घरमुंबईविद्यापीठाकडून 29 विद्यार्थ्यांना चुकीचे हॉलतिकिट

विद्यापीठाकडून 29 विद्यार्थ्यांना चुकीचे हॉलतिकिट

Subscribe

शिकवलेले विषय नसल्याने संभ्रमाचे वातावरण; महाविद्यालयावर ढकलली जबाबदारी

विद्यापीठाकडून घेण्यात येणार्‍या तृतीय वर्षाच्या कला शाखेच्या पाचव्या सेमिस्टरची परीक्षा मंगळवारपासून सुरू झाली. मात्र उल्हासनगरमधील सी.एच.एम महाविद्यालयातून राज्यशास्त्र विषयाची परीक्षा देणार्‍या 29 विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून चुकीचे हॉलतिकिट देण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना नसलेल्या विषय हॉलतिकिटमध्ये दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. विधी शाखेचा गोंधळ संपतो तोच हा विद्यापीठाचा हा नवीन गोंधळ समोर आला आहे.

कला शाखेच्या तृतीय वर्षाच्या पाचव्या सेमिस्टरच्या परीक्षेचे आठ दिवसांपूर्वी उल्हासनगरमधील सी.एच.एम. महाविद्यालयाकडून 29 विद्यार्थ्यांना हॉलतिकिट देण्यात आले. परंतु हॉलतिकिटमध्ये दोन विषय कधीच शिकवलेले नाहीत व एका विषयचा दोनदा पेपर असल्याचे विद्यार्थ्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी ही माहिती महाविद्यालय प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. परंतु परीक्षा सुरू झाली तरी महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारचे सुधारित वेळापत्रक देण्यात आले नाही. त्यामुळे मंगळवारी पहिला पेपर ‘वर्ल्ड पॉलिटिक्स’ या विषयाचा पेपर देण्यासाठी आलेल्या मुलांनी महाविद्यालयाकडे विचारणा केली परंतु त्यांना कोणत्याही प्रकारचे उत्तर देण्यात आले नाही. काही विद्यार्थ्यांनी युवासेनेचे विद्यापीठाचे सिनेट सदस्य अ‍ॅड. वैभव थोरात यांची भेट घेतली. थोरात यांनी याप्रकरणी विद्यापीठ प्रशासनाकडे तक्रार केली आहे.

- Advertisement -

13 नोव्हेंबरला सुरू झालेल्या कला शाखेच्या राज्यशास्त्र विषयाचा पहिला पेपर वर्ल्ड पॉलिटिक्सचा होता. तर दुसरा पेपर वेस्टर्न पॉलिटिक्स थॉट व तिसरा पेपर पॉलिटिक्स ऑफ मॉर्डन महाराष्ट्रचा आहे. मात्र चौथ्या, पाचव्या व सहाव्या पेपरमध्ये हॉलतिकिटमध्ये चूक झाली आहे. हॉलतिकिटवर असलेला अनुक्रमे चौथा व पाचवा पेपर पॉलिटिक्स अ‍ॅण्ड फिल्म आणि इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन हे पेपर आहेत. मात्र हे पेपर विद्यार्थ्यांना कधीच शिकवलेले नाहीत. या पेपरऐवजी विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये पॉलिटिकल सोशोलॉजी व अमेरिकन पॉलिटिक्स हे विषय शिकवण्यात आले आहेत. तसेच सहावा पेपर असलेला इलेक्ट्रोल प्रोसेसच्या जागेवर पॉलिटिक्स ऑफ मॉर्डन महाराष्ट्र या पेपरची पुन्हा नोंद करत विद्यापीठाने घोडचूक केली आहे.

महाविद्यालय प्रशासनाकडे विद्यार्थ्यांने तक्रार करूनही कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही. त्यातच 13 नोव्हेंबरपासून परीक्षा सुरू होऊनही विद्यार्थ्यांना सुधारित हॉलतिकिट न दिल्याने त्यांच्यामध्ये संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. मात्र ही चूक महाविद्यालयाची असून विद्यार्थ्यांने वेबसाईटवरील वेळापत्रकानुसार परीक्षा द्यावी असे सांगात विद्यापीठाकडून हात वर करण्यात आले आहेत. हॉलतिकिटमधील चूक विद्यार्थ्यांनी आठ दिवसांपूर्वीच निदर्शनास आणून दिली असतानाही महाविद्यालयाकडून विद्यापीठाकडे कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार करण्यात आलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याबाबत महाविद्यालय उदासीन दिसून येते. तसेच वेबसाईटवरील वेळापत्रकानुसार अभ्यास करायचा असेल तर विद्यापीठाने हॉलतिकिट कशासाठी छापले असा प्रश्न अ‍ॅड. वैभव थोरात यांनी उपस्थित केला आहे.

- Advertisement -

हॉलतिकिटमधील चूक
पेपर चुकलेला पेपर अपेक्षित पेपर
चौथा पेपर पॉलिटिक्स अ‍ॅण्ड फिल्म पॉलिटिकल सोशोलॉजी
पाचवा पेपर इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन अमेरिकन पॉलिटिक्स
सहावा पेपर पॉलिटिक्स ऑफ मॉर्डन महाराष्ट्र इलेक्ट्रोल प्रोसेस

काही तांत्रिक अडचणीमुळे ही चूक झाली असण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित केलेले वेळापत्रकानुसार परीक्षेची तयारी करावी.
– विनोद मळाले, उपकुलसचिव, जनसंपर्क, मुंबई विद्यापीठ

अर्ज भरताना विद्यार्थी फक्त विषय निवडतात. पण त्या विषयातील पेपर हे महाविद्यालयाकडून भरण्यात येत असतात. त्यामुळे महाविद्यालयाकडून जे निवडण्यात आले आहे. तेच हॉल तिकिटवर आलेले आहे. हे प्रक्रिया ऑनलाईन असल्याने यामध्ये विद्यापीठाकडून काहीही फेरफार करता येत नाही. त्यामुळे ही चूक विद्यापीठाची आहे. यासंदर्भात आम्ही योग्य तो निर्णय घेऊ.
– डॉ. अर्जून घाटुळे, परीक्षा नियंत्रक, मुंबई विद्यापीठ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -