घरमुंबईगैरप्रकाराच्या आजारावर बदलीचा उपचार

गैरप्रकाराच्या आजारावर बदलीचा उपचार

Subscribe

शिवाजी रुग्णालयातील संबंधित कर्मचार्‍याला पुन्हा कडक भाषेत समज देण्याची कारवाई करण्यात आली आहे. या कर्मचार्‍याची सीसीटीव्ही असलेल्या विभागात बदली करण्यात आली आहे. मात्र, हॉस्पीटल प्रशासनाने कारवाई करण्यात आलेल्या कर्मचार्‍याकडून गैरप्रकार होत असल्याचे कबूल केले आहे.

‘आपलं महानगर’ने १६ जून २०१८ रोजी कळव्याच्या शिवाजी रुग्णालयात होत असलेल्या गैरप्रकाराबाबत सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. ‘आपलं महानगर’मध्ये या विषयी बातमी छापल्यानंतर कळव्याच्या छत्रपती शिवाजी रुग्णालयाकडून याबाबत कारवाईची माहिती देणारा खुलासा पत्र ४ जुलै रोजी ‘आपलं महानगर’ला पाठवण्यात आला आहे. त्यातील माहितीनुसार हॉस्पीटलमधील संबंधित कर्मचारी तुषार पाटील हे डिसेंबर २०१६ मध्ये कार्यालयीन वेळेनंतर एका महिलेसमवेत आढळले होते. याबाबत त्यांनी दिलेले स्पष्टीकरण रुग्णालय प्रशासनाने ग्राह्य धरले नाही. तसेच घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता एक त्रिसदस्यीय समिती नियुक्त करण्यात आली होती. ज्यामध्ये उपवैद्यकीय अधीक्षक, विभागप्रमुख, आरोग्य निरीक्षक यांचा समावेश होता. समितीने आपल्या अहवालात स्पष्ट नमूद केलेले आहे की तुषार पाटील यांनी केलेले कृत्य निंदनीय, नियमबाह्य आणि कार्यालयीन शिस्तीस धरून नाही. मात्र, एवढे असूनही समितीने केवळ बदलीची कारवाई करण्यात यावी, असा शेरा मारला आहे. त्यानुसार पाटील यांची बदली करण्यात आली होती.

पांघरूण घालण्याचा ठाणे पालिका प्रशासनाचा प्रयत्न

मात्र पुन्हा तोच प्रकार १४ जून २०१८ रोजी घडला. यावेळी मात्र तुषार पाटील यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडून यामधून सुटका करून घेतल्याचे रुग्णालयातील कर्मचारी खाजगीत बोलत आहेत. मात्र याबाबत सविस्तर वृत्त छापून येताच पुन्हा पाटील यांच्यावर केवळ बदलीची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना केवळ समज देणे, बदली करणे अशी किरकोळ कारवाई करून त्यांच्या कृत्यांवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न ठाणे पालिका प्रशासनाकडून होत असल्याचे छत्रपती शिवाजी रुग्णालयातील कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

ठाणे महानगरपालिकेचा अजब कारभार

तुषार पाटील यांच्या कृत्याबद्दल आम्ही त्यांना याआधीच्या घटनेबद्दल समज दिली होती, त्यांची बदलीही करण्यात आली होती. आता पुन्हा घडलेल्या घटनेची माहिती वर्तमानपत्रातून समजताच आम्ही त्यांची सीसीटीव्ही असलेल्या दुसर्‍या विभागात बदली केली आहे. तसेच याबद्दल कार्यवाही करण्यासाठी सविस्तर रिपोर्ट आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठविला आहे. त्यावर लवकरच कारवाई होईल.

- Advertisement -

संध्या खडसे, अधिष्ठाता, छत्रपती शिवाजी महाराज पालिका रुग्णालय, कळवा


– सुबोध शाक्यरत्न

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -