घररायगडएसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी

एसटी भाडेवाढ मागे घेण्याची मागणी

Subscribe

अधिकचा भुर्दंड प्रवाशांना न परवडणारा

 

 

- Advertisement -

पनवेल: एसटीने दिवाळी सुट्टीत प्रवासी भाड्यात वाढ केल्याने नेहमी प्रवास करणार्‍या प्रवाशांनी नाके मुरडली असून, ही भाडेवाढ मागे घेण्याची मागणी केली आहे.
दिवाळीच्या दहा दिवसांच्या सुट्टीमध्ये हंगामी तत्वावर एसटी प्रशासनाने १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. २० ऑक्टोबर मध्यरात्रीपासून ३१ ऑक्टोबरपर्यंत ही भाडेवाढ लागू राहणार आहे. ज्यांनी आरक्षण केले त्यांच्याकडून वाढलेल्या दराचे पैसे वसूल केले जाणार आहेत. साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) आणि शयनी आसन यांच्यासाठी ही भाडेवाढ असणार आहे. शिवनेरी आणि अश्वमेघ यांना भाडेवाढ लागू नसेल. एसटीचा प्रवासी बहुतांश सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय असल्याने हा अधिकचा भुर्दंड त्यांना न परवडणारा आहे. विशेषतः कुटुंबासह प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या खिशाला चांगलीच कात्री लागणार आहे. दिवाळीच्या सुट्टीत प्रवास करणारा हा सर्वसामान्यच प्रवासी अधिक प्रमाणात असल्याने त्यांचा विचार करण्यात आलेला नसल्याने नाराजी आहे. अगोदरच प्रत्येक बाबतीत महागाईचा कहर झालेला असताना या भाडेवाढीचा बोजा प्रवाशांना दहा दिवस का होईना, सोसावा लागणार आहे.

दहा टक्क्यांचा फंडा कशासाठी
दिवाळी सुट्टीचा मोका साधून एसटीचा गल्लाभरू धंदा प्रवाशांना पसंत पडलेला नाही. अनेकदा प्रवाशांना एसटीच्या टुकार बसमधून प्रवास करावा लागत असतो. जुन्या शिवशाही बस तर बर्‍याचशा धड अवस्थेत नाहीत. शिवशाहीप्रमाणे निमआराम बसमधून गर्दीच्या वेळी प्रवाशांना उभे रहावे लागते. यावेळी कोणत्याही प्रकारे पर्यायी बसची व्यवस्था केली जात नाही. साध्या बस तर खुळखुळा झाल्यासारख्या असून, वेळेत देखभाल आणि दुरुस्ती न करता दामटविण्यात येतात. स्वाभाविक रस्त्यात बस नादुरुस्त होऊन प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. एसटी बसचे असे रडगाणे असताना दहा टक्क्यांचा फंडा कशासाठी, असा संतप्त सवाल प्रवासी विचारत आहेत.

- Advertisement -

या भाडेवाढीतून पासधारकांना वगळण्यात आले असले तरी बहुतांश पासधारक हे विद्यार्थी असून, दिवाळीच्या सुट्टीमुळे शाळा बंद राहात असल्याने त्यांचा प्रवास होत नाही. सर्वसामान्य प्रवाशांचा विचार करून दहा दिवसांची भाडेवाढ रद्द करण्यासाठी मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्र्यांनी एसटी प्रशासनाला आदेश द्यावेत, अशी मागणी केली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -