घरक्रीडापावसाची कृपा की अवकृपा

पावसाची कृपा की अवकृपा

Subscribe

बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत पावसाने व्यत्यय आणला असून भारत व न्यूझीलंड या उपांत्य लढतीलाही पावसाचा फटका बसला. उपांत्य लढतीसाठी राखीव दिवसाची तरतूद असल्यामुळे सामना दुसर्‍या दिवशी खेळवण्यात आला. वर्ल्डकप तसेच आयसीसी एकदिवसीय स्पर्धांमध्ये या आधीही पावसामुळे सामने दोन दिवस चालल्याची उदाहरणे आहेत. वर्ल्डकपमधीलच भारताचे दोन सामने पावसामुळे दोन दिवस चालले, हे सामनेदेखील झाले इंग्लंडमध्येच. दोन्ही सामने भारतानेच जिंकले.

१९८३ प्रुडेंशियल वर्ल्डकपमध्ये सलामीच्या साखळी लढतीत वर्ल्डकप विजेत्या लॉईडच्या विंडिजविरुध्द भारत या सामान्यात (९,१० जून १९८३) पावसाने व्यत्यय आणला होता. यशपाल शर्माच्या ८९ धावांचा झुंजार खेळीमुळे भारताने ६० षटकांत ८ बाद २६२ अशी मजल मारली. यशपालला संदिप पाटील (३६), रॉजर बिन्नी (२८) यांची साथ लाभली. होल्डिंग, रॉबर्ड्स, मार्शल, गार्नर या विंडीज तोफखान्याचा यशपालने नेटाने मुकाबला केला. पहिल्या दिवशी पावसाने खेळात व्यत्यय आणला, तेव्हा विंडीजने २२ षटकांत २ बाद ६७ धावा केल्या होत्या. योगायोगाची बाब म्हणजे हा सामना ओल्ड ट्रॅफर्डवरच खेळला गेला. दुसर्‍या दिवशी रॉजर बिन्नी, मदनलाल, बलविंदर संधू, कपिल देव या मध्यमगती चौकडीने, तसेच रवी शास्त्रीच्या डावखुर्‍या फिरकीमुळे ग्रिनीज, हेन्स, रिचर्डस, लॉईड, डूजॉन, गोम्स या प्रभुतींचा टिकाव लागला नाही. त्यांचा डाव ५१.१ षटकांत २२८ धावांतच आटोपला. विंडीजतर्फे सर्वाधिक ३७ धावा केल्या त्या अँडी रॉबर्टस, जोएल गार्नर या तळाच्या फलंदाजांनी! ९ बाद १५७ अशी विंडीजची बिकट अवस्था झाली होती. परंतु रॉबर्टस, गार्नर या अखेरच्या जोडीने ७१ धावांची भागी करुन विंडीजचा डाव लांबविला. शेवटची जोडी फोडण्यासाठी सुनील गावस्करने कर्णधार कपिलला रवी शास्त्रीच्या फिरकीचा वापर करण्यास सांगितले. रवीनेच गार्नरला किरमानीकरवी यष्टिचीत करुन भारताला ३४ धावांनी विजय मिळवून दिला.

- Advertisement -

१९९९ च्या वर्ल्डकपमध्ये एजबॅस्टनवरील भारत-इंग्लंड सामन्यात (२९-३० मे १९९९) पावसाने व्यत्यय आणला होता. अझरच्या भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ८ बाद २३२ अशी मजल मारली ती राहुल द्रविडच्या अर्धशतक, अजय जाडेजाच्या झटपट ३९ धावा, तसेच गांगुलीच्या ४० धावांच्या खेळीमुळे. पहिल्या दिवशी खेळ थांबला तेव्हा इंग्लंडने २०.३ षटकांत ३ बाद ७३ धावा केल्या होत्या. श्रीनाथ, देवाशिष मोहंती, सौरभ गांगुली ,व्यंकटेश प्रसाद, अनिल कुंबळे यांनी यजमान इंग्लंडला १६९ धावात गुंडाळल्यामुळे भारताने ६३ धावांनी विजय संपादला. सौरभ गांगुलीची अष्टपैलू कामगिरी (४० धावा, तसेच २७ धावांत ३ बळी) भारताच्या विजयाला कारणीभूत ठरले. या पराभवामुळे यजमान इंग्लंडचे वर्ल्डकपमधील आव्हान साखळीतच आटोपले होते. सुपर सिक्समध्ये इंग्लंडचा प्रवेश हुकला. भारताने मात्र सुपर सिक्समध्ये प्रवेश केला.

२००४ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका या सामन्यात पावसाने व्यत्यय आणला. दक्षिण आफ्रिकेच्या २४६ धावांचा पाठलग करताना पहिल्या दिवशी विंडीजने बिनबाद २० धावा केल्या. दुसर्‍या दिवशी त्यांनी दक्षिण आफ्रिकेवर ५ गडी राखून विजय मिळविला. ५ बाद २४९ धावा करुन विंडीजने हा विजय मिळविला. अंतिम फेरीत यजमान इंग्लंडवर मात करत विंडीजने चॅपियन्स ट्रॉफी स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -