घरपालघरभात कापणीची तयारी सुरू झाली

भात कापणीची तयारी सुरू झाली

Subscribe

या कामासाठी अनेक गाव खेड्यांतून शेतकरी वर्ग लोहाराच्या दुकानात सकाळपासून गर्दी करीत आहेत. सध्या नवीन विळा घ्यायचा झाल्यास १२० ते १३० रुपये लागतात. तर फक्त जुन्या विळ्याला पुन्हा तापून सलाखून धार लावून घेतल्यास ७० ते ८० रुपये प्रति कोयता घेतले जात आहे .

डहाणू: पालघर जिल्ह्यात सर्वत्र ठिकाणी सध्या भात कापणी कामाला सुरुवात होण्याच्या वाटेवर आहे. ऑक्टोबर महिना सुरू झाला असून काही दिवसांवर नवरात्र उत्सव येऊन ठेपला आहे. त्यात सध्या खरिपातील हळवे भात पीक तयार झाले असून भात कापणीच्या तयारीला शेतकरी वर्ग लागला आहे. त्यासाठी अजूनही ग्रामीण भागातील शेतकरी कोयत्याच्या सहाय्याने भात कापणी करीत आहेत. त्यासाठी अनेक शेतकरी लोहाराच्या दुकानात गर्दी करीत आहेत.
त्यामुळे अनेक दिवस आराम करीत असलेल्या लोहार काम करणार्‍या कारागीरांना चांगले दिवस आले आहेत. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी जुने ठेवणेतील विळे -कोयते लोहाराच्या दुकानात आणून देत असून त्याला पुन्हा धार लावून घेत आहेत. या कामासाठी अनेक गाव खेड्यांतून शेतकरी वर्ग लोहाराच्या दुकानात सकाळपासून गर्दी करीत आहेत. सध्या नवीन विळा घ्यायचा झाल्यास १२० ते १३० रुपये लागतात. तर फक्त जुन्या विळ्याला पुन्हा तापून सलाखून धार लावून घेतल्यास ७० ते ८० रुपये प्रति कोयता घेतले जात आहे .

दरवर्षी कोयत्याचे भाव पाच ते दहा रुपयांनी वाढत आहेत.त्यात सध्या पारंपारिक लोहार काम करणारे कारागीर दुकानदार कमी झाल्याने ठराविक ठिकाणीच ही कामे केली जात आहेत . कासा , चारोटी , वरोती परिसरात असलेल्या लोहारांच्या दुकानात सध्या गर्दी होताना दिसत आहे. हार्डवेअरच्या दुकानात अनेक कोयते विकायला ठेवले असून त्याला मागणी कमी आहे. ते स्वस्त असून नाजूक असल्याने त्याने नीट कापणीचे काम होत नसल्याचे अनेक मजुरांचे म्हणणे आहे. म्हणून अजूनही पारंपरिक लोखंडी कोयत्यांचा वापर शेतकरी वर्ग करीत आहे.

- Advertisement -

 

हळवे भात पीक तयार झाले असून लगेचच भात कापणीला सुरुवात करायची असल्याने विळ्यांना धार लावायला सकाळपासून आलो आहोत .बारा ते चौदा विळ्यांना धार लावून घेण्यासाठी चार ते पाच तास लागणार आहेत. हजार ते बाराशे रुपये याला खर्च होणार आहे. पण याशिवाय भात कापायला सुरुवात करता येणार नाही. त्यात सध्या मजुरीचे भाव देखील वाढलेले आहे.
– प्रदीप चौरे, शेतकरी

- Advertisement -

सध्या लोखंडाचे भाव सुद्धा वाढलेले आहेत. त्यात लोहार कामासाठी लागणारा कोळसा हा सुद्धा दुर्मिळ झाला असून या मुळे थोडा भाव वाढलेला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आम्हाला जास्त काम नव्हते. आता शेतकरी वर्ग कापणीला लागणार असल्याने आमच्या हाताला काम आले असून थोडा आर्थिक फायदा होणार आहे.

– दिलीप प्रजापत , लोहार कारागीर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -