बायर्न म्युनिकचा विजयी षटकार; पॅरिसवर मात करत जिंकली चॅम्पियन्स लीग स्पर्धा

किंग्सले कोमानने केलेल्या गोलमुळे बायर्न म्युनिकने अंतिम सामन्यात पॅरिस सेंट जर्मानवर १-० अशी मात करत युएफा चॅम्पियन्स लीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले. चॅम्पियन्स लीग स्पर्धा जिंकण्याची ही बायर्नची सहावी वेळ होती. केवळ रियाल माद्रिद (१३) आणि एसी मिलान (७) या संघांनी चॅम्पियन्स लीग स्पर्धा बायर्नपेक्षा जास्त वेळा जिंकली आहे. बायर्न हा जर्मनीतील सर्वात बलाढ्य संघ मानला जातो. त्यांनी यंदा चॅम्पियन्स लीगमध्ये उत्कृष्ट कामगिरी करताना सर्व सामने जिंकत (११) ही स्पर्धा जिंकली. अशी कामगिरी करणारा बायर्न या स्पर्धेच्या इतिहासातील पहिलाच संघ ठरला आहे.

मध्यंतराला गोलशून्य बरोबरी

‘एस्टादिओ दा लुझ’ येथे झालेल्या चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात बायर्न आणि पॅरिस या दोन्ही संघांच्या आक्रमणाला फारशी धार नव्हती. पूर्वार्धात बायर्नने बराच काळ चेंडू आपल्याकडे राखला. मात्र, पॅरिसने चांगला प्रतिहल्ला केला. अँजेल डी मारिया आणि किलियन एम्बापे यांना गोलची संधी मिळाली. परंतु, त्यांना गोल करण्यात अपयश आले. दुसरीकडे बायर्नच्या रॉबर्ट लेव्हनडोस्कीने मारलेला फटका गोल पोस्टला लागला. त्यामुळे मध्यंतराला सामन्यात गोलशून्य बरोबरी होती.

नॉयरचा अप्रतिम खेळ

उत्तरार्धात मात्र बायर्नने अधिक आक्रमक खेळ केला. याचा फायदा त्यांना ५९ व्या मिनिटाला मिळाला. जॉश किमीचच्या क्रॉसवर किंग्सले कोमानने हेडर मारून गोल करत बायर्नला १-० अशी आघाडी मिळवून दिली. पॅरिसच्या मार्क्विनियॉसला गोल करण्याची संधी मिळाली, पण त्याचा फटका बायर्नचा गोलरक्षक नॉयरने अडवला. नॉयरने त्याआधी नेयमार आणि एम्बापे यांनी मारलेले फटकेही अप्रतिमरीत्या अडवले होते. त्याच्या चांगल्या खेळामुळे पॅरिसला उत्तरार्धातही गोल करता आला नाही आणि बायर्नने सामना १-० असा जिंकला.

‘मॅचविनर’ कोमानचा खास गोल

चॅम्पियन्स लीगच्या अंतिम सामन्यात २४ वर्षीय किंग्सले कोमान हा बायर्न म्युनिकसाठी ‘मॅचविनर’ ठरला. कोमान मागील पाच वर्षे बायर्नसाठी खेळत आहे. मात्र, त्याने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात पॅरिस सेंट जर्मान संघातून केली होती. इतकेच काय, तर त्याचा जन्मही पॅरिसमध्ये झाला होता. त्यामुळे पॅरिसविरुद्ध गोल करणे त्याच्यासाठी खूप खास होते. ‘हा गोल माझ्यासाठी नक्कीच खूप खास होता. आम्ही ही स्पर्धा जिंकल्याचा खूप आनंद आहे. मी आता बायर्नचा खेळाडू आहे, पण मला पॅरिससाठी वाईट वाटत आहे,’ असे सामन्यानंतर कोमान म्हणाला.