French Open : जागतिक क्रमवारीत ८५ व्या स्थानी असणारी तमारा झिदानसेक उपांत्य फेरीत

कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी झिदानसेक स्लोवेनियाची पहिली टेनिसपटू ठरली.

Tamara Zidansek
तमारा झिदानसेकची उपांत्य फेरीत धडक

जागतिक क्रमवारीत ८५ व्या स्थानी असणाऱ्या स्लोवेनियाच्या तमारा झिदानसेकने फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. कोणत्याही ग्रँड स्लॅम स्पर्धेची उपांत्य फेरी गाठणारी ती स्लोवेनियाची पहिली टेनिसपटू ठरली. तसेच गतविजेत्या इगा श्वीऑनटेकलाही स्पर्धेत आगेकूच करण्यात यश आले. पोलंडच्या आठव्या सीडेड श्वीऑनटेकने चौथ्या फेरीत युक्रेनच्या मार्ता कॉस्ट्यूकवर ६-३, ६-४ अशी सरळ सेटमध्ये मात केली. तिचा पुढील फेरीत ग्रीसच्या मारिया साकारीशी सामना होईल.

चुरशीचा झाला सामना 

२३ वर्षीय तमारा झिदानसेकने महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात स्पेनच्या पॉला बादोसा जिबेर्टचा ७-५, ४-६, ८-६ असा पराभव केला. उपांत्यपूर्व फेरीचा हा सामना चुरशीचा झाला. या सामन्यातील पहिला सेट झिदानसेकने ७-५ असा जिंकल्यावर बादोसा जिबेर्टने दमदार पुनरागमन करत दुसऱ्या सेटमध्ये ४-६ अशी बाजी मारली. तिसऱ्या आणि निर्णायक सेटमध्येही बादोसा जिबेर्टने झिदानसेकला चांगली झुंज दिली.

या सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी झाली होती. परंतु, यानंतर झिदानसेकने आपली सर्व्हिस राखत आणि बादोसा जिबेर्टची सर्व्हिस मोडत हा सामना जिंकला. ‘दुसऱ्या सेटच्या अखेरीस मला थोडा थकवा जाणवत होते. मात्र, तिसऱ्या सेटमध्ये मला सर्वोत्तम खेळ करण्यात यश आले,’ असे सामन्यानंतर झिदानसेक म्हणाली.