घरमुंबईमूर्तिकार विजय खातूंच्या मुलीला न्याय मिळणार का?

मूर्तिकार विजय खातूंच्या मुलीला न्याय मिळणार का?

Subscribe

गेल्यावर्षी गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना ज्येष्ठ मूर्तिकार विजय खातू यांचे निधन झाले. अचानक झालेल्या या आघातामुळे कुटुंबीय हादरून गेले. असे असताना डगमगून न जाता कामाची धुरा त्यांची मुलगी रेश्मा हिने हाती घेतली.

सुप्रसिद्ध मूर्तिकार विजय खातू यांची कन्या रेश्मा खातू हिने मोठ्या निर्धाराने मोठ्या गणेशमूर्ती घडवण्याचे काम सुरू ठेवले. एक महिला पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रात आपला ठसा उमटू पहात असताना सरकारने तिला मदत करणे आवश्यक होते. पण तिच्याकडे असलेली परळ येथील सेंट्रल रेल्वे वर्कशॉपची जागाही गेली. तरीही रेश्मा डगमगली नाही. तिने नवीन जागा मिळवत मूर्ती घडवण्याचे काम सुरू ठेवले आहे.

गेल्यावर्षी बाबा गेले; यावर्षी जागाही… पण डगमगली नाही

गेल्यावर्षी गणेशोत्सवाला काही दिवस शिल्लक असताना ज्येष्ठ मूर्तिकार विजय खातू यांचे निधन झाले. अचानक झालेल्या या आघातामुळे कुटुंबीय हादरून गेले. असे असताना डगमगून न जाता कामाची धुरा त्यांची मुलगी रेश्मा हिने हाती घेतली. गेल्या वर्षी ती यशस्वीरित्या पारही पडली. पण यंदाही रेश्मासमोर नवीन समस्या उभी राहिली. ज्या जागेवर खातूंनी बरीच वर्षे बाप्पांच्या अनेक मूर्ती घडविल्या. त्या जागेवर पाणी सोडण्याची वेळ रेश्मावर आली. सरकारने तिला ती जागा मिळवून दिली नाही. पण तिने हातपाय गाळले नाहीत. नव्या निर्धाराने उभी राहिली. बाबांची परंपरा कायम ठेवण्यासाठी तिने नवी जागा मिळवून पुन्हा मोठ्या गणेशमूर्ती घडवण्याचा संकल्प केला आहे.

- Advertisement -

परळ येथील सेंट्रल रेल्वे वार्कशॉप आणि विजय खातू यांची चित्रशाळा हे समीकरणच बनले होते. गेल्या १८ वर्षांपासून ते या ठिकाणी मूर्ती घडवित होते. मुंबईपासून ते गुजरातपर्यंत अनेक ठिकाणी मूर्ती जात असत. पण यंदा मात्र हे समीकरण बदलले आहे. रेश्माच्या मार्गात मोठी अडचण आली. वडिलांनी जिथे मूर्ती घडविल्या त्या ठिकाणी यंदा तिला हे काम करता येणार नाही. काय करावे हे तिला कळत नव्हते. परिस्थिती कठीण होती; पण तिचा निर्धार पक्का होता. बाबांची परंपरा चालवण्याची धडपड तिने सुरू ठेवली होती. अखेर तिच्या अथक प्रयत्नाला यश आले. तिला इंडिया युनायटेड मिलमध्ये नवी जागा मिळाली.

बाबांनी उत्कृष्ट दर्जाचे काम केले. मुंबईतील अनेक नावाजलेल्या गणेश मंडळांच्या मूर्ती साकारल्या. त्याच दर्जाचे काम करणार आहे. तेवढ्याच सुबक मूर्ती साकारण्याचे माझे प्रयत्न असतील.
– रेश्मा खातू

- Advertisement -

यंदाच्या वर्षी मुंबईतील ८० हून अधिक तर मुंबई बाहेरच्या १५ पेक्षा अधिक मूर्ती रेश्मा खातू साकारणार आहेत. यासोबतच राज्याबाहेरच्या १० मूर्ती तयार करण्याचे काम त्यांच्याकडे आहे.

या वर्षी मूर्तिकार रेश्मा खातूंसोबतच, राजन खातू, राजू शिंदे आणि निलेश विधातेदेखील या जागेत असणार आहेत. गणेशोत्सव मंडळांनीदेखील रेश्मा खातूंवर तेवढाच विश्वास दाखवला आहे. यंदाच्या वर्षी रेश्मा खातू मुंबईपुरते मर्यादितच नव्हे तर सुरत, दिल्ली, केरळच्या राज्यांतीलदेखील मूर्ती साकारणार आहेत.

पौराणिक कथांवर आधारित

दरवर्षी मूर्तिकार विजय खातू हे काही तरी नवीन द्यायचे. विजय खातूंचा तोच वारसा रेश्मा खातू कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार आहेत. या वर्षीदेखील पौराणिक देखावा तसेच वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पाहायला मिळणार आहेत.

मुंबईतील अनेक गणेशभक्तांना ओढ असते ती म्हणजे यंदाचा ‘चिंचपोकळीचा चिंतामणी’ कोणत्या रुपात असणार? यंदाच्या वर्षी चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आपल्या ९९ व्या वर्षात पर्दापण करणार आहे. ही मूर्ती रेश्मा खातू साकारणार आहेत. मूर्तिकार विजय खातू यांच्याकडे १०० व्या वर्षांची संकल्पना तयार होती. मात्र त्यांचे हे स्वप्न पूर्ण झाले नाही. मात्र त्यांची ही इच्छा रेश्मा खातू पूर्ण करणार आहेत. १०० व्या वर्षांच्या चिंतामणीची एक झलक ९९व्या वर्षी पाहायला मिळणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -