घररायगडसहा वर्षातच खालापूर पंचायत समिती इमारतीची दुरावस्था; भितींना तडे, दरवाजाची चौकट पडण्याच्या...

सहा वर्षातच खालापूर पंचायत समिती इमारतीची दुरावस्था; भितींना तडे, दरवाजाची चौकट पडण्याच्या मार्गावर

Subscribe

खालापूर पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाचा दर्जा असा असेल तर ४२ ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे कशी असतील? गट विकास अधिकार्‍यांच्या पंचायत समितीमध्ये कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर ग्रामपंचायतीमध्ये कामे किती दर्जेदार होत असतील?

औद्योगिक तालुक्यातील पंचायत समिती म्हणून खालापूर पंचायत समितीचे रायगड जिल्ह्यात मोठे नावलौकीक आहे. त्यादृष्टीने लाखो रूपये खर्च करून खालापूर पंचायत समितीची इमारत बांधण्यात आली होती. मात्र,या इमारतीचे काम अक्षरशः निष्कृष्ट दर्जाचे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. काही वर्षातच या इमारतीची दुरावस्था झाली आहे. इमारतीच्या दुरूस्तीकडे गटविकास अधिकारी यांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकांचा जीव धोक्यात आला आहे.

पंचायत समिती अर्थ विभागाचे दालन असो की, सहायकांच्या भिंतीवर गेलेले भले मोठे तडे, दरवाजाची चौकट तुटून पडण्याच्या अवस्थेत आहे, तर काही ठिकाणे स्लॅबच्या काही भागाचे तुकडे पडत असल्याचे दिसून येत आहे. लाखो रुपये खर्च करून देखील इमारतीचे निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे. पहिला मजला मात्र झक्कास करण्यात आला आहे. तर तळ मजल्याला निधी मिळाला नाही का? असा प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे.

- Advertisement -

खालापूर पंचायत समितीच्या इमारतीच्या कामाचा दर्जा असा असेल तर ४२ ग्रामपंचायतीमध्ये विकास कामे कशी असतील? गट विकास अधिकार्‍यांच्या पंचायत समितीमध्ये कामे निकृष्ट दर्जाची होत असतील तर ग्रामपंचायतीमध्ये कामे किती दर्जेदार होत असतील? गट विकास अधिकारी यांचे तालुक्यात काम तरी नक्की कोणते? असा संताप सवाल खालापूरकर विचारत आहेत.

दरम्यान, खालापूर पंचायत समितीच्या प्रशासकीय इमारतीचा भुमीपूजन सोहळा तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे यांच्या हस्ते व राजिप अध्यक्ष सुभाष प्रभाकर तथा पंडीतशेठ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २५ मार्च २०११ रोजी झाला होता. तर इमारतीचे उद्घाटन ३० जुलै २०१६ रोजी तत्कालीन ग्रामविकास, महिला व बाल विभाग, रोहयो मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते व गृहनिर्माण व कामगार मंत्री प्रकाश मेहता यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. पण २०१६ मध्ये कामकाज सुरू झालेल्या पंचायत समिती इमारतीने २०२२ येईपर्यंत दम तोडला असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -