घरक्रीडाकर्णधार कोहलीचे विक्रमी द्विशतक

कर्णधार कोहलीचे विक्रमी द्विशतक

Subscribe

भारत ६०१; द.आफ्रिका दिवसअखेर ३ बाद ३६

कर्णधार विराट कोहलीने लगावलेल्या विक्रमी द्विशतकामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीतील पहिला डाव ५ बाद ६०१ धावांवर घोषित केला. कोहलीने या डावात ३३६ चेंडूत नाबाद २५४ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील सातवे द्विशतक होते. त्यामुळे भारताकडून सर्वाधिक द्विशतके लगावण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला. तसेच ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम खेळी होती. याचे उत्तर देताना दुसर्‍या दिवसअखेर दक्षिण आफ्रिकेची ३ बाद ३६ अशी अवस्था होती. यावर्षी पहिला कसोटी सामना खेळणार्‍या उमेश यादवने एडन मार्करम (०) आणि डीन एल्गर (६) या सलामीवीरांना झटपट माघारी पाठवले. उपकर्णधार टेंबा बवूमाला ८ धावांवर मोहम्मद शमीने यष्टीरक्षक वृद्धिमान साहाकरवी झेलबाद केले. दिवसअखेर थानीस डी ब्रून २० आणि नाईट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेला एन्रिच २ धावांवर नाबाद होता.

त्याआधी दुसर्‍या दिवशी ३ बाद २७३ वरून पुढे खेळताना भारताच्या कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी चांगली फलंदाजी सुरू ठेवली. रहाणे संथपणे खेळत होता, तर कोहलीने खराब चेंडूंचा समाचार घेत धावफलक हलता ठेवला. रहाणेने १४१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. काही षटकांनंतर फिलँडरच्या गोलंदाजीवर चौकार लगावत कोहलीने १७३ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील २६ वे, तर यावर्षीचे पहिलेच शतक होते. भारताने पहिल्या सत्रात एकही विकेट गमावली नाही. मात्र, त्यानंतर रहाणेला फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही. त्याला ५९ धावांवर डावखुरा फिरकीपटू केशव महाराजने बाद केले. ही महाराजची कसोटी क्रिकेटमधील १०० वी विकेट होती. रहाणे आणि कोहली यांनी चौथ्या विकेटसाठी १७८ धावांची भागीदारी केली.

- Advertisement -

सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या रविंद्र जाडेजाला सुरुवातीला वेगाने धावा करण्यात अपयश आले. मात्र, कोहलीने एका बाजूने धावफलक हलता ठेवत २४१ चेंडूत आपल्या १५० धावा पूर्ण केल्या. चहापानाला भारताची ४ बाद ४७३ अशी धावसंख्या होती. चहापानानंतर या दोघांनीही धावांची गती वाढवली. कोहलीने २९५ चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. तसेच त्याने कसोटीत ७००० धावांचा टप्पाही पार केला. त्याने आणि जाडेजाने द.आफ्रिकेचे फिरकीपटू महाराज आणि मुथुस्वामी यांच्यावर हल्ला चढवला. त्यामुळे १० षटकांत त्यांनी ९१ धावा चोपून काढल्या. ४० चेंडूत ७ धावा करणार्‍या जाडेजाने ७९ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

या दोघांनी आक्रमण सुरू ठेवत भारताच्या ६०० धावाही फलकावर लावल्या. एल्गारच्या गोलंदाजीवर चौकार लगावत कोहलीने कसोटीत पहिल्यांदा २५० धावा पूर्ण केल्या. जाडेजाला मात्र शतक झळकावता आले नाही. मुथुस्वामीच्या गोलंदाजीवर षटकार लागवण्याच्या नादात तो ९१ धावांवर बाद झाला. त्याने आणि कोहलीने २२५ धावांची भागीदारी केली. जाडेजा बाद झाल्यावर भारताने ५ बाद ६०१ धावांवर आपला डाव घोषित केला.

- Advertisement -

संक्षिप्त धावफलक –
भारत : पहिला डाव – १५६.३ षटकांत ५ बाद ६०१ डाव घोषित (कोहली नाबाद २५४, मयांक १०८, जाडेजा ९१, रहाणे ५९, पुजारा ५८; रबाडा ३/९३, मुथुस्वामी १/९७) वि. दक्षिण आफ्रिका : पहिला डाव – १५ षटकांत ३ बाद ३६ (डी ब्रून नाबाद २०; उमेश २/१६, शमी १/३).

विराटचा विक्रमांचा पाऊस 

७ – भारताचा कर्णधार विराट कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसर्‍या कसोटीच्या पहिल्या डावात नाबाद २५४ धावांची खेळी केली. हे त्याचे कसोटीतील सातवे द्विशतक होते. त्यामुळे भारतीय फलंदाजाने सर्वाधिक द्विशतके लगावण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम महान सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवाग यांच्या नावे होता. या दोघांनीही कसोटी क्रिकेटमध्ये ६-६ द्विशतके केली होती.

१ – विराट हा दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला आहे. तसेच कर्णधार झाल्यापासून विराटने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४० शतके (१९ कसोटी, २१ एकदिवसीय) लगावली असून सर्वाधिक शतके लगवणार्‍या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे.

९ – कसोटी क्रिकेटमध्ये एका डावात १५० धावांचा टप्पा पार करणार्‍याची विराटची ही नववी वेळ होती. त्यामुळे एका डावात सर्वाधिक वेळा १५० धावा करण्याचा विक्रम विराटने आपल्या नावे केला. याआधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन (८) यांच्या नावे होता.

७००० – विराटने द्विशतकी खेळीदरम्यान कसोटी क्रिकेटमध्ये ७००० धावांचा टप्पा पार केला. ही कामगिरी करणारा तो सातवा भारतीय फलंदाज आहे. याआधी ७००० धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर (१५९२१), राहुल द्रविड (१३२६५), सुनील गावस्कर (१०१२२), व्ही.व्ही.एस लक्ष्मण (८७८१), विरेंद्र सेहवाग (८५०३) आणि सौरव गांगुली (७२१२) यांनी पार केला होता.

२६ – विराटचे कसोटी क्रिकेटमधील हे २६ वे शतक होते. सचिन तेंडुलकर (५१), राहुल द्रविड (३६) आणि सुनील गावस्कर (३४) यांच्यानंतर भारताकडून सर्वाधिक शतके विराटच्या नावे आहेत. तसेच त्याने २६ वे शतक पूर्ण करतस्टिव्ह स्मिथ आणि गॅरी सोबर्स यांच्याशी बरोबरी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -