घरनवी मुंबईMumbai : ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई-नवी मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान

Mumbai : ट्रान्स हार्बर सी लिंकमुळे मुंबई-नवी मुंबईकरांचा प्रवास होणार वेगवान

Subscribe

मुंबई-नवी मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान आणि सुखकर होणार आहे. कारण देशातील सर्वात लांब समुद्री पूल असणारा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक हा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे.

मुंबई : मुंबईतला प्रवास हा कायमच वाहतूक कोंडीमुळे कंटाळवाणा होत असतो. त्यामुळे मुंबईकरांना वाहतुक कोंडीचा त्रास सहन करावा लागतो. त्यातही नवी मुंबई येथून मुंबईच्या दिशेने प्रवास करताना मात्र हाल होत असतात. मात्र, आता हे हाल आणि होणारा त्रास थांबणारा असून मुंबई-नवी मुंबईकरांचा प्रवास हा वेगवान आणि सुखकर होणार आहे. कारण देशातील सर्वात लांब समुद्री पूल असणारा मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक हा मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. नवी मुंबई ते मुंबई हा प्रवास हा मार्ग खुला झाल्यानंतर अवघ्या 20 मिनिटांत पार करता येणार आहे. त्यामुळे सीएसटी ते एक्सप्रेसवे हा प्रवास तब्बल अर्धा तासाने कमी होणार आहे. (Trans Harbor Sea Link will speed up the journey of Mumbai-Navi Mumbaikars)

हेही वाचा – MHADA Lottery : म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती होणार कमी; गृहनिर्माणमंत्र्यांची घोषणा

- Advertisement -

मुंबई ट्रान्सहार्बर सी लिंक हा मार्ग 22 किलोमीटर इतका लांब आहे. 22 किमीच्या या शेवटच्या डेकचे काम पूर्ण झाले असून समुद्रावर पॅकेज 1 आणि पॅकेज 2 जोडण्यात आले आहे. मुंबई ट्रान्स हार्बर सी लिंक जवळपास 18 किमी समुद्रातून असून इतर पावणे चार किमीचा मार्ग हा जमिनीवरील आहे. हा मार्ग लवकरच सुरू होणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांची वाहतूक कोंडीतून मुक्तता होणार आहे. हा मार्ग दक्षिण मुंबईला न्यू एअरपोर्ट इन्फ्लुएंस नोटिफाइड एरिया (NAINA) आणि मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेशी जोडण्यात येणार आहे. या मार्गामुळे प्रवाशांच्या वेळेत किती बचत होईल, याचीही चाचणी करण्यात आली आहे. सीएसएमटी ते मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग या प्रवासाला 68 मिनिटे लागतात. या पुलामुळे दळणवळण तसेच दक्षिण मुंबईतील वाहतूक देखील सुधारणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

हा मार्ग देशातील सर्वात लांब आणि जगातील 12 वा सर्वात लांब सागरी पूल असणार आहे. दक्षिण मुंबई, ठाणे खाडी ओलांडून नवी मुंबईच्या बाहेरील भागात चिर्ले येथे हा पूल संपतो. सीएसएमटी ते सायन-पनवेल मार्गे कळंबोली जंक्शनवर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेच्यापर्यंतच्या नॉन-पीक अवर्समध्ये प्रवासाचा कालावधी हा कमी होणार आहे. एमटीएचएल चिकल इंटरचेंजवरून एक्स्प्रेसवेवर जाण्यासाठी, वाहन चालकाला कळंबोलीपूर्वी 16 किमी अंतरावर असलेल्या पळस्पे फाटा येथे जावे लागेल. त्यामुळे मुंबईतील शिवडीतून नवी मुंबईत केवळ 20 मिनिटांत पोहोचता येईल.

- Advertisement -

मुंबई-पुणे हायवेला हा मार्ग पुढे जोडला जात असल्यामुळे या मार्गामुळे मुंबई-पुणे अंतरही कमी होणार आहे. पुढे हा मार्ग राज्य महामार्ग क्रमांक 54 लाही जोडला जाणार आहे. हा मार्ग या महिन्याच्या अखेरपर्यंत वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. एमटीएचएलचा हा प्रकल्प महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे मुंबई आणि नवी मुंबई ही दोन शहरे अतिशय जवळ येणार आहे. या ट्रान्स हार्बरमुळे लाखो प्रवासी केवळ 15 ते 20 मिनिटांमध्ये नवी मुंबईतून मुंबईत पोहोचू शकतील. सध्या या प्रवासासाठी एका तासापेक्षा जास्त वेळ लागतो. तोच तासभराचा प्रवास आता वेगवान होणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -