घरक्रीडागेमने बनाया इनका नेम!

गेमने बनाया इनका नेम!

Subscribe

‘यत्र प्रतिभा अवसर प्राप्नोति’ हे इंडियन प्रीमियर लीगचे ब्रीदवाक्य! आयपीएल करंडकावर संस्कृतमध्ये लिहिलेल्या या वाक्याचा मराठीत अनुवाद होतो, ‘जिथे प्रतिभेला मिळते संधी’. आयपीएल ही स्पर्धा म्हणजे फक्त भारतातीलच नाही, तर जगातील खेळाडूंसाठी दमदार कामगिरी करत प्रकाशझोतात येण्याची एक संधी असते. याच स्पर्धेमुळे भारताला जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, युझवेंद्र चहल यांसारखे अनेक उत्कृष्ट खेळाडू मिळाले आहेत. यंदा आयपीएल सुरू होण्याआधी या स्पर्धेचे प्रक्षेपण करणार्‍या वाहिनीने एक जाहिरात केली होती, ज्यात ‘गेम बनायेगा नेम’ असे म्हटले होते. मागील ११ मोसमांप्रमाणेच यंदाच्या आयपीएलमध्ये बर्‍याच युवा खेळाडूंनी त्यांच्या कामगिरीमुळे आपले नाव कमावले. या लोकप्रिय स्पर्धेत मिळालेल्या संधीचे सोने करत त्यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले. याच खेळाडूंवर टाकलेली ही एक नजर.

– श्रेयस गोपाळ (राजस्थान रॉयल्स)
लेगस्पिनर श्रेयस गोपाळ हा काही नवखा खेळाडू नाही. त्याने याआधी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून काही सामने खेळले आहेत, तर तो रणजी करंडकात कर्नाटक संघाकडून चांगली कामगिरी करत असतो. मात्र, आयपीएलमध्ये त्याला आपली प्रतिभा दाखवण्याची तितकीशी संधी मिळाली नव्हती. यंदा त्याला ती संधी दिली राजस्थान रॉयल्सने आणि त्याने त्या संधीचा चांगला वापर करत सर्वांनाच प्रभावित केले आहे. मागील वर्षीही काही सामने खेळणार्‍या गोपाळने यावर्षी १४ साखळी सामन्यांत १७.३५ च्या सरासरीने २० विकेट घेतल्या. यामध्ये एका हॅट्ट्रिकचाही समावेश होता, जी त्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध घेतली होती. ही हॅट्ट्रिक घेताना त्याने विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि मार्कस स्टोइनिस या खेळाडूंना बाद केले होते. तो यंदाच्या स्पर्धेत सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय गोलंदाज आहे, यावरूनच त्याची कामगिरी किती खास आहे हे कळते.

- Advertisement -

– रियान पराग (राजस्थान रॉयल्स)
माजी रणजीपटू पराग दास यांचा मुलगा रियानविषयी या स्पर्धेपूर्वी फारशा लोकांना माहिती नव्हती. रियान हा पृथ्वी शॉच्या २०१८ मध्ये १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणार्‍या संघाचा सदस्य होता. त्याने यंदाच्या विजय हजारे करंडकात आसामकडून सर्वाधिक धावा केल्या होत्या आणि तोच फॉर्म त्याने आयपीएलमध्येही कायम ठेवला. कामचलाऊ ऑफस्पिन टाकणार्‍या रियानला यंदा आयपीएलमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. त्याने या मोसमात ७ सामने खेळले, ज्यात त्याने ३२ च्या सरासरीने १६० धावा केल्या, तसेच गुरकीरत मान आणि श्रेयस अय्यर यांच्या विकेटही मिळवल्या. १७ वर्षीय रियानने राजस्थानच्या अखेरच्या सामन्यात एकाकी झुंज देत ५० धावांची खेळी केली. त्यामुळे तो या स्पर्धेत अर्धशतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला.

– नवदीप सैनी (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
रणजी क्रिकेटच्या चाहत्यांसाठी नवदीप सैनी हे नाव नवीन नाही. आपल्या वेगसाठी ओळखल्या जाणार्‍या सैनीने मागील काही वर्षांत दिल्लीसाठी चांगली कामगिरी केली आहे. दोन वर्षांपूर्वी रणजीमध्ये सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो सहाव्या स्थानी होता. या त्याच्या कामगिरीमुळे त्याची भारत ‘अ’ संघातही निवड झाली होती. मागील वर्षीही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा भाग असलेल्या सैनीला एकही सामना खेळायला मिळाला नाही. यंदा मात्र पहिल्या सामान्यापासूनच त्याला संघात स्थान मिळाले आणि सतत १४५-१५० च्या वेगाने गोलंदाजी टाकण्याच्या क्षमतेमुळे त्याने सर्वांनाच प्रभावित केले. त्याने या स्पर्धेच्या १३ सामन्यांत ११ विकेट घेतल्या. त्याची गोलंदाजी इतकी चांगली होती की एकही आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव नसताना त्याची विश्वचषकासाठी भारतीय संघात राखीव गोलंदाज म्हणून निवड झाली आहे.

- Advertisement -

-राहुल चहर (मुंबई इंडियन्स)
युवा लेगस्पिनर राहुल चहरला २०१७ आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स या संघाने पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मात्र, त्या संघात इम्रान ताहिर आणि वॉशिंग्टन सुंदर हे फिरकीपटूही असल्याने त्याला तीनच सामने खेळायला मिळाले. मागील वर्षीच्या लिलावात मुंबई इंडियन्सने त्याला आपल्या संघात दाखल करून घेतले खरे, पण त्याला एकही सामना खेळायला मिळाला नाही, परंतु यावर्षी त्याला खेळण्याची संधी मिळताच आपण काय करू शकतो हे सर्वांना दाखवून दिले. मुंबईच्या खेळपट्टीवर जिथे फिरकीपटूंना फारशी मदत मिळत नाही, तिथे त्याने बर्‍याच चांगल्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्याने या मोसमात आतापर्यंत १२ सामन्यांत १२ विकेट घेतल्या असून, त्याची कामगिरी इतकी चांगली आहे की मागील वर्षी याच स्पर्धेत चांगले प्रदर्शन करत भारतीय संघात प्रवेश मिळवणार्‍या मयांक मार्कंडेला यावर्षी केवळ ३ सामने खेळायला मिळाले. आता त्याला अंतिम सामन्यातही अजून काही विकेट मिळवण्याची संधी मिळणार आहे.

-सर्फराज खान (किंग्स इलेव्हन पंजाब)
मुंबई क्रिकेट वर्तुळात सर्फराज खान हे नाव नेहमीच चर्चेत असते. अगदी सुरुवातीपासून पृथ्वी शॉसोबतच या खेळाडूकडेही भविष्यातील आंतरराष्ट्रीय खेळाडू म्हणून पाहिले जाते. मात्र, काही कारणांनी त्याला आपल्यात असलेल्या प्रतिभेचे चांगल्या कामगिरीत रूपांतर करता आले नाही, मग ते रणजी करंडक असो की आयपीएल. याआधी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळताना सर्फराजने आपल्या प्रतिभेची झलक दाखवली होती, पण त्याच्या कामगिरीत सातत्य नसल्याने बंगळुरूने त्याला आपल्या संघात कायम ठेवले नाही. यंदा त्याला किंग्स इलेव्हन पंजाबने संघात घेत वरच्या क्रमांकावर खेळवले आणि सर्फराजने याचा चांगला उपयोग करत ८ सामन्यांच्या ५ डावांत ४५ च्या सरासरीने १८० धावा केल्या. आता जर त्याने अशीच कामगिरी इतर स्पर्धांतही सुरू ठेवली तर तो लवकरच मुंबईच्या रणजी संघातही परतेल यात शंका नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -