घरमुंबईउत्तर प्रदेश, गुजरातच्या चोरांची लालबागला जत्रा

उत्तर प्रदेश, गुजरातच्या चोरांची लालबागला जत्रा

Subscribe

गणेशोत्सव काळात बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक लालबाग परिसरात गर्दी करतात. यामध्ये लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा या सार्वजनिक गणपतींचा समावेश असून लालबागला होणार्‍या या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांचा खिसा साफ करायला सुरूवात केली आहे.

गणेशोत्सव काळात बाप्पांच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक लालबाग परिसरात गर्दी करतात. यामध्ये लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, गणेश गल्लीचा राजा या सार्वजनिक गणपतींचा समावेश असून लालबागला होणार्‍या या गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी भाविकांचा खिसा साफ करायला सुरूवात केली आहे. हातसफाई करणारे हे चोर उत्तरप्रदेश, गुजरातमधून आले असून त्यांंची लालबागमध्ये जणू जत्राच भरली आहे. गर्दीत मोबाईल, पैशांची पाकीटे, दागिने लुटले जात असून चिंचपोकळीचा चिंतामणी आणि इतर गणपतींच्या आगमन सोहळ्यापासून चोरांची लुटमार सुरु झाली आहे. काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये नोंदवण्यात आलेल्या तक्रारीनुसार १० सप्टेंबरपासून आतापर्यंत १६८ मोबाईल्स आणि इतर महत्वाच्या वस्तू लंपास झाल्याचे समोर आले आहे.

नवसाला पावणारा गणपती म्हणून ‘लालबागच्या राजा’ची ख्याती आहे. त्यामुळे दरवर्षी लालबागच्या राजाच्या दर्शनला भाविकांची मोठी रिघ लागते. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हात साफ करताना दिसत आहेत. लालबागच्या राजाबरोबरच लालबाग, परळ भागातील गणेशोत्सवाची ख्याती देशभरात आहे. या भागामध्ये अनेक लोकप्रिय आणि मोठी गणेश मंडळे असून दरवर्षी गणरायांच्या मोठ्या मुर्ती, कल्पक सजावट आणि आकर्षक देखावे पाहण्यासाठी लाखो भाविक पंधरा दिवसांत परिसराला भेट देतात. हे विचारात घेऊन भक्तांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा या परिसरात चोख बंदोबस्त असतो. मागील काही वर्षांपासून या परिसरावर नजर ठेवण्यासाठी पोलिसांकडून सीसीटीव्ही कॅमेर्‍यांचाही वापर केला जात आहे. इतक्या उपाययोजना करुनही भुरटे चोर गर्दीचा फायदा घेऊन मौल्यवन वस्तूंवर हात साफ करताना दिसत आहेत. काळाचौकी पोलीस ठाण्यात आणि मंडळांच्या ठिकाणी असलेल्या पोलिसांच्या मदत केंद्रात चोरीच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. विसर्जनापर्यंत या घटनांमध्ये वाढ होण्याची शक्यतासुद्धा वर्तविण्यात येत आहे.

- Advertisement -

चोरट्यांच्या टोळ्या सक्रीय 

उत्तरप्रदेश आणि गुजरातमधून आलेले चोर हे टोळ्या बनवून सक्रीय झाले आहेत. साधारण दहा जणांची एक टोळी असून एका चोराने मोबाईल लंपास केल्यानंतर तो हातोहात टोळीतील सातव्या आठव्या चोराकडे जातो.ज्या भाविकाचा मोबाईल गेला आहे, त्याला समजण्याआधीच मोबाईल प्रचंड गर्दीमुळे सहज गायब झालेला असतो. बाप्पाच्या दर्शनासाठी लांबुन येणार्‍या भक्तांना लक्ष करत चोरटे हात साफ करत आहेत. मुंबईच्या बाहेरून येणारे भाविक चोरी झाल्यानंतर केवळ एका मोबाईलसाठी पोलीस स्टेशनच्या फेर्‍या कशाला घालायच्या ,असा विचार करून तक्रारी नोंदवण्यासाठी पुढे येत नाहीत, याचाही फायदा चोरटे घेत असल्याची माहिती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी दिली.

पोलीस उपायुक्तांना खबरच नाही 

लालबाग परिसरात होणार्‍या चोर्‍यांप्रकरणी परिसरातल्या पोलीस ठाण्यात तक्रारी नोंदवण्यात आल्या असल्या तरी परिमंडळ 4 च्या पोलीस उपायुक्त एन. अंबिका यांनी मात्र आपलं महानगरशी बोलताना अशा कोणत्याही तक्रारी आल्या नसल्याची माहिती दिली.

- Advertisement -

 आम्ही वारंवार गणेश भक्तांना सूचना तर देत असतोच. याच सोबत वेगवेगळ्या फलकांद्वारे गणेश भक्तांना सावध करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र, गणेश भक्तांनी देखील आपल्या मोबाईलसह इतर मौल्यवान वस्तूंची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे. – वासुदेव सावंत, सचिव, चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ

लालबागच्या राजाच्या गर्दी व्यवस्थापनासाठी पोलिसांची असणारी टीम-

पोलीस उपायुक्त-११
सहायक पोलीस उपायुक्त-१
पोलीस निरीक्षक- २२
पोलीस उपनिरीक्षक/सहायक पोलीस निरीक्षक-५९
पोलीस अंमलदार-५००
राज्य राखीव पोलीस बल- १ गट
दंगल नियंत्रण पथक-१
डी.एफ.एम.डी-२४
एच.एच.एम.डी-२४
सीसीटीव्ही व्हॅन-१
कंबॅक्ट व्हॅन- ४

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -