घरक्रीडाकिदाम्बी श्रीकांतची माघार

किदाम्बी श्रीकांतची माघार

Subscribe

चीन ओपन बॅडमिंटन स्पर्धा

भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांतने मंगळवारपासून सुरू होणार्‍या चीन ओपन स्पर्धेतून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, पी.व्ही. सिंधू आणि सायना नेहवाल या स्पर्धेत खेळणार असून त्यांचे ही स्पर्धा जिंकण्याचे लक्ष्य असेल. तसेच भारताची पुरुष दुहेरीतील जोडी सात्विकसाईराज रणकिरेड्डी आणि चिराग शेट्टीच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असेल. त्यांनी मागील महिन्यात झालेल्या फ्रेंच ओपन स्पर्धेत अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास केला होता.

किदाम्बी श्रीकांतचा या स्पर्धेच्या पहिल्या फेरीत दोन वेळच्या विश्व विजेत्या आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणार्‍या जपानच्या केंटो मोमोटाशी सामना होणार होता. मात्र, त्याने या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. आता तो थेट पुढील आठवड्यात होणार्‍या हाँगकाँग ओपन वर्ल्ड टूर सुपर ५०० स्पर्धेत खेळताना दिसेल.

- Advertisement -

चीन ओपनमध्ये महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत विश्वविजेत्या सिंधूसमोर जर्मनीच्या यवॉन लीचे आव्हान असेल. आठव्या सीडेड सायना नेहवालचा सामना चीनच्या काय यानशी होईल. या दोघींनाही मागील काही स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. मात्र, त्यांना या स्पर्धेत आपल्या कामगिरीत सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.

पुरुष एकेरीत जागतिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवणार्‍या साई प्रणितचा पहिल्या फेरीत इंडोनेशियाच्या टॉमी सुगीर्टोशी सामना होईल. समीर वर्मासमोर हाँगकाँगच्या ली चेऊक यीऊचे, तर एच. एस. प्रणॉयसमोर डेन्मार्कच्या रॅसमस गेमकेचे आव्हान असेल. पारुपल्ली कश्यपला दुसरी फेरी गाठण्यासाठी थायलंडच्या थामासिनवर मात करावी लागेल.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -