घरक्रीडाभारतीय महिलांची मालिकेत बरोबरी

भारतीय महिलांची मालिकेत बरोबरी

Subscribe

दुसर्‍या वनडेत विंडीजचा ५३ धावांनी पराभव

पूनम राऊतचे अर्धशतक आणि फिरकीपटूंच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारतीय महिला संघाने दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिज महिला संघाचा ५३ धावांनी पराभव केला. या विजयामुळे भारताने ३ सामन्यांच्या या मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. या मालिकेतील तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी होणार आहे.

या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी स्वीकारली. भारताच्या डावाची खराब सुरुवात झाली. सलामीवीर जेमिमा रॉड्रिग्स (०) आणि प्रिया पुनिया (५) झटपट माघारी परतल्या. त्यामुळे भारताची ९ षटकांनंतर २ बाद १७ अशी अवस्था होती, परंतु पूनम राऊत आणि मिताली या अनुभवी जोडीने संयमाने फलंदाजी करत तिसर्‍या विकेटसाठी ६७ धावांची भागीदारी केली. ऑफस्पिनर शेनेता ग्रिमंडने मितालीला ४० धावांवर माघारी पाठवत ही जोडी फोडली. पूनमने मात्र चांगली फलंदाजी सुरू ठेवत १०१ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले.

- Advertisement -

हे पूनमचे एकदिवसीय क्रिकेटमधील १३ वे अर्धशतक होते. तिला हरमनप्रीत कौरची उत्तम साथ लाभली. हरमनप्रीतने आक्रमक खेळ करत ५२ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने ४६ धावा केल्या. पूनमने ७७ धावा केल्यावर तिला अफी फ्लेचरने बाद केले. तिने या धावा १२८ चेंडूत ४ चौकारांच्या मदतीने केल्या. त्यामुळे भारताने निर्धारित ५० षटकांत ६ बाद १९१ अशी मजल मारली.

याचा पाठलाग करताना विंडीजची सलामीवीर स्टेसी-अ‍ॅन किंगला अवघ्या ६ धावांवर शिखा पांडेने बाद केले. तसेच नताशा मॅक्लेनने १५ धावांवर माघारी परतण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीला आलेल्या कर्णधार स्टेफनी टेलर आणि शमेन कॅम्पबेले यांनी सावध फलंदाजी केली. त्यांनी ४५ धावांची भागी केल्यावर पूनम यादवने टेलरला बाद केले. टेलरने ३१ चेंडूत २० धावा केल्या. कॅम्पबेले एका बाजूला सावधपणे फलंदाजी करत होती, पण तिला इतरांची साथ लाभली नाही.

- Advertisement -

अखेर तिला राजश्री गायकवाडने ३९ धावांवर माघारी पाठवले. यानंतरच्या फलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे विंडीजचा डाव ४७.२ षटकांत १३८ धावांवर आटोपला. भारताच्या फिरकीपटू राजश्री गायकवाड, पूनम यादव आणि दिप्ती शर्मा यांनी प्रत्येकी २ विकेट्स मिळवल्या.

संक्षिप्त धावफलक – भारत : ५० षटकांत ६ बाद १९१ (पूनम राऊत ७७, हरमनप्रीत कौर ४६, मिताली राज ४०; अफी फ्लेचर २/३२) विजयी वि. वेस्ट इंडिज : ४७.२ षटकांत सर्वबाद १३८ (शमेन कॅम्पबेले ३९, स्टेफनी टेलर २०; दिप्ती शर्मा २/२५, पूनम यादव २/२६, राजश्री गायकवाड २/२७).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -