घरपालघरपेशवेकालीन इतिहासाचे साक्षीदार गणपती मंदिर

पेशवेकालीन इतिहासाचे साक्षीदार गणपती मंदिर

Subscribe

यात विशेषतः श्री हनुमान, श्री गणपती, श्री शंभू महादेव, श्री आदिशक्ती ही दैवते प्रामुख्याने लक्ष वेधतात.

वसई: पेशवेकालीन इतिहासाचा साक्षीदार असलेले वसईतील श्री सिध्दीविनायक मंदिर आजही सुस्थितीत ठेवण्यात आले आहे. विशेष म्हणजे १५५ वर्षांपूर्वी मुंबई ब्रिटीश गव्हर्नरांनी गणपती मंदिराला ७२ रुपये आणि हनुमान मंदिराला १९ रुपयांची सनद दिल्याची मोडी आणि इंग्रजी भाषेत मजकूर असलेली सनद मंदिराचे पुजारी नारायण केशव फडके यांनी अजून जपून ठेवत ऐतिहासिक दस्ताऐवज जतन करण्याचे काम केले आहे. वसई प्रांतातील अर्थात उत्तर कोकणातील प्राचीन, शिलाहारकालीन, पेशवेकालीन (नव्याने जीर्णोद्धार झालेली) व ब्रिटिश कालखंडात (नव्याने सनदा उपलब्ध झालेली) देवस्थाने अभ्यासकांच्या व संशोधकांचा नेहमीच कुतूहलतेचा विषय ठरलेली आहेत. यात विशेषतः श्री हनुमान, श्री गणपती, श्री शंभू महादेव, श्री आदिशक्ती ही दैवते प्रामुख्याने लक्ष वेधतात.

इ.स १७३९ च्या मराठयांच्या वसई मोहिमेतील गौरवशाली विजयानंतर वसई, आगाशी, गोखिवरे, निर्मळ, पालघर, तुंगार, बाजीपुर प्रांतातील अनेक लहानमोठ्या देवस्थानांची पुनर्बांधणी, जीर्णोद्धार केल्याची उदाहरणे आहेत. उत्तर कोकण मोडी लिपी मंडळाचे अभ्यासक श्रीदत्त राऊत व विष्णुप्रिया कुलकर्णी यांनी वसई प्रांतातील देवस्थाने व इतर इतिहास विषयक घटनांशी संबंधित मोडी लिपी पत्रांचा सातत्याने मागोवा घेत आहेत. यातच वसईच्या पेशवेकालीन इतिहासाची साक्ष जपणार्‍या श्री फडके गणपती मंदिराचा इतिहास आता प्रथमच प्रकाशित होत आहे. सद्या वसईकरांना गणपती श्री सिद्धिविनायक गणेश स्थळ रमेदी धोवली या नावानेच परिचित आहे. खासगी मालकीच्या जागेत जपलेले व सुस्थितीत असणारे हे पेशवेकालीन श्री गणेशाचे मंदिर पुजारी नारायण केशव फडके (नाना) व समस्त फडके कुटुंबियांनी अत्यंत उत्तमरीतीने सांभाळले आहे. सध्या याठिकाणी फडके कुटुंबियांची पाचवी पिढी कार्यरत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे फडके कुटुंबियांनी मोडी लिपीत असणार्‍या श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाची इ.स. १८६७ सालची सनद जपून ठेवली आहे. या सनदेला सप्टेंबर 2022 रोजी तब्बल 155 वर्षे पूर्ण झाली आहेत. या सनदेत मुंबई ब्रिटिश गव्हर्नर यांचा उल्लेख असून श्री गणेश देवस्थानास ७२ रुपये व श्री हनुमान देवस्थानास १९ रुपयांची सनद नेमणूक केल्याचे नमूद केलेले आहे. यावर १० सप्टेंबर १८६७ असे इंग्रजीतून तारीख नमूद आहे. या सनदेचे एक वेगळेपण म्हणजे यात एकाच पानावर एका बाजूस मोडी लिपीतील मजकूर व दुसर्‍या बाजूस इंग्रजी लिपीतील मजकूर लिहीण्यात आला आहे. वसईतील या पेशवेकालीन श्री गणपती व श्री हनुमान देवस्थानाचा इतिहास पुरावा दस्तऐवज फडके कुटुंबियांनी अत्यंत निष्ठेने जपलेला आहे. पंचक्रोशीतील स्थानिक भाविकांचे, स्थानिकांचे श्रद्धास्थान असलेल्या या मंदिरात माघात पाच दिवस उत्सव, किर्तनाची परंपरा अखंडपणे सुरू आहे.

सनदेवर ब्रिटिशकालीन इ. स १८६७ च्या नेमणुकीबाबत मजकूर असला तरी त्यात सुरुवातीस नमूद केलेली ओळ माजी राज्याचे वेळेपासून नेमणूक ही लक्षात घेणे गरजेचे आहे. कारण, वसई विजयानंतर स्थिरतेच्या कालखंडात अनेक प्राचीन व नवीन देवस्थानाची उभारणी व नेमणुकीबाबतची पत्रे उपलब्ध आहेत. यातच सदर देवस्थानाची १७ व्या शतकाच्या उत्तरार्धातील काही पत्रे लिप्यंतर व प्रकाशित व्हावी यासाठी करण्यात येणारे काम अंतिम टप्प्यात आहे.

- Advertisement -

– श्रीदत्त राऊत, इतिहास अभ्यासक

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -