशी गंभीररीत्या जखमी झाले होते. जखमींमध्ये ठाणे रेल्वे सुरक्षा दलाचा एक जवान देखील गंभीर जखमी झाला होता.

- Advertisement -

या गुन्ह्याचा तपास सुरु असताना एक इसम कांजूरमार्ग आणि विक्रोळी रेल्वे स्थानकादरम्यान हातात दगड घेऊन उभा असल्याचे एका दक्ष प्रवाशाने रेल्वे पोलीस नियंत्रण कक्षाला सांगितले. ही माहिती कुर्ला रेल्वे पोलिसांना मिळताच पोलिस पथकाने सदर ठिकाणी धाव घेऊन शेलेटी याला ताब्यात घेतले. त्याला पोलीस ठाण्यात आणून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. रेल्वेने दोन वर्षांपूर्वी माझ्या मुलाचा बळी घेतला आहे, म्हणून मी रेल्वेला अद्दल घडवण्यासाठी ट्रेनवर दगडफेक करतो, परंतु मला कुठल्याची प्रवाशाला दुखापत करायची इच्छा नाही असे त्याने पोलिसांना सांगितले. कुर्ला रेल्वे पोलिसांनी शेलेटी याला चार गुन्ह्यात अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी कृष्णाने जे काही पोलिसांना सांगितले त्याची आम्ही खात्री करून घेतली जात आहे, २ वर्षांपूर्वी खरोखरच त्याचा मुलाचा रेल्वे अपघातात मृत्यू झाला आहे का हे पडताळून पहात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -