घरमुंबईपोलीस पतीचा निष्काळजीपणा पत्नीच्या जीवावर बेतला

पोलीस पतीचा निष्काळजीपणा पत्नीच्या जीवावर बेतला

Subscribe

पोलीस अधिकारी पतीच्या निष्काळजीपणामुळे त्याच्या पत्नीला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना मुंबईतील एका मॉलमध्ये घडली. स्मिता सारंग (५०)असे या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. कार आणि पिलरमध्ये चिरडून तिचा मृत्यू झाला. स्मिता यांचे पती सुधाकर सारंग (५२) हे मुंबई पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक आहेत. सध्या एका प्रकरणात त्यांना पोलीस दलातून निलंबित करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सुधाकर सारंग हे पत्नी स्मिता आणि दोन मुलासह वांद्रे पूर्व पोलीस वसाहत या ठिकाणी राहतात. सारंग यांची दोन्ही मुले उच्चशिक्षित असून दोघेही खाजगी कंपनीत चांगल्या पदावर नोकरी करतात. २६ जानेवारी रोजी मुलांना सुट्टी असल्यामुळे सारंग सहकुटुंब स्वतःच्या स्विफ्ट मोटारीतून मुंबई फिरण्यासाठी आले होते. ताडदेव येथील सोबो मॉलमध्ये खरेदी करून त्यानंतर दुपारचे जेवण हॉटेलमध्ये करण्याचा बेत सारंग कुटुंबाने आखला होता. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास सारंग कुटुंब ताडदेव येथील सोबो मॉलच्या बेसमेंटमध्ये आले

- Advertisement -

दरम्यान त्यांची पत्नी आणि मुले गाडीतून बाहेर येऊन उभे राहिली. पत्नी स्मिता पार्कींग जवळ असणार्‍या पिलरजवळ उभ्या होत्या. सुधाकर सारंग हे गाडी पार्क करीत असताना त्यांच्याकडून गाडी मागे घेण्याऐवजी पुढे गेली. बेसावध असलेल्या स्मिता यांना गाडीची धडक बसून त्या कार आणि पिलरच्यामध्ये चेपल्या गेल्या.

त्यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन त्या निपचित पडल्या. अचानक झालेल्या या प्रकारामुळे मुलांनी मदतीसाठी आरडाओरड केली. त्यावेळी पार्कींगमध्ये असणार्‍या कामगारांनी धाव घेऊन जखमी स्मिता यांना बाहेर काढून भाटिया रुग्णालयात आणले. मात्र डॉक्टरांनी स्मिता यांना तपासून मृत घोषित केले. या घटनेची माहिती ताडदेव पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी रुग्णालयात धाव घेतली. पोलिसांनी पत्नी स्मिता यांच्या मृत्यूस कारणीभूत असणारे पोलीस उपनिरीक्षक सुधाकर सारंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही.

- Advertisement -

मी मजेलाईन सर्व्हिसेस या कंपनीत व्हलेट पार्कीग सुपरवायजर म्हणून सोबो सेंटर मॉलमध्ये नोकरी करतो. २६जानेवारी रोजी सकाळी आमच्या व्हलेट पार्किंग केबीनमध्ये जाऊन बसलो असताना साधारण ११:५० वाजण्याच्या सुमारास पार्कींगमध्ये गाडी धडकल्याचा मोठा आवाज झाला. त्यापाठोपाठ एका महिलेचा जोरात ओरडण्याचा आणि रडण्याचा आवाज आल्यामुळे मी केबीनमधून बाहेर पार्कींगच्या दिशेने धावत गेलो. त्यावेळी पार्कींगमध्ये कार आणि सिमेंट पिलर या दोन्हीच्या मध्ये एक महिला चेंगरुन जखमी झालेली होती. तिच्या डोक्यातून मोठा रक्तस्त्राव होत होता. तिच्या सोबत असणार्‍या तिच्या कुटुंबीयांनी आणि आमच्या इतर कर्मचार्‍यांनी जखमी महिलेला बाहेर काढून भाटिया रुग्णालयात आणले असता तेथील डॉक्टरानी तिला तपासून मृत घोषित केले.
– यलराज सुका तांदुळकर, पार्कींग कर्मचारी

ही दुर्घटना मृत महिलेच्या दोन्ही मुलांच्या डोळ्यादेखत झालेली असून दोन्ही मुलांचा जबाब नोंदवण्यात आलेला आहे, तसेच या घटनेत कुठलाही संशयित प्रकार अद्याप आढळून आलेला नाही. या प्रकरणी पत्नीच्या मृत्यूस कारणीभूत असणारे पती सुधाकर सारंग यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. – संजय सुर्वे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, ताडदेव.

सुधाकर सारंग हे पोलीस उपनिरीक्षक म्हणून अमली पदार्थविरोधी पथक आझाद मैदान युनिटमध्ये कार्यरत होते. मात्र लेडी ड्रगमाफिया बेबी पाटणकर प्रकरणात इतर अधिकार्‍यांसोबत सारंग यांच्यावरदेखील गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक झाली होती. दरम्यान त्यांना खात्यातून निलंबित करण्यात आलेले आहे. ते सध्या जामिनावर बाहेर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -