घरक्रीडामँचेस्टर युनायटेडने केले सिटीला पराभूत

मँचेस्टर युनायटेडने केले सिटीला पराभूत

Subscribe

 इंग्लिश प्रीमियर लीग

मँचेस्टर युनायटेड आणि मँचेस्टर सिटी या एकाच शहरातील दोन बलाढ्य संघांमधील शनिवारी रात्री झालेल्या सामन्यात युनायटेडने २-१ अशी बाजी मारली. हा गतविजेत्या मँचेस्टर सिटीचा यंदाच्या मोसमातील चौथा पराभव होता. त्यामुळे १६ सामन्यांनंतर त्यांच्या खात्यात ३२ गुण असून ते गुणतक्त्यात तिसर्‍या स्थानी आहेत. त्यांच्यात आणि गुणतक्त्यात अव्वल स्थानी असणार्‍या लिव्हरपूलमध्ये आता १४ गुणांचे अंतर आहे. लिव्हरपूलने बॉर्नमथचा ३-० असा पराभव करत १६ सामन्यांतील आपला पंधरावा विजय मिळवला.

मँचेस्टर सिटीविरुद्धच्या सामन्यात युनायटेडने मध्यंतराला २-० अशी आघाडी मिळवली होती. त्यांच्याकडून मार्कस रॅशफोर्ड (पेनल्टी) आणि अँथनी मार्शियाल यांनी गोल केले. सिटीकडून ८५ व्या मिनिटाला निकोलस ओटामेंडीने गोल करत युनायटेडची आघाडी १-२ अशी कमी केली. मात्र, यानंतर त्यांना गोल करता आला नाही आणि त्यांनी हा सामना गमावला. मागील दोन मोसमांत प्रीमियर लीगचे जेतेपद पटकावणार्‍या मँचेस्टर सिटीला यंदा मात्र सातत्यपूर्ण खेळ करता आलेला नाही. त्यामुळेच त्यांच्यात आणि मागील मोसमातील उपविजेता संघ लिव्हरपूलमध्ये आता १४ गुणांचे अंतर आहे. लिव्हरपूलने यंदाच्या मोसमात अजून एकही सामना गमावलेला नाही.

- Advertisement -

मँचेस्टर सिटीने युनायटेडविरुद्धच्या सामन्यात आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण याचा फायदा युनायटेडलाच झाला. त्यांनी प्रतिहल्ला केला, तर त्यांच्या बचावफळीनेही उत्कृष्ट खेळ केला. या सामन्याच्या पहिल्या ३० मिनिटांतच युनायटेडने गोलच्या बर्‍याच संधी निर्माण केल्या. डॅनियल जेम्स आणि मार्शियालने मारलेले फटके सिटीचा गोलरक्षक एडर्सनने अडवले. मात्र, २३ व्या मिनिटाला युनायटेडला पेनल्टी मिळाली, ज्याचे रॅशफोर्डने गोलमध्ये रूपांतर केले. २९ व्या मिनिटाला मार्शियालने युनायटेडची आघाडी दुप्पट केली. त्यांना ही मध्यंतरापर्यंत राखली. मध्यंतरानंतर सिटीने आपल्या खेळात सुधारणा केली. मात्र, युनायटेडचा गोलरक्षक डेविड ड गेयाच्या अप्रतिम खेळामुळे सिटीला गोल करता आला नाही. सामना संपायला पाच मिनिटे शिल्लक असताना रियाद महारेझच्या क्रॉसवर निकोलस ओटामेंडीने हेडर मारत सिटीचा पहिला गोल केला. यानंतर महारेझने गोलवर मारलेला फटका ड गेयाने अडवल्यामुळे युनायटेडने हा सामना २-१ असा जिंकला.

चेल्सीला पराभवाचा धक्का

एव्हर्टनने इंग्लिश प्रीमियर लीगच्या सामन्यात चेल्सीला पराभवाचा धक्का दिला. रिचार्लसन आणि डॉमिनिक कॅल्व्हर्ट-लेव्हिन (२) यांच्या गोलमुळे एव्हर्टनने हा सामना ३-१ असा जिंकला. चेल्सीचा एकमेव गोल माटेयो कोवाचिचने केला. दुसरीकडे टॉटनहॅमने बर्नलीचा ५-० असा धुव्वा उडवला. टॉटनहॅमकडून हॅरी केन (२), लुकास मौरा, सॉन ह्युंग-मिन आणि मुसा सिसोको यांनी गोल केले. वॉटफोर्ड आणि क्रिस्टल पॅलेस यांच्यातील सामना गोलशून्य बरोबरीत संपला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -