घरमुंबईसानपाडावासियांचे मशिदीच्या विरोधात साप्ताहिक आंदोलन

सानपाडावासियांचे मशिदीच्या विरोधात साप्ताहिक आंदोलन

Subscribe

संजिमुल मुस्लीम संघटनेला सिडकोने सानपाडा सेक्टर-८ मधील भूखंड क्रमांक १७ ए मशिदीसाठी दिला असून तो भूखंडच रद्द करावा व त्या भूखंडाऐवजी दुसर्‍या ठिकाणी भूखंड द्यावा, अशी मागणी करत सिडको व मनपा विरोधात अखिल सानपाडा रहिवासी संघाने साप्ताहिक आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाची रविवारपासून सुरुवात झाली असून २७ तारखेला आंदोलनकर्ते पालिका आणि सिडकोवर धडकणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून हा वाद सुरु असतानाही सिडको व पालिका बघ्याची भूमिका घेतल्याने यावेळी प्रखर आंदोलन छेडण्यात आले आहे, असे यावेळी सानपाडा रहिवासी महासंघाचे सचिव घनशाम पोटे यांनी सांगितले.

१९९७-९८ सालापासून सानपाड्यात सिडको प्रशासनाने मशिदीसाठी जागा देण्याची प्रक्रिया सुरु केली होती. परंतु,या मशिदीला सानपाड्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांकडून वेळोवेळी विरोध करण्यात येत होता. त्यामुळे काही वर्षे सिडकोकडून मशिदीसाठी जागा देण्याची प्रक्रिया अशीच रेंगाळत पडली होती. त्यानंतर २००५-०६-०७ साली सिडको प्रशासनाने मशिदीसाठी जागा देण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु केली. तुर्भे पोलीस ठाण्याकडून सानपाड्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांच्या मशिदीसंदर्भातील हरकती मागविण्यात आल्या होत्या. यावेळी सानपाड्यातील सर्व गृहनिर्माण संस्थांकडून या मशिदीला मोठा विरोध करण्यात आला होता.

- Advertisement -

भूखंड क्र.१७ ए, सेक्टर क्रमांक ८ येथे प्रेससाठी आरक्षित असलेल्या ७०० चौ.मी. भूखंडाचे आरक्षण हटवून सिडकोने मशिदीसाठी ही जागा देण्याचा निर्णय २०१२ साली घेतला. तसेच या मुस्लीम संस्थेने सिडकोकडे केवळ मशिदीसाठी ५०० चौ.मी.भूखंडाची मागणी केली असतानाही सिडकोने या संस्थेला ७०० चौ.मी.भूखंड दिल्याची माहिती अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानकडून देण्यात आली.

सानपाड्यातील सर्व गृहनिर्माण संस्थानी मशिदीच्या विरोधात सह्यांची मोहीम करून त्याचे निवेदन अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून सिडको व पोलीस प्रशासनाकडे सादर केले. तसेच पोलिसांनी मशिदीला विरोध असणारे सानपाड्यातील निषेधाचे होर्डिंग काढल्यामुळे रात्रीच्या सुमारास तुर्भे पोलीस ठाण्याच्या बाहेर सानपाड्यातील रहिवाशांनी रास्ता रोको करून पोलीस ठाण्याला घेरावसुद्धा घातला होता.त्यानंतर सानपाड्यातील रहिवाशांनी एकत्र येऊन अखिल सानपाडा सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या माध्यमातून मशिदीच्या विरोधात सिडको प्रशासनावर दहा हजार रहिवाशांचा भव्य मोर्चा काढला होता. त्यानंतर सिडको प्रशासनाने सानपाड्यात मुस्लीम बांधवाना मशिदीसाठी जागा देण्याच्या निर्णयाला तूर्तास स्थगिती दिली.

- Advertisement -

मशिदीला आमचा विरोध नाही, पण ज्या ठिकाणी अल्पसंख्याकांची वस्ती आहे त्या ठिकाणी भूखंड देण्यात यावा,अशी आमची मागणी असतानाही पालिका व सिडको त्याच ठिकाणी जाणीवपूर्वक भूखंड देत आहे. या विरोधात रविवार सानपाडा पोलीस स्टेशनच्या बाजूला असलेल्या गणेश मंदिरात महाआरती करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. रोज विविध प्रकारे आंदोलन करण्यात येणार असून मंगळवारी मनपा व सिडकोवर धडक देण्यात येणार आहे.
– घनशाम पोटे, सानपाडा रहिवासी महासंघ सचिव

अखिल सानपाडा रहिवासी सघांशी चर्चेस आम्ही तयार आहोत. त्यांना या भूखंडाबद्दल काय अडचण आहे, हे समजत नाही.
-दादल अब्दुल रहिमान, अध्यक्ष, संजिमुल मुस्लीम संघटना, सानपाडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -