घरमुंबईएसटीची स्लीपर बस बनली पांढरा हत्ती

एसटीची स्लीपर बस बनली पांढरा हत्ती

Subscribe

खासगी वाहतूकदारांसोबत स्पर्धा करताना प्रवासी संख्या व उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने शिवशाही बसगाड्यांनंतर आता एसटी महामंडळाने नॉन एसी स्लीपर बसगाड्या सुरू केल्या आहेत. मात्र, एसटीच्या वाहतूक विभागाचा हा निर्णय चुकीचा असल्याचे समोर आले आहे. कारण या बसगाड्या अक्षरश: रिकाम्या धावत आहेत. ठाणे ते सोलापूर अशी नॉन एसी स्लीपर बसगाड्या सुरू करून १५ दिवस झाले. मात्र, या बसगाड्यांविषयी अद्याप प्रवाशांनाही माहिती नाही. सोबतच या नॉन एसी स्लीपर बसगाड्या सुरू करताना कसलाही अभ्यास वाहतूक विभागाने केला नाही. त्यामुळे एसटी महामंडळाला या बसगाड्यांमुळे कोट्यवधींचा तोटा सहन करावा लागला. महामंडळाच्या या चुकीच्या धोरणामुळे एसटी महामंंंंंंंडळ पुन्हा खड्ड्यात जाण्याची शक्यता आहे.

खासगी प्रवासी वाहतुकीऐवजी एसटी महामंडळाकडे प्रवासी संख्या अधिक वाढावी याकरिता अत्याधुनिक सोयीसुविधा व संपूर्ण वातानुकूलित असलेल्या शिवशाही बस गाड्या सुरू करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आता रात्री प्रवास करणार्‍या प्रवाशांची संख्या लक्षात घेता परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी शिवशाहीबरोबरच रातराणी बसगाड्यांऐवजी नॉन स्लीपर बसगाड्या सुरू केल्या आहेत. यातील पहिली बसगाडी ठाणे ते सोलापूर या मार्गावर महाशिवरात्रीपासून सुरू करण्यात आली, परंतु या नव्या बस सेवेसंदर्भात प्रवाशांना कसलीच माहिती नसल्याने मागील १५ दिवसांपासून ही बस अक्षरश: रिकामी धावत आहे. त्यामुळे एसटीच्या वाहतूक विभागाला याचा मोठा आर्थिक फटका बसत आहे. एसटी वाहतूक विभाग अभ्यास न करता अशाप्रकारे नवनवीन बसगाड्या सर्रासपणे रस्त्यावर उतरवत आहे. त्यानंतर प्रवासी मिळत नाही म्हणून बंद करत आहे. या अशा प्रकारामुळे महामंडळाला मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.

- Advertisement -

ठाणे ते सोलापूर या मार्गावर या नव्या नॉन एसी स्लीपर बसगाडीचे प्रवासी भाडे हे ७०० रुपये आहे, तर शिवशाही सीटिंग बसगाडीचे भाडे ६०० रुपये, खासगी बसगाडीचे भाडे ६०० ते ६५० दरम्यान आहे. तुलनेने एसटीच्या स्लीपरचे भाडे जास्त असल्यामुळेही प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत. यासंबंधी आम्ही एसटी महामंडळाला विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, या नॉन एसी स्लीपर बसगाड्या प्रायोगिक तत्त्वावर सुरू केल्या आहेत, असे सांगत हात वर केले.

एसटी महामंडळाची वाढली चिंता
या नॉन एसी स्लीपर बसगाड्यांची आसन क्षमता फक्त ३० आहे. सध्या राज्यात ६०० रातराणी बसगाड्या धावत असून, त्यांच्याजागी या बसगाड्या टप्प्याटप्प्याने सुरू केल्या जाणार असल्याचा मानस एसटी महामंडळाचा आहे. मात्र, सुरुवातीला या बसगाडीला निराशाजनक असा प्रतिसाद मिळत असल्याने महामंडळाची चिंता वाढली आहे. त्यामुळे परिवहन मंत्र्यांनी निवडणुकीवर नाही तर आपल्या विभागावर लक्ष देणे आज गरजेचे आहे, असे मत प्रवाशांनी व्यक्त केले आहे.

- Advertisement -

ठाणे ते सोलापूरचे असे आहे भाडे?
नॉन एसी स्लीपर – ७००
हिरकणी – ६९२
शिवशाही सीटिंग – ६००
शिवशाही स्लीपर – ८२०
साधी एसटी – ५१२
खासगी बस – ६०० – ६५०

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -