घरक्रीडाUS OPEN : डॉमिनिक थीमला ऐतिहासिक जेतेपद 

US OPEN : डॉमिनिक थीमला ऐतिहासिक जेतेपद 

Subscribe

अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्याचा अंतिम सेट टायब्रेकरमध्ये जाण्याची ही पहिलीच वेळ होती.

ऑस्ट्रियाचा टेनिसपटू डॉमिनिक थीमने अमेरिकन ओपन स्पर्धेतील पुरुष एकेरीचे जेतेपद पटकावले. ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकण्याची ही थीमची पहिलीच वेळ आहे. अमेरिकन ओपनच्या अंतिम सामन्यात त्याने जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेवचा २-६, ४-६, ६-४, ६-३, ७-६ असा पराभव केला. ‘ओपन एरा’मध्ये पहिले दोन सेट गमावल्यानंतर अमेरिकन ओपन स्पर्धेचा अंतिम सामना जिंकणारा थीम पहिलाच खेळाडू ठरला आहे. तसेच अमेरिकन ओपनचा अंतिम सेट टायब्रेकरमध्ये जाण्याचीही ही पहिलीच वेळ होती, ज्यात थीमने ८-६ अशी बाजी मारली.

झ्वेरेवने जिंकले पहिले दोन सेट   

अंतिम सामन्याचा पहिला सेट झ्वेरेवने ६-२ असा सहज जिंकला, तर दुसऱ्या सेटमध्ये त्याच्याकडे ५-१ अशी आघाडी होती. थीमने त्याचा खेळ उंचावत झ्वेरेवची आघाडी ५-४ अशी कमी केली, पण झ्वेरेवने हा सेट ६-४ असा जिंकला. यानंतर मात्र झ्वेरेवने बचावात्मक खेळ करण्यास सुरुवात केली. तसेच त्याने काही चुकाही केल्या. याचा फायदा थीमने घेतला. त्याने दमदार पुनरागमन करत तिसरा आणि चौथा सेट अनुक्रमे ६-४ आणि ६-३ असा जिंकला.

- Advertisement -

पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली

पाचव्या आणि निर्णायक सेटमध्ये झ्वेरेवने ५-३ अशी आघाडी मिळवली होती. मात्र, थीमने सलग दोनदा झ्वेरेवची सर्व्हिस मोडत आणि आपली सर्व्हिस राखत सेटमध्ये ६-५ अशी आघाडी घेतली. मात्र, यावेळी झ्वेरेवने पुनरागमन करत सेटमध्ये ६-६ अशी बरोबरी केली. त्यामुळे हा सेट टायब्रेकरमध्ये गेला. यात थीमने ८-६ अशी बाजी मारत पहिल्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

आज दोन विजेते असले पाहिजे होते – थीम

यंदाच्या अमेरिकन ओपन स्पर्धेआधी थीम आणि झ्वेरेव या दोघांनीही ग्रँड स्लॅम स्पर्धा जिंकली नव्हती. त्यामुळे या दोघांनीही या अंतिम सामन्यात जिद्दीने खेळ केला. पाच सेट चाललेल्या या सामन्यात थीम विजेता ठरला. मात्र, झ्वेरेवनेही या सामन्यात झुंजार खेळ केल्याने या स्पर्धेला दोन विजेते असले पाहिजे होते, असे म्हणत थीमने झ्वेरेवचे कौतुक केले. ‘माझा आणि झ्वेरेवचा इथपर्यंतचा प्रवास साधारण सारखाच आहे. २०१४ मध्ये आम्ही जागतिक क्रमवारीत १०० व्या स्थानी होतो आणि तेव्हापासूनच आम्ही मित्र आहोत. आज आम्ही दोघांनीही उत्कृष्ट खेळ केला, त्यामुळे आज दोन विजेते असले पाहिजे होते,’ असे सामन्यानंतर थीम म्हणाला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -