घररायगडदिवाळीत रात्रीची विशेष स्वच्छता मोहीम

दिवाळीत रात्रीची विशेष स्वच्छता मोहीम

Subscribe

शहरवासीयांकडून कौतुक

 

 

- Advertisement -

teaबेलापूर: दिवाळी सणाच्या पाश्वर्र्भूमीवर नागरिकांमध्ये विविध साहित्य खरेदीचे प्रमाण मोठे असल्याने बाजारपेठा गजबजून गेल्या आहेत. सणात कचर्‍याच्या प्रमाणात वाढ झाली असून वेगवेगळया प्रकारचे फटाके वाजविले जात असल्याने रस्त्यावरील कचराही वाढत आहे. या अनुषंगाने स्वच्छ शहर म्हणून असलेला नवी मुंबईचा नावलौकिक लक्षात घेता महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदशनानुसार घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत दिपावली सणाच्या कालावधीत शहर स्वच्छतेवर अधिक काटेकोर लक्ष देण्यात आले असून लक्ष्मीपूजनाच्या सणानंतर त्या रात्री म्हणजेच सोमवारी रात्री ११ वाजल्यापासून बेलापूर ते दिघा अशा आठही विभाग कार्यालय क्षेत्रात स्वच्छतेची विशेष मोहीम मंगळवार पहाटे ३ वाजेपर्यंत राबविण्यात आली. या स्वच्छता कामगारांचे शहरवासीयांकडून कौतुक होत आहेत.
स्वच्छ भारत मिशनचे महापालिका नोडल अधिकारी तथा घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ.बाबासाहेब राजळे या संपूर्ण साफसफाई मोहीमेच्या नियोजनबध्द कार्यवाहीवर बारकाईने लक्ष ठेवून होते. त्यांनी मुख्य स्वच्छता अधिकारी राजेंद्र सोनवणे यांच्यासह पहाटे विविध विभागांना भेटी देऊन ठिकठिकाणच्या स्वच्छता कामांची पाहणी केली.

सफाई कर्मचार्‍यांची विशेष नेमणूक
विशेष स्वच्छता मोहीमेकरिता ३५६ सफाई कर्मचारी यांची विशेष नेमणूक करण्यात आली होती. ८ पिकअप वाहने आणि ८ आरसी वाहने यांच्या माध्यमातून या स्वच्छता मोहीमेत गोळा करण्यात आलेला कचरा तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहतूक करून शास्त्रोक्त प्रक्रियेसाठी वाहून नेण्यात आला.

- Advertisement -

१५ टन सुका कचरा गोळा
शहरातील आठही विभागातील मुख्य रस्ते, वर्दळीची ठिकाणे, बाजारपेठा, मुख्य चौक अशा गजबजलेल्या ठिकाणी रात्री ११ ते पहाटे ३ या कालावधीत राबविलेल्या या विशेष साफसफाई मोहीमेमध्ये हार, फुले तसेच खाद्यपदार्थ यांचा ८ टन ओला कचरा तसेच कागद, पुठ्ठे, कापड यांचा १५ टन सुका कचरा गोळा करून तुर्भे येथील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पस्थळी वाहून नेण्यात आला.

समाधानकारक अभिप्राय
सकाळी दिवस उजाडण्याच्या आत मध्यरात्रीपासून पहाटेच्या कालावधीत ही विशेष साफसफाई मोहीम राबविण्यात आल्याने सकाळी मॉर्निग वॉक करणार्‍या नागरिकांनी स्वच्छ रस्ते, चौक पाहून या विशेष स्वच्छता मोहीमेची प्रशंसा केली. महत्वाचे म्हणजे मध्यरात्री आणि पहाटे ही विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असली तरी दररोज सकाळी होणारी साफसफाई नियमीतपणे सुरु असल्याने समाधानकारक अभिप्राय व्यक्त करण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -