घररायगडपरतीच्या पावसाचा जिल्ह्यात जोर

परतीच्या पावसाचा जिल्ह्यात जोर

Subscribe

भात शेतीचे नुकसान, मासेमारी व्यवसायावर परिणाम

श्रीवर्धन: जिल्ह्यातील श्रीवर्धन, म्हसळे, पनवेल, उरण, पेण, अलिबाग , कर्जत यासह सर्वच तालुक्यांत शुक्रवारी जोरदार पाऊस झाल्याने भात शेतीचे मोठे नुकसान होण्याची चिन्हे आहेत तर मासेमारीसाठी नुकतेच कुठे समुद्रात गेलेला कोळी बांधव या पावसामुळे आपल्या व्यवसायावर परिणाम होईल म्हणून चिंता व्यक्त करु लागला आहे.
गुरुवारपासूनच काही ठिकाणी पाऊस होत असून शुक्रवारी जोरदार पाऊस झाला. श्रीवर्धनमध्ये दुपारी दोन वाजेपर्यंत लख्ख ऊन पडले होते. हवेत उष्मा वाढल्याने अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. दुपारी अडीच वाजता अचानक आभाळ भरुन आले आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाला सुरुवात झाली.शहरातील अनेक भागातून पाणी वाहू लागले.तर मुरुड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत होणार्‍या पावसामुळे भातशेतीला धोका निर्माण झाला आहे. कापणी योग्य झालेले पीक शेतात आडवे पडण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत आता पर्यंत २२२६ मिमि पाऊस झाला असून शुक्रवारी दुपारपर्यंत ५७ मिमी पाऊस झाल्याची माहिती देण्यात आली.
नवरात्र सुरु झाल्यावर सर्वसाधारण भात शेती पसवण्यास सुरुवात होते. यावेळी भाताच्या रोपांना नवीन दाणे येत असतात. नवीन दाणे आल्यानंतर भाताच्या काड्या काही प्रमाणात सुकू लागतात. मात्र जोरदार पाऊस आणि वादळी वार्‍यामुुळे अनेक ठिकाणी शेतामध्ये भात पडल्याचे दिसून आले.
गुरुवारी रात्री आणि शुक्रवारी पहाटे या पावसाने रायगडातील बहुतांश भागात थैमान घालून भात पिकाची दाणादाण उडविल्याचे दिसून येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मांढरे यांनी सांगितले की, माणगाव, महाड भागात गुरुवार पासून येथे जोरदार पाऊस पडत असून त्याने भात शेती पार झोपवून टाकली आहे. या पावसाच्या पाण्याच्या भाराने भातच नव्हे तर साधे गवत देखील जमिनीवर लोळण घेते,भात शेतीत आता पिक डवरले आहे.

भात पीकाची वाताहत
राजपूरी येथील मच्छीमारांना कोलंबी, ढोमी अशा प्रकारातील मासळी भरपूर मिळूनही सुकविण्यासाठी ऊन नसल्याने खराब झालेली मासळी फेकून द्यावी लागल्याची माहिती राजपुरी येथील ज्येष्ठ मच्चीमार धनंजय गिदी यांनी दिली. पावसामुळे जिल्ह्यात पारंपरिक मासेमारी आणि भातशेती संकटात सापडल्याचे दिसून येत आहे.मुरूड मार्केटमध्ये शुक्रवारी पापलेट, सुरमई,रावस अशी मोठी मासळी दिसत नव्हती. फक्त बोंबील आणि कोलंबीच आधिक दिसून येत होती.मुरूड तालुक्यात पाऊस सुरू असल्याने तयार भात पीकाची वाताहत होण्याची चिन्हे असल्याचे शेतकर्‍यांचे मत आहे.

- Advertisement -

पीक वाया गेले
परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात पुन्हा गडगडाटासह पाऊस कोसळू लागल्याने शेतकरी आणि मच्छीमार धास्तावले आहेत.हत्ती नक्षत्राचा हा पाऊस जड पाण्याचा पाऊस म्हणून ओळखला जातो अशी माहिती मुरूड तालुक्यातील वाणदे गावचे ज्येष्ठ शेतकरी तुकाराम पाटील आणि तेलवडेचे ग्रामस्थ कृष्णा वारगे यांनी शुक्रवारी दिली. लवकर पिकणार्‍या बियाण्याच्या कणसांचे आकडे वळले आहेत. त्यामुळे वजनदार कणसांची रोपे पावसाने चिखलात लोळवून टाकली आहेत त्यामुळे हातचे आलेले पिक वाया गेले आहे, असे पाटील म्हणाले.

पर्यटन व्यवसायावर परिणाम
हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील पाच ते सहा दिवस अशीच परिस्थिती राहील. परतीच्या पावसाने अचानक दणका दिल्यामुळे पर्यटन व्यवसायावर देखील त्याचा परिणाम झाला. अनेक ठिकाणी पर्यटकांनी केलेले बुकिंग जोरदार पावसामुळे रद्द देखील करण्याचे प्रकार घडले आहेत. चार महिने आपला धंदा बंद करून बसलेल्या पर्यटन व्यावसायिकांना आता तरी धंदा सुरू होईल अशी आशा होती. परंतु परतीच्या पावसाने त्यांच्या आशेवरती पाणी फेरले आहे.

- Advertisement -

मासेमार नौक समुद्रात गेल्याच नाहीत
मागील पंधरा दिवसांपासून समुद्र शांत झाल्यामुळे श्रीवर्धन समुद्रकिनारा, त्याचप्रमाणे अरबी समुद्रात मच्छीमारी हंगामाला चांगल्या प्रमाणात सुरुवात झाली होती. या हंगामात मच्छीमारांना कोळंबी, पापलेट, सुरमई, बांगडा, बीलीज, मांदेली, बगी त्याचप्रमाणे इतर विविध प्रकारची बारीक मच्छी मोठ्या प्रमाणावरती मिळत होती. परंतु परतीचा पाऊस सुरू झाल्यानंतर पुन्हा एकदा वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे काल सायंकाळपर्यंत समुद्रात मासेमारी करणार्‍या नौका आज सकाळपासून अजिबात पाहायला मिळत नाहीत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -