घरमुंबईबाप्पांच्या आगमनाला पारंपारिक वाद्ये दुर्मिळ

बाप्पांच्या आगमनाला पारंपारिक वाद्ये दुर्मिळ

Subscribe

मोबाईलमध्येच आरती,टाळ ढोलकीच्या जागी डीजे

सणासुदीचा श्रावण महिना सुरू झाला की वेध लागतात ते बाप्पांच्या आगमनाचे. सणांमध्ये विविध खेळांसह भजन आणि कीर्तन मोठ्या प्रमाणावर आयोजित केले जाते. त्यावेळी वाद्यांमध्ये टाळ, मृदुंगासोबतच ढोलकीचा मानही मोठा असतो. मात्र ढोलकीच्या तालावर नाचणारी, गाणारी पिढी लोप पावत चालली असल्यामुळे संपूर्ण कोकण पट्ट्यामध्ये ढोलकी व्यवसायाला उतरती कळा लागली आहे. पनवेल परिसरतील ढोलकी वाद्याची मागणी कमी झाली आहे. टाळ, मृदुंगाची मागणीही खूपच कमी झाली आहे.

नुकत्याच सुरु झालेल्या श्रावण महिन्यामधील मंगळागौर, नारळी पौर्णिमा, श्रीकृष्ण जन्माष्टमी, गणेशोत्सव आदी सणांमध्ये पारंपरिक गाणी गाण्याची परंपरा असल्याने याठिकाणी ढोलकी हे प्रमुख वाद्य असते. त्यामुळे श्रावण आला की, ढोलकी व्यावसायिकांची लगबग वाढत जाते. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या व्यावसायिकांच्या पदरी निराशा पडत आहे. ढोलकीची किंवा चर्म, तालवाद्यांची दुरुस्ती करण्यासाठी येणार्‍यांची संख्या कमी झाली आहे. तबल्याला शाई लावणे, चर्मताण योग्य करणेे आदी कामे करणार्‍या कारागिरांच्या हाताला आता काम मिळेनासे झाले आहे.

- Advertisement -

डिजेच्या काळात ढोलकसारखी चर्मवाद्येही कमी होत आहेत. गणेश आगमन आणि विसर्जनातही ढोलकबाजा महत्वाचा मानला जात होता. मात्र आता डिजेमुळे हा प्रकारही कमी झाला आहे. तर काही ठिकाणी मोबाईलवरच आरती म्हटली जात असल्याने त्यातही भक्तीभाव यांत्रिकी झाला आहे. एकेकाळी गणेशोत्सव किंवा नवरात्र उत्सवाच्या काळात बेंजो बुलबूल वाद्याला मागणी होती. गणेश आगमनात या बुलबुलचे स्थान मोठे होते. आता हे तारवाद्यही दिसेनासे झाले आहे. अशी अनेक वाद्ये आधुनिक म्युझिक सिस्टीममुळे कमी झाली आहेत. ढोलक, ढोलकी वाजवणारे कारागिरांना पुरेसे काम मिळत नसल्याचे चित्र आहे.

सध्याचे डिजिटल युग असल्यामुळे नवी पिढी मोबाईलद्वारे गाणी वाजवित आहे. तसेच काहीजण गणपतीची आरतीही मोबाईलवर वाजवून गणरायाला पावन करण्याचे जणू साकडे घालतात. आज सणाला तितकसे महत्व दिले जात नाही आहे. त्यामुळे निव्वळ वडिलोपार्जित व्यवसाय असल्यामुळे ही दुकाने पुढे चालवली जात आहेत. यामध्ये केवळ गंमत म्हणून लहान मुलांसाठी दारोदार येणार्‍या ढोलक्या घेण्यात सध्याची पिढी अग्रेसर आहे. परिणामी मुख्य ढोलकी व्यवसायाला ग्रहण लागल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -