घररायगडवादळी पावसामुळे १०० नौका किनार्‍यावर

वादळी पावसामुळे १०० नौका किनार्‍यावर

Subscribe

मुरूड किनार्‍यावरील मासेमारी ठप्प

नांदगाव: गेल्या आठ दिवसांपासून समुद्रात सुरू असलेल्या वादळी हवामानामुळे अरबी समुद्रात मासेमारी करणे अत्यंत जोखमीचे आणि बेभरवशाचे बनले आहे. त्यामुळे मुरूड समुद्रात मासेमारीस गेलेल्या जवळपास छोट्या- मोठ्या सुमारे १०० नौका मच्छी न मिळाल्याने राजपूरी, एकदरा, मुरूड,नांदगाव,मजगाव आदी खाडी बंदरात सोमवारी आणि मंगळवारी रिकाम्या हाताने परतल्याची माहिती एकदरा, राजपूरी येथील ज्येष्ठ मच्छीमार पांडुरंग आगरकर, धनंजय गिदी, रोहन निशानदार, ललित मढवी, यांनी दिली.मच्छीमारांवर मासेमारी बाबत संकटांची मालिकाच सुरू असून शासनाने मच्छीमारांना मदतीचा हात द्यावा, अशी मागणी रायगड मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मनोहर बैले यांनी केली आहे.
मासळी पकडणे आणि विक्री करणे असे दोन भाग मिळून कोळी बांधवांचा उदरनिर्वाह चालतो.सध्या दोन्ही बाजू ठप्प असल्याचे कोळी मच्छीमार बांधवांनी सांगितले.सध्या सर्व नौका पाण्यात किनार्‍यावर नांगरून ठेवण्यात आल्या आहेत.मुख्य मासेमारी कधी पूर्वपदावर येणार याची चिंता मच्छीमारांना सातत्याने लागून राहिली आहे.मासळी नसल्याने पर्यटक देखील हिरमुसल्याचे पहायला मिळत आहेत.पावसाचा देखील पर्यटनावर मोठा परिणाम जाणवत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे.

मासेमारीस जाणे धोकादायक
मच्छीमारीचा मोठा हंगाम असला तरी समुद्रात अचानक बदलणार्‍या वातावरणामुळे किनार्‍यावर आलेली मच्छी काही कालावधीतच खोल समुद्रात निघून जात आहे.अचानक उठलेले उपरती वारे आणि हेटशी वार्‍यांमुळे समुद्रात मोठ्या लाटा उसळत असल्याने पारंपरिक नौका घेऊन खूप खोलवर मासेमारीस जाणे धोकादायक आहे, शिवाय मच्छी मिळेल याची या वादळी स्थितीत शक्यता नाही, असे मच्छीमार रोहन निशानदार म्हणाले. तर जवळा देखील सध्या मिळत नाही.सामान्य प्रकारची मासळी मिळाली तरी पावसामुळे सुकवायला जागा नाही.लहरी हवामान मच्छीमारांच्या जीवावर उठले असून पारंपरिक मच्छीमार पार हवालदिल झाला आहे, असे राजपूरी येथील मच्छीमार धनंजय गिदी यांनी सांगितले.

- Advertisement -

बोंबिलांचीही वानवा
पावसाचे अस्मानी संकटाने ’आ’ वासल्याने मच्छीमारात भयप्रद वातावरण दिसत आहे.गेल्या आठ दिवसात अनेक मच्छीमार नुकसान सोसून किनार्‍यावर परतले आहेत.मार्केटमध्ये पापलेट, घोळ, सुरमई, रावस अशी मासळीच काय बोंबिल देखील दिसून येत नाहीत.समुद्रात वादळ सदृश परिस्थिती असून समुद्रात कोणत्या घडामोडी घडतील हे कोणालाच सांगता येणार नाही, असे मुरूड येथील काही मच्छीमारांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -