घरमुंबईशहापूरमधील मुमरी धरणाचे काम सुरू!

शहापूरमधील मुमरी धरणाचे काम सुरू!

Subscribe

मुमरी धरण प्रकल्पाला जलसंपदा विभागाचा हिरवा कंदील २०६ कोटी रुपयांच्या प्रकल्पामुळे ४२ गावांना होणार सिंचन

स्थानिक शेतकर्‍यांच्या आक्रमक विरोधामुळे गेली पंधरा वर्षे रखडलेल्या ठाणे जिल्ह्याच्या शहापूर तालुक्यातील मुमरी धरण प्रकल्पाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. शहापूर तालुक्यातील सारंगपुरी येथील सरकारच्या जलसंपदा विभागाच्या या नियोजित मुमरी धरण प्रकल्पाला होणारा शेतकर्‍यांचा विरोध मावळला आहे. तसेच प्रकल्पाला आवश्यक असलेली वनखात्याची जागा आणि इतर महत्त्वाच्या शासकीय परवानग्या मिळाल्या आहेत. जलसंपदा विभागाच्या सुधारित २०६.०३ कोटी इतक्या मुमरी धरणाच्या खर्चाच्या अंदाजपत्रकाला जलसंपदा विभागाची प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने आता प्रकल्पाचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे.

शहापूर तालुक्यातील सारंगपुरी आणि खैरे या परिसरात मुमरी धरण बांधले जाणार असून या धरणाच्या पाणी बुडीत क्षेत्रात स्थानिक शेतकर्‍यांची २३१ हेक्टर जमीन जात असल्याने त्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला जात आहे. या प्रकल्पात वनखात्याची ४१२ हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जागेच्या मोबदल्यात केंद्र सरकारच्या वन आणि पर्यावरण खात्याला एकूण ७६ कोटी रुपये जलसंपदा विभागाकडून भरल्याने या प्रकल्पाला अंतिम मंजुरी मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. जलसंपदा विभागाच्या भातसा धरण कार्यालय अंतर्गत मुमरीचे काम सारंगपुरी येथील नियोजित जागेवर सुरू करण्यात आले आहे. सुरुवातीला १०० कोटी आणि त्यानंतर १७५ कोटी रुपये खर्च अपेक्षित असलेल्या या मुमरी धरणाचा खर्च आता २०६.०३ कोटी रुपयांच्या घरात जाऊन पोहोचला आहे. या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता मिळाली असून प्रकल्पाचा खर्च यापेक्षा अधिक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

- Advertisement -

मुमरी प्रकल्प हे मातीतील धरण असून या धरणाची एकूण लांबी १२४० मी. इतकी आहे, तर ४९. ९० मी. इतकी महत्तम उंची या धरणाची असणार आहे. या धरणात एकूण पाणीसाठा ७२.४० दशलक्ष घनमीटर २.५५ टीएमसी इतका असेल. धरणाच्या डाव्या बाजूच्या कालव्याद्वारे शहापूर तालुक्यातील १८ गावं तर कल्याण तालुक्यातील २४ गावं अशा एकूण ४२ गावातील ६३२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे धरण झाल्यास मोठ्या प्रमाणात शेतकर्‍यांचे शेतीक्षेत्र ओलिताखाली येणार असल्याने दुबार पिके घेणार्‍या शेतकर्‍यांना खर्‍या अर्थाने या पाण्याचा अधिक उपयोग होणार आहे.

अविनाश उबाळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -