घरक्रीडाAsia Cup : श्रीलंकेत होणारी आशिया कप क्रिकेट स्पर्धा ‘या’ कारणाने रद्द

Asia Cup : श्रीलंकेत होणारी आशिया कप क्रिकेट स्पर्धा ‘या’ कारणाने रद्द

Subscribe

आशियाई क्रिकेट परिषदेने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. 

पाकिस्तानमधून श्रीलंकेत हलवण्यात आलेली आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. मागील आशिया कप स्पर्धा २०१८ मध्ये पार पडली होती. यंदा ही स्पर्धा जूनमध्ये श्रीलंकेत होणार होती. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. श्रीलंकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. या परिस्थितीत आशिया कपचे आयोजन करणे शक्य नसल्याचे श्रीलंका क्रिकेटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अ‍ॅशली डी सिल्वा यांनी स्पष्ट केले. श्रीलंकेत सध्या असलेली परिस्थिती पाहता जूनमध्ये ही स्पर्धा खेळवणे शक्य नाही, असे डी सिल्वा म्हणाले. परंतु, आशियाई क्रिकेट परिषदेने याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक स्थगित 

यंदा आशिया कप स्पर्धा पाकिस्तानमध्ये आयोजित केली जाणार होती. परंतु, भारत आणि पाकिस्तान यांच्यात राजकीय तणाव आहे. त्यामुळे भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाऊन आशिया कप खेळण्याची शक्यता कमी होती. याच कारणाने, आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानहून श्रीलंकेत हलवण्यात आली होती. परंतु, श्रीलंकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून तेथील सरकारने १० दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक स्थगित केली आहे.

- Advertisement -

स्पर्धा थेट २०२३ मध्ये?

तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुढील दोन वर्षांचे व्यस्त वेळापत्रक लक्षात घेता, आशिया कप स्पर्धेच्या आयोजनासाठी २०२३ एकदिवसीय वर्ल्डकपआधी संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. श्रीलंकेचा संघ लवकरच बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार असून मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहेत. त्यानंतर जुलैमध्ये भारतीय संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर जाईल.

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -