घररायगडपोलादपुरात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा!

पोलादपुरात सांडपाणी, घनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा!

Subscribe

शहर विकासाच्या मार्गावर असले तरी वाढत्या लोकसंख्येला सोयीसुविधांची पूर्तता करण्यास नगर पंचायत असमर्थ ठरल्याचे वास्तव पुढे आले आहे. विविध भागांतून येणारे सांडपाणी आणि घनकचरा यांचे व्यवस्थापन नसल्याने शहरालगत वाहाणार्‍या सावित्री नदीच्या पात्रात सांडपाणी सोडले जात असून, गाडीतळ वस्तीजवळ धनकचरा नदीच्याच पात्रात टाकण्यात येत आहे. यामुळे सांडपाणी आणि धनकचरा व्यवस्थापनाचे तीनतेरा वाजले असून, नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.

शहराच्या पूर्व आणि पश्चिमेला गाडीतळ, शिवाजीनगर, सिद्धेश्वर आळी, भैरवनाथ नगर, आनंदनगर, बाजारपेठ, मुस्लीम मोहल्ला, तांबड भुवन, सह्याद्रीनगर, सैनिक नगर, गोकूळ नगर, जाखमाता नगर, प्रभात नगर, हनुमाननगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर हे भाग आहेत. तेथील वस्तीमधील सांडपाणी सावित्री नदीच्या पात्रात सोडले जाते. तसेच शहरातील आणि वेगवेगळ्या भागांतील घनकचरा आणि ओला कचरा घंटागाडीमधून गोळा करून जुन्या नळपाणी पुरवठा योजनेच्या जवळील पुलाखाली टाकण्यात येत आहे. त्यामुळे नदीच्या पात्रात कचर्‍याचे ढीग पसरल्याने या परिसराला डम्पिंग ग्राऊंडचे स्वरुप आले आहे. हा कचरा वाहून नदी पात्रातील पाण्याच्या डोहात, तर सांडपाणी थेट पाण्याच्या प्रवाहात सोडले आहे.

- Advertisement -

स्वाभाविक पावसाळ्यात सध्यापेक्षा अधिक प्रमाणावर सावित्री नदीचे पाणी दूषित होणार असून, नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. गाडीतळ आणी चिखली येथे नदी पात्रात नळपाणी पुरवठा योजनांच्या विहिरी असून, त्यातून संपूर्ण शहराला दूषित पाणी पुरवठा केला जात आहे. नगर पंचायत प्रशासनाने नागरिकांना शुद्ध पाणी पुरवठा करणारी योजना राबवावी अशी मागणी जोर धरत आहे. या संदर्भात प्रतिक्रियेसाठी मुख्याधिकार्‍यांशी संपर्क होऊ शकला नाही. सध्या ते शहराबाहेर असल्याचे समजले. तसेच मुख्य अभियंत्यांचीही प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

कित्येक वर्षांपासून जलशुद्धीकरण प्रकल्प आणि कचर्‍याची योग्य ठिकाणी शहराबाहेर विल्हेवाट लावण्याची मागणी सातत्याने करण्यात येत आहे. नगर पंचायत प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी.
-दिलीप साबळे,सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -