घरपालघरनवापूरच्या समुद्रकिनार्‍यावर धोका आदळतोय

नवापूरच्या समुद्रकिनार्‍यावर धोका आदळतोय

Subscribe

यामुळे तारापूर औद्योगिक वसाहत आणि परिसरातील समुद्र किनार्‍याजवळील गावांमधील घातक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

बोईसर: तारापूर सीईटीपीच्या हलगर्जीपणामुळे लाखो लीटर रासायनिक सांडपाण्याचा तवंग पसरून बोईसरजवळील समुद्र काळवंडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे.शनिवारी दुपारी भरतीच्या पाण्यासोबत काळेशार रासायनिक पाण्याच्या लाटा नवापूर आणि नांदगावच्या समुद्रकिनार्‍यावर आदळत होत्या.यामुळे तारापूर औद्योगिक वसाहत आणि परिसरातील समुद्र किनार्‍याजवळील गावांमधील घातक प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

तारापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यावर प्रक्रीया करण्यासाठी प्लॉट क्र.ओएस-३० वर नवीन ५० एमएलडी क्षमतेचा सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात आला आहे.याचे संचालन तारापूर एनव्हायरोमेंट प्रोटेक्शन कमिटी (टीईपीएस) मार्फत केले जाते.या कमिटीवर तारापूरमधील नामवंत उद्योजकांचा समावेश आहे.सीईटीपीमध्ये घातक रासायनिक सांडपाणी आणि हाय सीओडीवर प्रक्रिया केल्यानंतर उरलेले प्रक्रियायुक्त पाणी जुन्या पाईपलाईनद्वारे नवापूर जवळील समुद्रात ३ किमी आतमध्ये सोडले जाते.सध्या तारापूर एमआयडीसी ते नवापूर समुद्रापर्यंत नवीन पाईपलाईनचे काम प्रगतीपथावर असून ही पाईपलाईन समुद्रात ७.२ किमी पर्यंत आतपर्यंत सोडली जाणार आहे. शनिवारी दुपारी नवापूर आणि नांदगाव जवळील समुद्रात रासायनिक काळ्या पाण्याचा मोठा तवंग पाण्यावर पसरलेला आढळून आला.या तवंगाचे भारतीय तटरक्षक दलाच्या जवानांनी हेलीकॉप्टर मधून केलेले छायाचित्रण समाजमाध्यमांवर झळकू लागताच मोठी खळबळ उडाली आहे. समुद्रात गस्त घालणार्‍या तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरला पालघर तालुक्यातील नवापूर खाडीजवळ मोठ्या प्रमाणात रंगीत सांडपाणी समुद्रात सोडले जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समूहाला सुचित केले.

- Advertisement -

 

 

- Advertisement -

शनिवारी तारापूर सीईटीपीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक रासायनिक सांडपाणी प्रक्रीया करण्यासाठी आल्यावर यातील काही रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच तसेच पाईपलाईनद्वारे पुढे समुद्रात सोडण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.खोल समुद्रात सांडपाणी वाहून नेणारी जलवाहिनी फुटल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त करण्यात आला. त्यानंतर एमआयडीसी तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांची त्या ठिकाणी जाऊन पाहणी केल्यानंतर पाईपलाईनमधील प्रवाह तातडीने बंद केला गेला.याबाबत सीईटीपीच्या अधिकार्‍याशी बोलण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कोणतीही माहीती आणि प्रतिक्रीया देण्यास नकार दिला.

 

तारापूर एमआयडीसी मधील कारखान्यांतून मोठ्या प्रमाणात होत असलेल्या प्रदूषणाविरोधात अखिल भारतीय मांगेला समाजाने दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय देत राष्ट्रीय हरीत लवादाने कारखानदार आणि टीईपीएस यांना प्रदूषणाची भरपाई म्हणून सुमारे १६० कोटी रूपयांचा दंड ठोठावला आहे.तारापूर एमआयडीसीमधून निर्माण होणार्‍या घातक प्रदुषणामुळे परिसरातील मानवी जीवन,पर्यावरण आणि सागरी जलचर यांची अपरिमीत हानी होत असून दंडाची कारवाई केल्यानंतर देखील प्रदूषणाची समस्या कायम आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -