घरमुंबईउद्धव ठाकरेच नवे मुख्यमंत्री

उद्धव ठाकरेच नवे मुख्यमंत्री

Subscribe

शरद पवारांचा दुजोरा,मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव उद्धव यांनी स्वीकारला

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावावर सर्वसहमती झाली असल्याचे सांगतानाच राज्यात सत्ता येऊ घातलेल्या महाविकासआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार उद्धव ठाकरे असतील, असा दुजोरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे. त्याचवेळी इतर मुद्यांवर महाविकासआघाडीचे प्रमुख घटक पक्ष शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची इतर मुद्यावर चर्चा सुरूच राहणार असून शनिवारी पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती देण्यात येईल, असेही शरद पवार यांनी सांगितले. मात्र, बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी तिन्ही पक्षातील जेष्ठ नेत्यांची चर्चा झाली. चर्चा सकारात्मक होती. पण चर्चा संपली नाही. उद्याही चर्चा सुरूच राहणार आहे, असे स्पष्ट केले. दरम्यान, एका मराठी वृत्तवाहीनीशी फोनवरून बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा प्रस्ताव स्वीकारला असल्याचे शिवसेना नेते संजय राऊत यांनी सांगितले. त्यावेळी बैठकीत उपस्थित नेत्यांनी उद्धव यांचे टेबल वाजवून अभिनंदन केल्याचेही ते म्हणाले.

शुक्रवारी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसच्या नेत्यांची बैठक वरळी येथील नेहरू सेंटरमध्ये पार पडली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, उपस्थित होते. तसेच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, खासदार संजय राऊत, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई हेही उपस्थित होते. या नेत्यांमध्ये सुमारे साडेतीन तास चर्चा झाली.

- Advertisement -

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर सर्वसहमती झाली आहे. तिन्ही पक्षाच्या नेत्यांची इतर मुद्यांवर चर्चा सुरूच राहणार आहे. उद्या पत्रकार परिषद घेऊन मीडियाला माहिती देण्यात येईल, असे शरद पवार यांनी बैठकीतून बाहेर पडल्यावर पत्रकारांना सांगितले. बैठक संपल्यानंतर नेहरू सेंटरमधून शरद पवार हे सर्वात आधी बाहेर पडले. त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यानंतर उद्धव ठाकरे बैठकीतून बाहेर आले. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे, संजय राऊत, सुभाष देसाई, एकनाथ शिंदे हे नेते होते.

बैठकीत झालेल्या निर्णयाबद्दल उद्धव ठाकरे यांनी विचारल्यावर ते म्हणाले की, आज तिन्ही पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रथमच एकत्र चर्चेला बसले. बर्‍याचशा मुद्यांवर आमचे एकमत झाले आहे. मला अर्धवट माहिती सांगायची नाही. सर्व विषयावरील एकमत झाल्यानंतर मीडियाकडे जायचे ठरवले आहे. मात्र आज झालेली चर्चा योग्य दिशेने आणि सकारात्मक झाली, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

- Advertisement -

बैठकीनंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत मात्र उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपद देण्याबाबत काहीही बोलण्यास काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी नकार दिला. चर्चा सकारात्मक झाली. उद्याही चर्चा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, नेते सुनील तटकरेही उपस्थित होते.

मी मुख्यमंत्री होणे योग्य नाही

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदारांची शुक्रवारी सकाळी ‘मातोश्री’ वर बैठक बोलावली होती. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनीच मुख्यमंत्री व्हावे, असा आग्रह आमदारांनी धरला होता. परंतु, स्वतः उद्धव मुख्यमंत्री होण्याबाबत फारसे सकारात्मक दिसले नाहीत. राज्याच्या मुख्यमंत्रिपदी शिवसैनिक बसावा, अशी बाळासाहेबांची इच्छा होती. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन, हे वचन मी त्यांना दिले होते, असेही ते म्हणाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -