घरमुंबईकेडीएमटीत खडखडाट

केडीएमटीत खडखडाट

Subscribe

बसेस दुरूस्तीसाठी पैसे नाहीत, 50 बसेस धुळखात पडून

कल्याण डोंबिवली महापालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी नवीन विकास कामांना ब्रेक लावला असतानाच दुसरीकडे केडीएमटीचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. केडीएमटीला कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी पालिकेवर अवलंबून राहावे लागत असतानाच आता पालिकेच्या कमकुवत स्थितीमुळे केडीएमटी आणखीनच डबघाईला आली आहे. शहरात रिक्षांची संख्या वाढल्याने प्रवासी संख्याही घटली आहे. सध्या केडीएमटीकडे बसेस दुरूस्तीसाठी पैसे नसल्याने दुरुस्ती अभावी साधारण 50 ते 55 बसेस आगारातच उभ्या आहेत. त्यामुळे आर्थिक कोंडीतून केडीएमटीला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे आहे.

केडीएमटीच्या ताफ्यात आजच्या घडीला 218 बसेस असल्या तरी त्यातील 65 बसेस रस्त्यावर धावत आहेत. त्यातील शंभर बसेस जुन्या आहेत. 70 बसेस सात वर्षापेक्षा अधिक कालावधी झाला असल्याने त्यांचा लिलाव करण्यात येणार आहे. तर उर्वरित अनेक बसेस नादुरुस्त अवस्थेत आहेत. बसेसचे टायर बदलणे, मेन्टनन्स आदी कामे करण्यात आलेली नाहीत. परिवहन उपक्रमाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने अनेक बसेस दुरुस्ती अभावी आगारातच उभ्या आहेत. केडीएमटीचे दरमहा उत्पन्न दीड कोटी रूपये आहे. मात्र वेतन, इंधन, स्पेअर पार्ट, पासिंग आदींवरील दरमहा खर्च हा 3 कोटी 10 लाख रूपये आहे. उत्पन्नापेक्षा खर्चच अधिक असल्याने कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी परिवहनकडे पैसे शिल्लक राहत नाहीत. त्यामुळे 2009 पासूनच केडीएमटी पालिकेवर अवलंबून आहे. केडीएमटीचे 576 कायम तर 72 अस्थायी कर्मचारी आहेत. कर्मचार्‍यांचे वेतन आणि पीएफ असा दरमहा 1 कोटी 68 लाख रूपये वेतन आहे. परिवहन आर्थिक डबघाईला असल्याने पालिेकेवरच अवलंबून राहावे लागते. त्यामुळे पालिकेकडूनच कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी सव्वा कोटी रूपये अदा करते. तसेच कर्मचार्‍यांची थकबाकी 50 कोटी आणि सानुग्रह अनुदानापोटी 67 कोटी रुपये देणे आहे.

- Advertisement -

मागील आठवड्यात झालेल्या महासभेत पालिका आयुक्त गोविंद बोडके यांनी विकासकामांच्या नवीन फाईल मंजूर केल्या जाणार नाहीत. अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी प्रशासन विरूद्ध लोकप्रतिनिधी असा संघर्ष पाहावयास मिळाला. मात्र त्यानंतर आयुक्त बोडके यांनी आर्थिक स्थितीचा आढावा घेईपर्यंत नवीन विकास कामे स्थगित करण्याचे लेखी आदेशच जारी केले आहेत. सध्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेतल्यानंतरच पुढील निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. एकिकडे पालिकेची आर्थिक् स्थिती कमकुवत असल्याचे स्पष्ट होत असतानाच दुसरीकडे पालिकेवरच परिवहनचे अवलंबत्व आहे. यापूर्वी अनेकवेळा परिवहन कर्मचार्‍यांच्या वेतनाची दिरंगाई कर्मचार्‍यांना सहन करावी लागली होती. भविष्यात ही दिरंगाई वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिवहन सेवा 1999 मध्ये स्थापन झाली. दररोज आठ लाख रूपये उत्पन्न केडीएमटीच्या तिजोरीत जमा व्हायचे. सुरुवातीला फायद्यात असणार्‍या या सेवेला 2005 नंतर घरघर लागली.

26 जुलै 2005 च्या महापुरात केडीएमटीच्या 70 ते 80 बसेस पाण्याखाली गेल्याने नुकसान झाले होते. त्यानंतर अजूनही परिवहन सेवा सावरलेली नाही. केडीएमटीच्या खासगीकरणाचा प्रस्तावही प्रशासनाकडून तयार करण्यात आला. मात्र हा प्रस्तावावर निर्णय झालेला नाही. रिक्षांचे परमीट खुले केल्याने रिक्षांची संख्या वाढली मात्र बसेसची संख्या कमी होत गेली त्यामुळे प्रवाशांचा फटका परिवहनला बसला आहे.

- Advertisement -

काय आहे अंदाजपत्रकात

यंदाचा 97 कोटी 88 लाखांचा आणि 4 कोटी 30 लाखांचा शिलकीचा अंदाजपत्रक परिवहन व्यवस्थापक मारूती खोडके यांनी नुकताच सादर केला. महसुली खर्च 72 कोटी 85 लाख, कर्मचारी वेतनावर 25 कोटी 81 लाख होणार आहे. वाहन दुरुस्ती देखभालीसाठी 14 कोटी 83 लाख तर इंधनासाठी 16 कोटी 75 लाखाची तरतूद आहे. वाहननोंदणी कर्मचारी विमा 3 कोटी 31 लाख तरतूद करण्यात आली. पाच ठिकाणी सीसी कॅमेरे जीपीएस यंत्रणा कंट्रोल रूम संगणकीकरण दीड कोटीची तरतूद केली आहे. दररोज प्रवास करणार्‍या 35 ते 40 हजार प्रवाशांकडून परिवहनला एक कोटी 40 लाख मिळतात. त्यामुळे प्रवासी वाहतुकीतून परिवहनला 33 कोटी 77 लाख उत्पन्न तर इतर मिळकतीतून 5 कोटी 61 लाख आणि जाहिरातीच्या माध्यमातून दीड कोटी उत्पन्न अपेक्षित धरले आहे.

परिवहनची आर्थिक स्थिती खराब आहेच त्यामुळे अनेक बसेस दुरुस्ती अभावी उभ्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. पण बसेसच्या मेन्टेनन्सचे (एएमसी) काम कंत्राटदारामार्फत देण्याचा प्रशासनाचा विचार सुरू आहे. त्यामुळे संबंधित कंत्राटदाराकडून बसेसची दुरूस्ती केली जाईल, प्रति किमीप्रमाणे त्या कंत्राटदाराला परिवहनकडून पैसे दिले जातील. त्यामुळे बसेस दुरुस्ती होऊन रस्त्यावर जास्तीत जास्त बसेस धावू शकतील. सध्या 60 ते 65 बसेस बाहेर पडत आहेत. दररोज 100 ते 110 बसेस रस्त्यावर बाहेर पडल्यानंतर परिवहनच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. त्यामुळे पालिकेची आथिर्क स्थिती सुधारण्याकडे प्रशासन प्रयत्नशील आहे.
– मारूती खोडके, परिवहन व्यवस्थापक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -